सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

निवृत्त कर्मचाऱ्यांना आता घरबसल्या ऑनलाइन हयातीचा दाखला देता येणार

सांगली, दि. 28 (जि. मा. का.): नोव्हेंबर महिन्यात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये जाऊन हयातीचा दाखला द्यावा लागतो. लांब रांगा तसेच तासन्‌तास लागणारा वेळ यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोस्टमनला घरी बोलावून किंवा पोस्टात जाऊन हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने देता येणार आहे. केंद्राच्या पोस्ट पेमेंट बँक व पेन्शन विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे डाकघर, सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा हयातीचा दाखला संबंधित बँकेच्या माध्यमातून निवृत्त वेतन देणाऱ्या कार्यालयाकडे सादर करावा लागतो. यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना तासन्‌तास रांगेत उभे राहून दाखला भरून देणे, दाखला जमा करणे आदी प्रक्रिया करावी लागते. वयामुळे अनेक निवृत्तीधारकांचे बायोमेट्रिक होत नाही किंवा त्यांच्या बोटांचे ठसे नीट उमटत नसल्याने अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोस्ट विभागाच्या योजनेत ‘फेस ऑथेंटिकेशन’ द्वारे हयातीचा दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना घरबसल्या पोस्टमनला बोलावून हयातीचा दाखला देता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांना हयातीचा दाखला देणे सुलभ व्हावे यासाठी पोस्ट विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी घ्यावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा