गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६
बालविवाह करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. बालविवाह करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात बालहक्क सप्ताह तसेच दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. संताजी पाटील, महानगरपालिका उपायुक्त (महिला व बाल विकास) विद्या पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, परिविक्षा अधिकारी शुभम शेंडगे, श्रीमती मारिया आवळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या रोहिणी वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, नागरिकांनी बालविवाहाबाबतची माहिती प्रशासन, पोलिस प्रशासनास किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 27 नोव्हेंबर रोजी सर्व शाळा, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे आदि सर्व ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घ्यावी, असे सूचित केले.
शहरी स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व ग्रामीण स्तरावरील ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामसेवक) व सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (अंगणवाडी सेविका) असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेंतर्गत मुलींचे संरक्षण व शिक्षणाला प्रोत्साहन करण्यासाठी आवश्यक टोल फ्री क्रमांकाच्या पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली. परिविक्षा अधिकारी शुभम शेंडगे यांनी जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद
मुलगी 18 वर्षाखालील किंवा मुलगा 21 वर्षाखालील असल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह करणाऱ्या प्रौढ पुरूषास दोन वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख् रूपयापर्यंत दंड होऊ शकतो. बालविवाह लावणारे, आयोजित करणारे किंवा त्यास मदत करणाऱ्या व्यक्ती शिक्षेस पात्र आहेत. बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा तो होऊ देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
बालविवाहाचे दुष्परिणाम
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहणे, लहान वयात गर्भधारणेचा धोका, शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम, आर्थिक स्वावलंबनाच्या संधी कमी होणे, कौटुंबिक हिंसाचार व शोषणाचा धोका, बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आदी दुष्परिणाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बाल विवाह मुक्त भारत करण्यासाठी मा. ना. श्रीमती अन्नपुर्णा देवी, मंत्री महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या स्वाक्षरीचे स्वत:चे नावाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी https://stopchildmarriage.wcd.gov.in/ या लिंकवर क्लिक करा. मेनु वर क्लिक करावे त्यानंतर खाली शेवटी Take Pledge असे नांव येईल त्यावर क्लिक करुन स्वत:ची माहिती भरावी व सबमिट करावी. त्यानंतर प्रतिज्ञा दिसेल प्रतिज्ञा पुर्ण झाल्यानंतर आपण प्रतिज्ञा वाचली. या बटनवर क्लिक करावे, त्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करे या बटनवर क्लिक करुन आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा