गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

जिल्हा वार्षिक योजनेतून टंचाई निवारणार्थ कृती आराखडा जलद गतीने तयार करावा - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत टंचाई निवारणार्थ कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय कृती आराखडा जलद गतीने तयार करून सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले. टंचाई निवारणार्थ उपाययोजना आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकिल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संताजी पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर आगामी काळात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी तसेच इतर जीवनावश्यक गरजांच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याकरिता कृती आराखडा तयार करताना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर विविध योजनांतील घटकांच्या सद्यस्थितीतील गरजा आणि टंचाई निवारणासाठीची उपयुक्तता विचारात घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच विद्यमान जलस्रोतांमधील पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य करणारी अपूर्ण व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच, शासनाच्या सूचनांनुसार मोठ्या प्रमाणावर पाणी वापर होणाऱ्या व टंचाई निवारणासाठी अत्यावश्यक नसलेल्या नवीन बांधकामांना तात्पुरती स्थगिती द्यावी, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, कृती आराखड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे विद्यमान स्रोत बळकटीकरण, जलस्त्रोतांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर, जलसंधारण व सिंचनाची सुरू असलेली, टंचाई निवारणास प्रत्यक्ष मदत करणारी कामे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढ व बळकटीकरण, नवीन जलस्रोत निर्मिती, जलसंधारण आणि दीर्घकालीन जलसुरक्षेशी संबंधित कामे, पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धतेशी संबंधित उपाययोजना. सार्वजनिक आरोग्य व अत्यावश्यक उपजीविकेशी संबंधित कामे यांचा समावेश असावा, असे त्यांनी सांगितले. बैठकीत तालुकानिहाय उपलब्ध जलस्रोत, प्रत्यक्ष पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, सुरू असलेली कामे, आवश्यक अतिरिक्त निधी आणि चालू टंचाईच्या कालावधीत पूर्ण होऊ शकणारी नवीन कामे यांचा आढावा घेण्यात आला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा