सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमअंतर्गत सेवांचा लाभ घ्यावा - उपजिल्हाधिकारी विवेक काळे
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाने नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, वेळेवर आणि जबाबदारीने उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम 2015 लागू केला आहे. याव्दारे प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी शासकीय प्रसिद्धीद्वारे केले आहे.
सेवा न मिळाल्यास किंवा विहित मुदतीत सेवा न मिळाल्यास नागरिकांना अपील करण्याचा अधिकार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा व सेवा मिळण्याचा कालावधी दिवसांमध्ये पुढीलप्रमाणे. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र - 15, जातीचे प्रमाणपत्र – 45, उत्पन्न प्रमाणपत्र – 15, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – 21, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र – 7, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र – 7, ऐपतीचा दाखला – 21, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना – 7, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत – 7, अल्पभू-धारक दाखला – 15, भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला – 15, शेतकरी असल्याचा दाखला – 15, डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र – 7, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे – 1, औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिक उत्खनन) – 15, औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामे बिगर अधिसूचित वृक्ष तोड परवानगी – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (अ) अन्वये भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराच्या जमिनीसंदर्भात नियोजन प्राधिकारणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जांतर्गत जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटादार व त्यावरील भार इ. चे विनिश्चिती प्रमाणपत्र देणे – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (ब) अन्वये राज्यात अंमलात असलेले शेतजमीन व कुळवहिवाट अधिनियम, विविध वतन अधिनियम आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 या अधिनियमानुसार वाटप केलेल्या भोगवटादार वर्ग 2 या धारणाधिकाराच्या जमिनीकरीता भोगवटादाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून विकास परवानगी मिळविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे – 30 दिवस.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ अन्वये संबंधित व्यक्तीने प्राप्त केलेल्या विकास परवानगीच्या अनुषंगाने अशा व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीच्या आधारे आणि कलम 47 अ मध्ये नमूद केलेल्या दराने रुपांतरण कराचा आणि त्याबद्दलचा अकृषिक आकारणीचा भरणा केल्यावर संबंधित व्यक्तीला विहित नमुन्यामध्ये सनद देणे – 30 दिवस.
उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 (अ) च्या तरतूदीनुसार परस्पर औद्योगिक वापर सुरु करणे शक्य व्हावे, त्याकरीता आवश्यक अधिकृत माहिती तातडीने उपलब्ध करून देणे – 30 दिवस.
0000000
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : आरोग्य सेवेसारखे पुण्य कामच नाही, त्यासाठी यावर सर्वांनी काम केले पाहिजे. प्रत्येक संस्था, व्यक्ती यांनी समाजाच्या प्रश्नावर काम करणे आवश्यक असून माणसांच्या मनामध्ये विविध उपक्रमाव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करावा. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेतून आपण माणसांचे आयुष्य वाढवून त्यांचा दुवा घेणार आहोत. यासाठी आरोग्य सुविधांना पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या संकल्पनेतून धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय उप आयुक्त कार्यालय सांगली यांच्या वतीने संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मिरज येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर-2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय भोकरे, कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सांगली धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, ऋषिकेश हिंगणगावकर, व शरद वाळके, अधीक्षक राहूल पाटील, प्रताप पवार, रूग्णालय निरीक्षक सचिन पाटील आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजारीच पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गावागावांमध्ये योगासने, विपषना याकडे जावे लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष ध्यान देणे गरजेचे आहे. याबाबत लहान मुलांच्यावरही चांगल्या आरोग्य सवयी लावाव्यात. आजारी पडू नये यासाठी काळजी, आजारी पडल्यानंतरची काळजी व आजारपण संपल्यानंतरची काळजी घेणे आवश्यक आहे. धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन शासकीय कामाच्या व्यतिरिक्त हा विशेष उपक्रम राबविल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
धर्मादायच्या अधिकाऱ्यांना मोठे अधिकार आहेत ते त्यांनी वापरावेत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय जागेत असलेल्या धर्मादाय रूग्णालयांना गोर, गरीब गरजू रूग्णांना 20 टक्के बेड राखीव ठेऊन त्यांच्यावर मोफत उपचार करणे असा कायदा आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी गरजूंना याचा लाभ मिळतो का याची वेळोवेळी तपासणी करावी. कोरोनापासून आरोग्याच्या सर्व सुविधा वाढल्या आहेत. माणुसकीला धरून असणाऱ्या सद्याच्या काळामध्ये प्रचंड मोठी आवश्यकता असणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून या आरोग्य शिबीरातून तपासणीअंती पुढील उपचार आवश्यक असणाऱ्या रूग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करावी, असे ते यावेळी म्हणाले.
या शिबिरामध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली च्या अधिनस्त सर्व धर्मादाय रुग्णालये सहभागी झाली असून या शिबिरात मोफत सर्व रोग (हृदयरोग, कॅन्सर, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, दंतरोग, बालरोग, आयुर्वेदिक, होमिओपॅथी इ.) निदान या सर्व प्रकारच्या रोगांवर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून औषधोपचार मोफत देण्यात येतील. आवश्यकतेनुसार रुग्णांवर नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयामार्फत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे.
प्रारंभी फीत कापून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी शाहीर बजरंग आंबी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आरोग्याचे महत्व विशद केले.
प्रास्ताविकात धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी या मोफत शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमास धर्मादाय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच धर्मादाय रूग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित, उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : बालगृहातील बालकांच्या आयुष्याला चांगला आकार देऊन भविष्याला दिशा देण्यासाठी काम करावे. बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून "शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य" हे ध्येयवाक्य घेऊन निरीक्षणगृहातील दीपोत्सव कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेस भेटप्रसंगी ते बोलत होते.
सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह, सांगली येथे आयोजित आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, भारती दिगडे, बालगृहातील मुले - मुली या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
शिक्षण व नोकरीमध्ये अनाथांना एक टक्का आरक्षण असून, यातून मुलांनी चांगले करियर घडवावे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, येथील मुलांचे उत्तम संगोपन करा. चांगले शिक्षण देऊन त्यांचे चांगले करियर घडवा. त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा. त्यांच्यातील कलागुण शोधून, त्यांना वाव द्यावा. त्या अनुषंगाने काही बाह्य शिक्षण द्यावयाचे असल्यास फीची व्यवस्था करण्यात येईल.
बालगृहातील बालके व निरीक्षणगृहाच्या भौतिक अडचणी सोडवू, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बालनिरीक्षणगृहात मुले 18 वर्षांपर्यंत राहू शकतात. 18 वर्षांनंतरच्या अनाथांची निवासव्यवस्था, महाविद्यालयीन शिक्षण, करियर, नोकरी, विवाह असे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बालगृहातील मुलांनी कोणती ही विशिष्ट वस्तु मोठ्या प्रमाणात तयार करावी. आपण दिवाळीत भेटवस्तु म्हणून देण्यासाठी ती वस्तू खरेदी करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकात सुधीर सिंहासने यांनी बालनिरीक्षणगृहातील कामकाजाचा आढावा व अडचणी सांगितल्या.
00000
फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी, असे आवाहन करून फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. सरकारी घाट, आयर्विन पुलाजवळ, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता (इ व द) कुंडलिक उबाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेच्या २३ फायबर ग्लास यांत्रिक बोटी व जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेची १ व ८ प्रवासी क्षमतेची १ फायबर ग्लास यांत्रिक बोटी अशा २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून व ताबा पावती वितरणाद्वारे करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या बोटींची खरेदी करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच, चारही तालुक्यातील पूरबाधित गावांचे सरपंच, नागरिक यांना बोटींची ताबा पावती वितरीत करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे,यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह लाभार्थी तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत मणदूर व देववाडी, वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत कोळे, बनेवाडी, चिकुर्डे, रेठरे हरणाक्ष, बहे, मसुचीवाडी व तांबवे, बोरगांव पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दहयारी, तुपारी, नागठाणे, सुखवाड व अंकलखोप व मिरज तालुक्यातील ढवळी, म्हैशाळ, वड्डी, निलजी बामणी, जुनी धामणी, सावळवाडी व कसबे डिग्रज या ग्रामपंचायतींना नवीन यांत्रिक फायबर ग्लास बोटी वितरीत करण्यात आलेल्या आहेत.
00000
नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ब्लॉक नं. 102, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे फेरफार अदालतीचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000000
बालकामगार नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत "महाराष्ट्र बालकामगार (प्रतिबंध व नियमन) नियम २०२५" नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने काही हरकती व सूचना असल्यास मा. कामगार आयुक्त, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. यांच्या कार्यालयास अवगत कराव्यात, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
00000
महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा घेतला आढावा
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, चांगल्या दर्जाचे रस्ते आदि नागरी सुविधा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महापालिकेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जयश्री पाटील, शेखर इनामदार, समित कदम, पृथ्वीराज पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बैठकीत स्मार्ट एलईडी, पाणी योजना, ड्रेनेजसह विविध कामांचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व उपाययोजना, वारणा उद्भव योजना, सांगली व कुपवाड ड्रेनेज योजना, शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव व त्यांची सद्यस्थिती, महापालिका क्षेत्रातील रस्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ पुतळा व कमान, चौक सुशोभिकरण, पंचमुखी मारूती रस्ता, यासह छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रोईंग क्लब, गुंठेवारी प्रमाणपत्र आदिंचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेत गेल्या चार महिन्यात केलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. यामध्ये करसंकलन, दायित्त्व, घंटागाडी, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा, रस्त्याची कामे, सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.
00000
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली, मिरज या ठिकाणी दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 एकूण 20 हायस्कूल, महाविद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दि. 28 सप्टेंबर 2025 रोजीचे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, सदर वेळेत सदर परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व सदर परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. वरील नमूद वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास व परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 पुढील हायस्कूल / महाविद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, विश्रामबाग, सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, गुलमोहर कॉलनी, सांगली, सांगली हायस्कूल सांगली, महावीर नगर, सांगली,
मोहम्मदिया अँग्लो उर्दू उच्च विद्यालय व कला व विज्ञान शालेय कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद जवळ, सांगली, श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, एस.टी. स्टँड रोड, सांगली, विलिंग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, पेठ भाग, तानाजी चौक, सांगली, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, आमराईजवळ, सांगली, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल, उत्तर शिवाजी नगर, सांगली, जी.ए. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, हरभट रोड, सांगली, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली मिरज रोड, विश्रामबाग, सांगली, गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली, उत्तर शिवाजी नगर, सांगली, मातोश्री गंगामा शिवाजी कोठारी गुजराथी विद्यालय आणि ज्यू. कॉलेज, महावीर नगर, सांगली, प्रजा प्रबोधिनी प्रशाला, विश्रामबाग, सांगली, वान्लेसवाडी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, वान्लेसवाडी सांगली, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा आणि मातोश्री सायराबाई चंपालाल बेथमुथा ज्यू. कॉलेज, रिसाला रोड, खणभाग, सांगली, कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला, गणेशदुर्ग राजवाडा, सांगली, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथ नगर, सांगली व हि. हा. रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, गणेशदुर्ग, राजवाडा, सांगली,
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
00000
वारणा धरणात 34.11 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.11 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.38 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.09 (10.10), धोम बलकवडी 4.07 (4.08), उरमोडी 9.92 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.11 (34.40), राधानगरी 8.24 (8.36), दूधगंगा 21.81 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.77 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 122.66 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 505, कण्हेर 340, धोम बलकवडी 330, राधानगरी 250, दुधगंगा 300, तुळशी 50, कासारी 300, पाटगाव 342, हिप्परगी बॅरेज 32 हजार 769 व अलमट्टी धरणातून 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.6 (40) व अंकली पूल हरिपूर 9.2 (45.11).
00000
जिल्ह्यात सरासरी 0.8 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (395.8), जत 2 (517.9), खानापूर 2.3 (434.5), वाळवा 0.1 (516.3), तासगाव 0.9 (464.9), शिराळा 0.5 (1210.7), आटपाडी 1.8 (505.9), कवठेमहांकाळ 0.6 (465.3), पलूस 0.0 (456.9), कडेगाव 0.1 (408.6).
00000
गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड. दिपक कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा, नुकसान भरपाई तसेच पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी आदिंचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नुकसान भरपाईची 25 प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच तीन प्रकरणांमध्ये वारसांना पेंशन मंजूर करण्यात आली. तसेच प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला. पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी यांचा आढावा घेण्यात आला.
00000
मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश; बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!
- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना
- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे
- 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : "शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य" - हे केवळ घोषवाक्य नाही, तर सांगलीतील सुंदरबाई मालू निरीक्षणगृह/बालगृहातील मुलांच्या आयुष्यात एक नवी पहाट घेऊन आलेला हा एक आश्वासक मंत्र ठरला. निमित्त होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, 'वर्शिप अर्थ फाऊंडेशन'च्या माध्यमातून आयोजित दिवाळीचे विविध साहित्य निर्मिती कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे.
सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह, सांगली येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, वुई फाऊंडेशनचे दिनेश कदम, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सर्व बालगृहातील मुले - मुली या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, जिल्ह्यातील 8 बालगृहातही त्या त्या ठिकाणी अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, “कोशिश करने वालो की कभी हार नही होती!”. त्यांनी 'इसापनीती'च्या गोष्टीमधून मुलांना समजावले की, कोणतेही एक कौशल्य निवडा, पण त्यात इतके प्राविण्य मिळवा की जग तुम्हाला ओळखेल. त्यांचे हे शब्द मुलांसाठी प्रेरणास्रोत ठरले. या मुलांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात 'सांगली पॅटर्न' नावाने एक विशेष प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दिवाळी आणि दसऱ्याच्या मंगलमय वातावरणाच्या अनुषंगाने, या मुलांच्या हातांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कच्च्या मालातून एक सुंदर वस्तू साकारतानाचा नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. हा केवळ एक उपक्रम नव्हता, तर त्यांच्या मनात आत्मविश्वासाची आणि स्वावलंबनाची ज्योत पेटवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता.
कार्यक्रमाच्या शेवटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वर्षा पाटील यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
00000
उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा - प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर
कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : वनांचे, वनसंपदेचे उत्तम प्रकारे रक्षण करा. गणवेशासोबत उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या ओघानेच येतात. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात योग्य समतोल साधून, येणाऱ्या आव्हानांचा, संकटांचा शांतपणे, धैर्याने सामना करून योग्य उत्तर शोधा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केले.
कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर., सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, सामाजिक कार्य विभाग, एसएनडीटी, पुणेचे विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक भास्कर इगावे, प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत, प्राध्यापक (प्रशासन व व्यवस्थापन) एच. एस. वाघमोडे, अपर संचालक (प्रशिक्षण) भरत शिंदे, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे उपप्राचार्य सुनील शेटे आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर म्हणाले, वनरक्षकांचे शिस्तबद्ध संचलन व सांघिक भावना पाहून भारावून गेलो आहे. अंगी काही विशेष गुण असल्यामुळेच, स्पर्धा परीक्षेतून वन सेवेसाठी निवड झाली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक जीवनात प्रवेश होत आहे. शासनाचा एक भाग म्हणून, शासनाचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून यापुढे तुमच्याकडे पाहिले जाईल. मानसिक, शारीरिक व तांत्रिक बाबींमध्ये सक्षम राहून, तुमची भूमिका समजावून घेऊन त्यामध्ये सर्वोत्तम काम करा. समाजाची, देशाची उत्तम सेवा करण्याची संधी तुम्हाला लाभली असून मदतीच्या अपेक्षेने तुमच्याकडे येणाऱ्या जनसामान्यांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ते करा, अशा शब्दांत त्यांनी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या.
प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर. यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रबोधिनीमध्ये आजवर ३८१ वनरक्षक प्रशिक्षणार्थी, देशाच्या विविध राज्यांतील ४९७ वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत विविध खात्यांचे ३९,०४४ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सत्र संचालक कल्याणी यादव यांनी निकाल वाचन केले. प्रशिक्षणार्थीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून ऋतुजा पंढरीनाथ खताळ सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना एक रजत पदकही मिळाले. अविनाश आचला यांना दोन रजत पदके तर प्रतीक्षा जाधव व समता कालपाड यांना प्रत्येकी एक रजत पदक प्राप्त झाले. क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष गटात धीरज गोटा हे मॅरेथॉन विजेते व अॅथलेटिक चॅम्पियन ठरले तर महिला गटात दुर्वा धारणे या मॅरेथॉन विजेत्या व अॅथलेटिक चॅम्पियन ठरल्या.
सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच त्यांना एसएनडीटी महाविद्यापीठामार्फतही प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशिक्षणार्थीतर्फे श्रुती मेश्राम व आकाश खोजे यांनी मनोगत व्यक्त केले. दि. २९ मार्च २०२५ रोजी सुरू झालेल्या व दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झालेल्या सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या वनवृत्तांतील ९५ महिला व ४५ पुरुष अशा एकूण १४० वनरक्षक प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
प्रशिक्षणार्थीच्या पासिंग आउट परेडसाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे, विजयानंद गद्रे, सूरज पाटील, किरण इरकर, राहुल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सांगली पोलीस बँड पथकाचे परेडसाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस यांनी तर आभार प्रदर्शन सहायक वनसंरक्षक कल्याणी यादव यांनी केले.
कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस, सहायक वनसंरक्षक तथा सत्र संचालक कल्याणी यादव, दत्तात्रय शेटे, अर्जुन सोनवणे, सहयोगी प्राध्यापक रमेश लिधडे, निवृत्त मुख्य वनसंरक्षक एम.एम. कुलकर्णी, निवृत्त उपवनसंरक्षक श्री. माणिक भोसले. निवृत्त विभागीय वन अधिकारी श्री. एस. डी. खैरनार, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, सुखदेव खोत व इतर अधिकारी कर्मचारी, वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थीचे पालक, एन.सी.सी. कॅडेट व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- जिल्हाधिकाऱ्यांनी जत तालुक्यात नुकसानीची केली पाहणी
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : जत तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माडग्याळ, उमदी, हळ्ळी, सोनलगी आदि गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन शेतकऱ्यांनी कृषि व महसूल विभागाशी त्वरित संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जत अजयकुमार नष्टे, तालुका कृषि अधिकारी प्रदीप कदम, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, मंडळ अधिकारी अभिजीत गाढवे, ग्रामविकास अधिकारी तिटकारे, सरपंच श्री. माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माडग्याळ येथील चौगुले वस्तीवरील शेतकरी राम चौगुले यांच्या शेतातील नुकसानग्रस्त बाजरी व मका पिके तसेच मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झालेले घर याची पाहणी केली. जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख, बोरलगी, सोनलगी, सुसलाद, उमदी आदि गावांमध्ये बाजरी, मका, फळबाग यांसह अनेक पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शासनाकडून नुकसानभरपाई प्रस्ताव वेळेत पाठविण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कार्यवाहीस सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
00000
आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मौजे विठलापूर, दिघंची, पळसखेल व आवळाई या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन महसूल व कृषी विभागातील संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून दिली जाईल. शेतकऱ्यांनी धैर्याने या संकटाचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला.
00000
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात प्रथम
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : राज्य शासनाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयान्वये गणशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्यात येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2025 मधील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पारितोषिक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नावे घोषित करण्यात आली असून खानापूर तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ विटा या मंडळास राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
जिल्हास्तरीय व्दितीय क्रमांक मोरया गणेश मंडळ, येडेनिपाणी, ता. वाळवा व तृतीय क्रमांक शिवाजी गणेशोत्सव मंडळ मिरज, ता. मिरज यांना प्राप्त झाला आहे.
तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त गणेशोत्सव मंडळ पुढीलप्रमाणे –ओमकार गणेश मंडळ, मायथळ ता. जत, नवतरूण गणेश मंडळ माळेवाडी ता. शिराळा, वर्चस्व गणेशउत्सव मंडळ ता. पलूस.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२५ मधील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रु.७,५०,०००/-, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रू. ५,००,०००/- व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रु. २,५०,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.४०,०००/- व रु.३०,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे आणि तालुकास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस प्रत्येकी रु. २५,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
00000
मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासातील संधी ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- शासकीय तंत्रनिकेतन, मिरजमध्ये डिजीटल सुविधा, सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन
- डिजीटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान मिळवण्याची सुवर्णसंधी
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : डिजीटल सुविधांच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञानाचे भांडार प्राप्त करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होत असून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, रोजगार क्षमता व तंत्रज्ञानातील संशोधनात भर पडण्यास मदत होत आहे. तसेच उद्योगांच्या नव्या संधींचा शोध घेण्यास मदत होत आहे. भविष्यात मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासामध्ये अनेक संधी असून, ती ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कार्यान्वित सौर विद्युत प्रकल्प व अत्याधुनिक डिजिटल सुविधा प्रकल्पच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तंत्रशिक्षणचे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, प्राचार्य डॉ. संजय परदेशी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कला, वाणिज्य शाखा जीवनात समृद्धी आणतात. मात्र, कौशल्य विकास आणि तंत्रशिक्षणाला जगात महत्त्व आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असून, विद्यार्थ्यांना आवश्यक उपकरणे, प्रयोगशाळा आणि नवकल्पनांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे शिक्षण घेऊन नवकल्पनांच्या माध्यमातून स्वामित्त्व हक्क घेऊन दैनंदिन जीवनात आवश्यक अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनांची चलती आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनवायचे आहे, हे सांगताना त्यांनी प्लास्टीकपासून इंधन, महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले छोटे रिंगरूपी यंत्र यांचे दाखले दिले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्क माफीमुळे असे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्या पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट झाली आहे. मुलींनी स्टार्ट सुरू करण्यात भारत जगात पहिल्या स्थानी आहे. मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या अनुषंगाने जपान देशातील सहा विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येत असून, या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना तिथे राहून मोफत निवास, भोजनाच्या सुविधेसह अद्ययावत तंत्रशिक्षण घेता येणार आहे. हे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात नवसर्जनशीलतेने संशोधन करावे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिमोटची कळ दाबून महाविद्यालयातील डिजिटल सुविधा प्रकल्पाचे तसेच कोनशीला अनावरण करून सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची पाहणी मान्यवरांनी केली.
प्रास्ताविकात डॉ. दत्तात्रय जाधव यांनी सौर विद्युत प्रकल्प व अत्याधुनिक डिजिटल सुविधा प्रकल्पांमुळे होणारे फायदे विषय करत या प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले. सरस्वतीपूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांना अद्ययावत डिजीटल सुविधा उपलब्ध
संस्थेतील शैक्षणिक वातावरण आल्हाददायक असावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्च तंत्रनिकेतनांमध्ये फेस लिफ्टींग प्रोजेक्ट सुरू केले असून यातून संस्थेतील सर्व इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सदर प्रकल्प पुढील २-३ महिन्यात पूर्ण होईल. तसेच संस्थेतील वातावरण सुरक्षित असावे, यासाठी संपूर्ण संस्था परिसर CCTV च्या निगराणी मध्ये आणण्यासाठीचा प्रकल्प देखील पूर्ण करण्यात आला आहे.
महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) नुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांच्यात तांत्रिक ज्ञानाबरोबर औद्योगिक कौशल्ये, आर्थिक बाबी, पर्यावरण संतुलन व उच्च नीतिमूल्ये बिंबविणे आवश्यक आहे. यासाठी वर्गखोली व प्रयोगशाळेतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईन डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी अत्याधुनिक डिजीटल सुविधा या संस्थेमध्ये स्थापित करण्यात आलेली आहे.
या सुविधेमध्ये प्रामुख्याने 24 Interactive LED Panels, 06 LCD Projector, 10 Laptops, 24 UPS, 40 Pen Drive, 22 Pointer, 02 Microphone with Speaker आणि 01 Digital Podium इत्यादी साहित्य उपलब्ध झाले आहे. या अत्याधुनिक सुविधामुळे Teaching Leaming Process ही कालानुरुप Updated इगलेली आहे. तसेच या सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील तसेच व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रकल्प, प्रणाली (Software) यांचा लाभ घेणे सुकर झाले. त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील e-content, digital contant तयार करण्यात मोलाची मदत होत आहे.
सौर विद्युत प्रकल्पामुळे आर्थिक बचत
दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे "80 KW क्षमतेचा पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प असून यामुळे वर्षाला जवळजवळ ९८,१६० युनिट सौरऊर्जा निर्मिती होणार आहे. यामुळे वार्षिक अंदाजे ८ ते १० लाख इतकी आर्थिक बचत होण्यास मदत होईल. तसेच अंदाजे ८५ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून या प्रकल्पाचे महत्व आहे.
00000
वारणा धरणात 34.12 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.12 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.38 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.91 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.12 (34.40), राधानगरी 8.24 (8.36), दूधगंगा 21.78 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.77 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 121.61 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 5300, धोम 505, कण्हेर 340, धोम बलकवडी 330, वारणा 1630, राधानगरी 500, दुधगंगा 300, तुळशी 50, कासारी 300, पाटगाव 291, हिप्परगी बॅरेज 34 हजार 259 व अलमट्टी धरणातून 12 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13 (40) व अंकली पूल हरिपूर 10.2 (45.11).
00000
जिल्ह्यात सरासरी 1 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.4 (395.6), जत 3.2 (515), खानापूर 0.1 (432.1), वाळवा 0.0 (516.1), तासगाव 0.0 (463.5), शिराळा 0.1 (1210.3), आटपाडी 10.2 (508.5), कवठेमहांकाळ 0.0 (464), पलूस 0.0 (457.6), कडेगाव 0.0 (408.5).
00000
परिसराबरोबरच वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- एनएसएस युनिटच्यावतीने “स्वच्छता ही सेवा” अभियान
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : “माझे घर, माझी कॉलनी, माझा गाव, माझी शाळा, माझे महाविद्यालय आणि माझे कार्यालय या भावनेने ते स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान 2025 अंतर्गत “एक दिन, एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष लताताई देशपांडे, उपाध्यक्ष स्मिता केळकर, विभागीय सहसंचालक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विलास कदम, प्राचार्य डॉ. अनिल सुगते, उपप्राचार्य डॉ. नंदिनी काळे, कार्यवाह यशश्री आपटे, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सेवा पंधरवड्यामध्ये दिनांक 17 सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत स्वच्छतेचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, गरीब वस्त्यांमध्ये जावून आर्थिक मदत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात येत असून, या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
आज आपण पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एनएसएसच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम गावागावांमध्ये राबविले जातात. यामधून समाजातील सद्यस्थिती लक्षात कळते व भविष्यात समाज हितासाठी निर्णय केले जातात. या माध्यमातून राष्ट्रीय सेवा युनिट चांगला नागरिक तयार होण्यासाठी मदत करते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली व परिसरात स्वच्छता केली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अनिल सुगते यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
00000
बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५
वारणा धरणात 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.60 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.91 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.16 (34.40), राधानगरी 8.26 (8.36), दूधगंगा 21.76 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.77 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 121.61 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 8500, धोम 505, कण्हेर 640, धोम बलकवडी 330, वारणा 1630, राधानगरी 500, दुधगंगा 300, तुळशी 50, कासारी 300, पाटगाव 291, हिप्परगी बॅरेज 38 हजार 748 व अलमट्टी धरणातून 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13.6 (40) व अंकली पूल हरिपूर 11.3 (45.11).
00000
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2 लाक्ष 50 हजार रूपये पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.
या योजनेतंर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतेलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरिता तसेच थेट द्वितिय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज दि. २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांच्या कार्यालयात दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2 लाक्ष 50 हजार रूपये पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.
या योजनेतंर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरिता तसेच थेट द्वितिय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज दि. २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांच्या कार्यालयात दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि.19 ते दि.29 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सुरु असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगीक सर्व कागदपत्रे (सहाय्यक संचायक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुना बुधगांव रोड,सांगली) या कार्यालयास दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधिक्षक मोबा. क्र. 9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधिक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000000
नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी मिरज येथे बुधवार दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
नगर भूपापन अधिकारी सांगली अधिनस्त नगर भूमापन कार्यालय मिरज येथे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकामी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी फेरफार अदालतीचे 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000000
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : सांगली जिल्हास्तरीय विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता ठरला. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजातून विरंगुळा मिळावा या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश व्यक्त करताना म्हणाले, ही स्पर्धा होती, संघर्ष नव्हता, खेळाचा आनंद घेणारा खरा खेळाडू असतो. यावर्षी 29 ऑगस्टला ही स्पर्धा सुरू केली. दरवर्षी 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी या स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
विविध विभागांच्या 16 संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आली होती. शनिवार व रविवार अशा सुट्टीच्या दिवशी या स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने पार पडले. उपांत्य फेरीत पोलीस विभाग, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, वैद्यकीय महाविद्यालय मिरज व कृषी विभाग या संघाने प्रवेश केला होता. अंतिम सामना पोलीस विभाग व महावितरण यांच्यात झाला.
प्रथम फलंदाजी करत 5 षटकात महावितरणने 55 धावांचा टप्पा पार केला. प्रतिउत्तरादाखल पोलीस संघाने 3 षटके 1 चेंडूत 58 धावा काढून 11 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकून प्रथम क्रमांकाच्या प्रशासन चषकावर आपले नाव कोरले. महावितरण संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत आणि क्रीडा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
00000
महिलांसाठीच्या योजनांच्या एकत्रित माहिती संकलनातून महिला सक्षमीकरणाचा ध्यास
नवरात्रोत्सव विशेष वृत्तमालिका भाग 1
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा अभिनव उपक्रम
- प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे महिलांना सक्षम करण्याचा मार्ग सुलभ
सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महिलांचे सक्षमीकरण हे आजच्या सशक्त समाजाचे मुख्य अधिष्ठान मानले जाते. या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा प्रशासनांतर्गत विविध विभागांतून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती व लाभाचे एकत्रित संकलन करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणे व योजनांचा लाभ देणे सुलभ होईल. याअंतर्गत महत्त्वाच्या विविध योजनांच्या महिला लाभार्थींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. गत वर्षी जिल्ह्यातील 28 शासकीय विभागांतून महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, या लाभाची अंदाजे २५ लाख नोंद प्राप्त झाली आहे. ही संख्या लाभप्रकरणांची असून, एका पात्र मुलगी, युवती किंवा महिलेला एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या योजनेतून लाभ देण्यात आल्याची ही एकत्रित नोंद असल्याची माहिती विविध विभागाकडून प्राप्त झाली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिथे नारीला समानतेचा मान मिळतो, तिथेच समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो. त्यामुळे महिला सक्षमीकरण हा सामाजिक व आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक असून त्यासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या एकत्रिकरणासाठी बैठका घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र महिला नोडल अधिकारी नेमण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विभागांच्या महिलांविषयक योजनांची एकत्रित नोंद होण्यास मदत झाली आहे. या एकत्रित माहिती संकलनाचा उद्देश केवळ माहिती जमा करणे नसून, महिलांना शिक्षण, आरोग्य, उद्योजकता, रोजगार, सामाजिक सुरक्षा व कायदेशीर सहाय्य यासारख्या सर्व क्षेत्रांत सशक्त बनविणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महिला लाभार्थींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, साधारणतः एखादी महिला, युवती किंवा मुलगी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेते. या पार्श्वभूमिवर प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 28 विभागांनी महिलांना लाभ देणाऱ्या त्यांच्याकडील योजनांची माहिती गुगल फार्ममध्ये भरून दिली आहे. त्यानुसार प्रामुख्याने महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 7,05,314 महिलांना लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा 11,75,226 इतक्या महिलांना लाभ देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातून लेक लाडकी योजनेचा 3165 लेकींना लाभ मिळालेला आहे. त्याचबरोबर महसूल विभागाकडून लक्ष्मीमुक्ती योजनेत मालमत्तेत समान वाटामध्ये 9315 महिलांची नावे 7/12 वरती नोंदवण्यात आली आहेत. शिक्षण विभागाच्या योजनांचा प्रधानमंत्री पोषण अभियान शक्ती निर्माण व मोफत पाठ्यपुस्तके या योजनेतून 1,08,6,80 मुलींना लाभ मिळाला आहे. तसेच मोफत गणवेश व बूट, पायमोजे 57947 मुलींना वितरित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 52023 गर्भवती व स्तनदा मातांना लाभ देण्यात आला आहे. अन्य सामाईक योजनांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून 467 महिलांना लाभ मिळाला आहे. तसेच तहसिलदार संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 32,347 महिलांना सामाजिक आर्थिक सहाय्य मिळाले आहे. गत वर्षी विविध 28 विभागातून अंदाजे 25 लाख महिला लाभार्थीना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अभिनव उपक्रमासाठी उपजिल्हाधिकारी नीता सावंत शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राऊ देशमुख यासाठी समन्वय करत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून उचललेल्या या पावलामुळे योग्य मार्गदर्शनासह महिलांना योजनांची माहिती एका ठिकाणी मिळण्याबरोबरच पात्र, वंचित लाभार्थींपर्यंत मदत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
00000
बचतगटाच्या मदतीतून रचला संगिता कोळींनी “सरस” पाया
- बाराशे रूपयांतून सुरू केला काजू प्रक्रिया उद्योग
- स्वीट कोकमला देशभरातून मागणी
- जिद्द, परिश्रम, चिकाटीच्या जोरावर वार्षिक उलाढाल 25 लाख
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना व स्वयंसेवी संस्था प्रयत्नरत आहेत. मात्र, अशा संधीचा उपयोग करून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणाऱ्या महिलाच खरी समाजपरिवर्तनाची गाथा लिहितात. वाळवा तालुक्यातील कारंदवाडीच्या संगिता रामचंद्र कोळी यांनी ही प्रेरणा सर्वांसमोर ठेवली आहे.
संगिता कोळी यांचा स्वीट कोकम, काजू, बेदाणा व सुका मेवासाठीचा “सरस” हा ब्रँड आता राज्य-परराज्यात सरस ठरला आहे. 1200 रूपयांच्या कर्जापासून सुरू झालेला हा प्रवास आज वार्षिक 25 लाख रूपयांच्या उलाढालीवर येऊन स्थिरावला आहे. गेल्या 35 वर्षांतील संघर्ष, जिद्द, चिकाटी व परिश्रम यांच्या पायावर संगिताताईंनी ही भरारी घेतली आहे.
याबाबत संगिता कोळी म्हणाल्या, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने दहावी झाल्यावर 1990 मध्ये लगेच माझे लग्न करण्यात आले. माझे पती पदवीधर होते. मात्र नोकरी नसल्याने ते व सासू, सासरे शेतीमध्ये रोजंदारीवर जायचे. त्यांच्यासोबत मीही रोजंदारीवर जावू लागले. रोजंदारी करत करत आठवडी बाजारात भाजी विकण्याचेही काम मी 1995 पर्यंत केले. दरम्यान माझ्या दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर मला स्वतःचा व्यवसाय करावा, असे वाटायचे. माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिले व बेदाणा विक्रीचा सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.
1995 च्या दरम्यान तासगाव येथून बेदाणा खरेदी करून त्या सांगलीतील गणपती पेठेत विकत असत आणि पुन्हा सायंकाळी कारंदवाडीला परतत असत. हे करताना तीन वर्षांचा एक आणि तीन आठवड्यांचा एक अशी स्वतःची दोन चिमुकली मुले सोबत घेऊन त्यांनी हा प्रवास केला. दोनच वर्षांत त्या या बेदाणा विक्रीच्या व्यवसायात तरबेज झाल्या. त्यानंतर मामांच्या पावलावर पाऊल ठेवत जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या महाबळेश्वर येथे रस्त्यावर बसून बेदाणा विक्री करण्यास त्यांनी सुरवात केली.
नवसहस्त्रक उजाडताना संगिता कोळी यांना व्यवसायवाढीचे वेध लागले. 2003 च्या आसपास त्या तत्कालिन वीराचार्य व नामकरणानंतर आताच्या ज्ञानदा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्या झाल्या. बचत गटाच्या माध्यमातून त्यावेळी त्यांना बाराशे रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी काजू प्रक्रियेचे यंत्र खरेदी केले. त्यासाठी काजू प्रक्रियेचे रीतसर प्रशिक्षणही घेतले आणि सांगली जिल्ह्यातील पहिला नोंदणीकृत काजू प्रक्रिया प्रकल्प सरस या नावाने त्यांनी सुरू केला. इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आणि त्यांनी पुन्हा मागे वळून बघितले नाही.
संगिता कोळी म्हणाल्या, बचत गटाच्या मदतीनंतर हुतात्मा सहकारी बँक, आष्टाच्या मदतीने मला बीजभांडवल म्हणून 45 हजार रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून मी बेदाणे, काजूबरोबर सुका मेवाही विकू लागले. साधारण 15 वर्षांपूर्वी एका प्रयोगातून मला आमच्या स्वीट कोकमचे उत्पादन गवसले आणि हीच आमची आज स्पेशालिटी आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात आमचे सरस स्वीट कोकम विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूर्ण देशभरात स्वीट कोकम हे आमचेच प्रॉडक्ट आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
प्रसंगी घाटातून पिकअप शेड चालवले. वाहनातून 50 किलोची पोती घरी उतरवली. कारंदवाडी, तासगाव, सांगली ते पुन्हा कारंदवाडी असा दर दिवशी प्रवास केला, हे जुने प्रसंग सांगताना संगिताताई आजही गहिवरतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला असूनही कच्चा माल खरेदीसाठी त्या एकटीने विमानप्रवास करतात.
बाजारपेठ ओळखून महाबळेश्वर हे विक्रीचे ठिकाण म्हणून निवडले. सातत्याने मेहनत, दर्जेदार मालाची जपणूक आणि ग्राहकांशी विश्वासार्ह संबंध याचबरोबर मालाचा दर्जा व दर यांची योग्य सांगड घातल्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे गमक असल्याचे संगिता कोळी सांगतात.
बचत गटाच्या 1200 रूपये कर्जापासून सुरू झालेला प्रवास आज वार्षिक 25 लाखाच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारंदवाडी येथील युनिटमध्ये उत्पादन निर्मिती आणि महाबळेश्वरसह प्रत्येक राज्यात विक्री करण्यात त्यांचा जम बसला आहे. महाबळेश्वर येथे त्यांनी स्वतःचे घरही घेतले आहे. पती, दोन मुलांसह सुना, नातवंडे असे कौटुंबिक पसारा वाढून संगिता कोळी यांचे दहा सदस्य आहेत. मुलं आणि सुनाही आता त्यांच्या कारभारास हातभार लावत आहेत.
संगिता कोळी यांनी आपली प्रगती साधताना आपल्या व्यवसायातून १० ते १५ महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यातून त्यांनी अनेक कुटुंबांची आर्थिक घडी मजबूत केली आहे. त्यांच्या उपक्रमाला माविम व नाबार्डसारख्या संस्थांचेही पाठबळ लाभले आहे. सांगली, पुणे, मुंबई येथे झालेल्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या बचत गटाने सहभाग घेतला. या प्रदर्शनांमुळे त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळालीच, पण इतर महिलांनाही विक्री कौशल्ये, मार्केटिंग व ग्राहकांशी व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
फक्त व्यवसायापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी समाजकार्याची जबाबदारीही जोपासली आहे. ‘महाबळेश्वर ट्रेकर’ या संघटनेतील त्या एकमेव महिला सदस्य असून, त्यांनी महापूर व इतर आपत्तीच्या काळात पोलिस व प्रशासनाला विनामोबदला मदत केली आहे. त्यांच्या या कार्यातून सामाजिक भान, संघटन कौशल्य आणि समाजाशी असलेली नाळ याची प्रचिती येते.
बचत गटाच्या महिलांशी संवाद साधताना संगिता कोळी यांच्या व्यवसायाचा पाया रचला गेला. जीवनाला दिशा मिळाली. आत्मविश्वास वाढला. बचत गट हा फक्त बचतीपुरता नसून, आपले आर्थिक सबलीकरण करून सामाजिक उन्नतीसाठी मदत करू शकतो, हे त्यांनी जाणले. त्यामुळे आजही स्वतंत्र व्यवसाय करताना त्या बचत गटाच्या सक्रिय सदस्या आहेत. एकूणच संगिता कोळी यांच्या कार्याने महिलांना धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची दिशा दिली आहे.
लेखन - संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी
समन्वय - वर्षा पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
संकलन - राऊ देशमुख, समुपदेशक
00000
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सांगली यांच्या न्यायासनाकडे दाखल अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सांगली कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ब्लॉक नं 101 विजयनगर, सांगली येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठीया यांनी केले आहे.
00000
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील/डिप्लोमा तृत्तीय वर्षातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सन २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षात इ.१२ वी विज्ञान शाखेमध्ये व पदवीका तृतीय वर्षात शिकत असलेल्या अनु. जाती., विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सा.शै.मा.प्र. (मराठा) (SC, VJ, NT, OBC, SBC, SEBC) या संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.
अर्जदारांनी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, १५ A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहीत नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावे व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार/ पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. तसेच २०२५-२६ वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रम राखीव प्रवर्गावरील प्रवेश प्रक्रियेतील ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत. तथापि, छाननीनंतर ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आहेत अशा अर्जदारांना ऑनलाईन प्रणालीतून त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर त्रुटी कळविलेली आहे. अशा सर्व अर्जदारांनी त्रुटी पूर्ततकेकरीता अद्याप समिती कार्यालयास संपर्क साधला नसल्यास, दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत समिती कार्यालयात मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा - डॉ. ओमप्रकाश शेटे
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज केले.
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकत्रित आयुष्मान भारत योजनेतील सूचिबद्ध रूग्णालयांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यातील 4 हजार 180 रूग्णालयांना मान्यता दिली असून त्यापैकी 2 हजार 472 सूचिबद्ध रूग्णालयांतून उपचार दिले जाणार आहेत. तसेच 34 विशेष स्पेशालिटी उपचार पध्दती सुरू केलेली आहे. याबरोबरच कार्पोस निधीमधून 10 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचाही समावेश केला आहे. रूग्णालयांचे वर्गीकरणही आता बंद करण्यात आले आहे. रूग्णालयांना सुधारीत पॅकेजमध्ये पॅकेजव्यतिरीक्त NABH मानांकित रुग्णालयास 15 टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन रूग्णालये सूचिबद्ध करा असे सांगून डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, सामान्य रूग्णांच्या आरोग्याबाबत संवेदनशील राहावे. या माध्यमातून रूग्णांची सेवा करता येणार आहे. धर्मादाय रूग्णालये व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने लवकरच एक चॅटबोटच्या आधारावर स्वतंत्र ॲप विकसीत करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये संवाद साधून रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्या नजीकच्या सूचिबध्द रूग्णालयाची माहिती मिळवू शकणार आहेत. टोल फ्री क्रमांक 18002332200 या क्रमांकावर संपर्क साधूनही आवश्यक माहिती मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा घरेलु कामगार महिला यांच्या आरोग्य शिबिराचा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन करून डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, हा उपक्रम पथदर्शी असून तो राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रयत्न करू. सांगली जिल्ह्याशी आपला वेगेळा ऋणानुबंध आहे. सांगली जिल्ह्याने भरीव कामगिरी केल्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या हृदयशस्त्रक्रियेचा अनोखा उपक्रम आज संपूर्ण राज्यात सुरू आहे. आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असताना सांगली जिल्ह्याने केलेला सत्कार आपल्या सदैव स्मरणात असून, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात 91 रूग्णालये सूचिबध्द आहेत. या रूग्णालयांची संख्या वाढवावी अशी सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.
यावेळी दिनांक 9 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेल्या एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, आयुष्मान भारत कार्ड वितरण तसेच, सांगली जिल्हा घरेलु कामगार महिला यांच्या आरोग्य तपासणी मध्ये निदान झालेल्या रुग्णांचे आयुष्मान भारत योजनेमध्ये मोफत उपचार करण्यासह विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुंबे यांनी एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री आयुष्मान योजना यांचा आढावा सादर केला. यावेळी धर्मादाय व अन्य सूचिबद्ध रूग्णालयाच्या वतीने डॉ. अनिरूद्ध पाटील, डॉ. संजय पाटील व डॉ. विजया देवकुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
00000
सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना
- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली अंतर्गत जिल्ह्यांतील 75 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. यापैकी 31 बालके आज मोफत हृदय शस्त्रक्रियांकरिता मुंबईला रवाना झाली.
या बालकांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी, बालके व त्यांचे पालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना व प्रयत्नामधून सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2 डी इको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या 31 बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर दरम्यान देशात राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालय, एमआरआर हॉस्पिटल या पंचतारांकित रूग्णालयाच्या ठिकाणी पाठविण्यात आले. मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह या बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून, या बालकांना घेऊन बस रवाना झाली. यावेळी मुलांना प्रवासात आवश्यक अन्न व पाण्याचे किट देण्यात आले.
शस्ञक्रियेकरिता पाठविण्यात आलेल्या 31 हृदयरोग बालकांच्या शस्ञक्रियेकरिता प्रति शस्त्रक्रिया चार लक्षप्रमाणे जवळपास 1 कोटी 20 लक्ष इतका खर्च अंदाजित आहे. या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य योजना, खाजगी रक्कम दाते, धर्मादाय संस्था इत्यादिमधून अनुदान उपलब्ध करून पूर्णपणे मोफत होणार आहेत. बालकांच्या शस्ञक्रियेकरिता आवश्यक असणारे अनुदान उपलब्ध करण्याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबतचे आश्वासन श्री. शेटे यांनी यावेळी दिले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम हे या शिबिराचे आयोजक असून, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस या कार्यक्रमाचे नियोजन करित आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1865 लाभार्थींच्या हृदय शस्त्रक्रिया व 23479 लाभार्थींच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांतील गरजू बालकांच्या पालकांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सांगलीशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
00000
फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : फळ महोत्सवाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमिवर हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. पणन विभागाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून, सांगलीकरांनी या फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
सांगली फळ महोत्सव-2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन, मार्केट यार्ड येथे आयोजित या महोत्सवास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, बाजार समिती सांगलीचे उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक सर्वश्री संग्राम पाटील, शशिकांत नागे व प्रशांत मजलेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, पणन अधिकारी ओंकार माने आदि उपस्थित होते.
आपली सांगली, माझा अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकराने मनात ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी आहेत. येथील फळ उत्पादन वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोडीस तोड ही फळे आहेत. जतमधील पेरू, आटपाडी, कवठेमहांकाळ मधील ड्रॅगनफ्रुट आता चमकू लागले आहेत. पूर्वी आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन खाल्ली जात आहेत. त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फळ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी करत वेगवेगळ्या फळांची अधिक माहिती जाणून घेतली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्यावतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून “सांगली फळ महोत्सव-2025” चे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव 21 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगनफ्रुट, डाळिंब, पेरू, सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
00000
गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५
जातीचे दाखले तयार करण्यासाठी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या - तहसिलदार अश्विनी वरूटे
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "सेवा पंधरवडा" राबविण्यात येत आहे. दिनांक 19 संप्टेंबर 2025 रोजी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विमुक्त भटक्या जाती जमातीच्या नागरिकांना जातीचे दाखले तयार करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन माधवनगर गोसावी गल्ली कुपवाड व वडर कॉलनी सांगली येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये गोसावी, वडर, माकडवाले, कुंची-कोरवी, गारुडी इत्यादी जातीच्या लोकांना शासकीय फी मध्ये जातीचा दाखला तयार करुन दिला जाईल. या शिबीराचा जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे.
00000
पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची 23 सप्टेंबर अंतिम मुदत
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी इयत्ता 9 वी आणि 11 वी कला व विज्ञान या शाखांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 जुलै 2025 पासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 23 सप्टेंबर 2025 आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ही प्रवेश परीक्षा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पलूस येथील केंद्रावर होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे विज्ञान शाखेबरोबरच कला शाखा सुरू करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील 8 वी च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 9 वी करीता https://cbseitms.nic.in/2025/nvsix 9 या लिंकवर तसेच 10 वी च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 11 वी करीता https://cbseitms.nic.in/2025/nvsxi 11 या लिंकवर प्रवेश अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज भरताना काही समस्या असल्यास विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत देशपांडे मो.नं. 7972870877, विलास शहापूरकर मो. नं. 9423575901 यांच्याशी संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त विशेष मोहिमेंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या योजना, सेवांचा लाभ घ्या - प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिक-केंद्रित सेवा आणि योजनांचा प्रचार करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. या सर्व योजनांचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना व सेवांमध्ये पुढील प्रमुख बाबींचा समावेश आहे.
प्रमुख योजना आणि सेवा
सलोखा योजना - शेतजमिनींच्या ताबा, वाटणी आणि मालकी हक्कांशी संबंधित वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ 1 हजार रूपये मुद्रांक शुल्क आणि 1 हजार रूपये नोंदणी शुल्क भरून जमिनींची अदलाबदल करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो, तसेच न्यायालयीन प्रक्रियेची गरज राहत नाही.
शेतजमीन वाटणीपत्र - शेतजमिनीच्या वाटणीपत्रातील मिळकतीचे मूल्य 100 रूपये पेक्षा अधिक असल्यास, त्याची नोंदणी करणे सक्तीचे आहे. महसूल अधिकाऱ्याद्वारे केलेल्या वाटणीला नोंदणीची सक्ती नाही, परंतु त्यासाठी मुंबई मुद्रांक अधिनियम 1958, अनुच्छेद 46 नुसार मुद्रांक शुल्क भरावे लागते. महसूल अधिकाऱ्याद्वारे केलेल्या वाटणीशिवाय, इतर सर्व वाटणीपत्रांची नोंदणी बंधनकारक आहे.
मुद्रांक शुल्क माफी आणि सवलत
शैक्षणिक कर्ज - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील मुद्रांक शुल्कात पूर्ण माफी आहे.
सौर कृषी वाहिनी योजना - या योजनेतील ठराविक कागदपत्रांवर मुद्रांक शुल्कात पूर्ण सवलत दिली आहे.
प्रतिज्ञापन (Affidavit) - शैक्षणिक आणि शासकीय प्रमाणपत्रांसाठी आवश्यक प्रतिज्ञापत्रांवर पूर्ण माफी आहे.
महिला घर खरेदीदार - महिलांना निवासी सदनिका/ बांधीव घर मिळकत खरेदी करताना मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत मिळते.
प्रधानमंत्री आवास योजना - या योजनेअंतर्गत दस्त नोंदणीसाठी फक्त 1 हजार रूपये मुद्रांक शुल्क आकारले जाते.
रक्ताच्या नात्यातील हस्तांतरण - पती-पत्नी, मुलगा-मुलगी, नात-नातू, मयत मुलाची पत्नी यांच्यातील घर किंवा शेतजमिनीच्या विना मोबदला बक्षीसपत्रव्दारे हस्तांतरणासाठी फक्त 200 रूपये मुद्रांक शुल्क आणि 1 टक्के अधिभार लागतो.
एक जिल्हा, एक नोंदणी - या सुविधेमुळे मालमत्ता ज्या जिल्ह्यात आहे, त्याच जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येते. यामुळे वेळ आणि खर्चात बचत झाली असून सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे.
फेसलेस रजिस्ट्रेशन (Faceless Registration) - ही एक पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया आहे, ज्यात भाडेकरार, प्रथम विक्री करार (Agreement to Sale), दत्तकपत्र (Adoption Deed) आणि मुखत्यारपत्र (Power of Attorney) यांसारखे दस्त नोंद करणे शक्य आहे. ही सेवा 24 X 7 उपलब्ध आहे आणि यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.
इतर ऑनलाइन सुविधा
नागरिकांसाठी पीडीई, ई-एएसआर, ई-मूल्यांकन, ई-पेमेंट, ई-सर्च, आणि विवाह नोंदणी यांसारख्या अनेक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ई-सर्च (e-Search) - या सुविधेमुळे मालमत्ता नोंदी व व्यवहाराचे तपशील ऑनलाइन पाहता येतात. वापरकर्ते मालमत्तेच्या तपशिलावरून किंवा दस्त क्रमांकावरून माहिती शोधू शकतात.
विवाह नोंदणी - विवाहांसाठी आवश्यक नोटीस/अर्ज ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून, सर्व तपशील, कागदपत्रे आणि शुल्क ऑनलाइन भरता येतात.
00000
जिल्ह्यात सरासरी 12.2 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 12.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 49.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.2 (384.6), जत 49.1 (458.8), खानापूर 10.6 (371.8), वाळवा 5.7 (509.9), तासगाव 5.4 (417.5), शिराळा 0.3 (1173.7), आटपाडी 4.9 (422), कवठेमहांकाळ 27.7 (410.3), पलूस 0.7 (448.5), कडेगाव 2.3 (368.7).
00000
रणा धरणात 34.06 टी.एम.सी. पाणीसाठा
वा
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे - कोयना 104.07 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.07 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.91 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.06 (34.40), राधानगरी 8.25 (8.36), दूधगंगा 21.53 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.68 (2.77), पाटगांव 3.71 (3.72), अलमट्टी 122.66 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे –धोम 505, कण्हेर 40, राधानगरी 300, दुधगंगा 300, तुळशी 50, हिप्परगी बॅरेज 31 हजार 798 व अलमट्टी धरणातून 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलांच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 11.9 (40) व अंकली पूल हरिपूर 8 (45.11).
00000
मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५
चौकीदार पदासाठी 23 सप्टेंबरला अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात अशासकीय चौकीदार पद भरावयाचे आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व अन्य आवश्यक कागदपत्रे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. चौकीदार पदासाठी माजी सैनिक आल्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
महानगरपालिका आयुक्त यांचा 24 सप्टेंबरला मनपा हद्दीतील माजी सैनिकांशी संवाद मेळावा
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीतील माजी सैनिकांचा सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संवाद मेळावा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता आयोजित केला आहे. हा मेळावा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने आयुक्त यांच्याकडून माजी सैनिकांच्या, वीर पत्नी तसेच वीर माता व पिता यांच्या महानगरपालिका संबंधित अडीअडचणीबाबत मार्गदर्शन तसेच निराकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
00000
सेवा पंधरवड्यात नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा - मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ मिरज उपविभागातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या विशेष अभियानाचा उद्देश नागरिकांना विविध महसूल सेवा पारदर्शकतेने, तात्काळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या काळात सामान्य शेतकरी, नागरिक, घरकुल लाभार्थी तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचे उपक्रम पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यात नागरिकांना सेवा पुरविल्या जाणार आहेत. महसूल विभागाचा हा उपक्रम पूर्णपणे लोकाभिमुख आहे. या सेवा पंधरवड्यात महसूल सेवांचा जलद व पारदर्शक पुरवठा, तक्रारींचे त्वरित निवारण व शासन योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रमुख ध्येय आहे. तीन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे उद्दिष्ट हे महसूल विभागाच्या सेवांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आहे.
मिरज उपविभागातील अपर तहसिल सांगली, मिरज, तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यात तीन टप्प्यांत पुढीलप्रमाणे अभियान राबवण्यात येणार आहे.
पहिला टप्प्यात दिनांक 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत पाणंद रस्तेविषयक मोहिमेंतर्गत ग्राम समेचे आयोजन करणे, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी स्तरावर सर्व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, सर्व संबंधित शेतकऱ्यांशी सुसंवाद व समन्वय साधणे व संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली ठेवणे इत्यादी.
दुसरा टप्प्यात दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत अतिक्रमित बांधकामांचे सर्वेक्षण करणे, गावठाण वाढ विस्तार योजनेतील शिल्लक भूखंडांची माहिती घेणे, घरकुल पात्र लाभार्थी यांच्या याद्या प्राप्त करुन घेणे, अतिक्रमीत बांधकामांचे प्रस्ताव ग्रामसेवक यांच्याकडून प्राप्त करून घेणे, प्राप्त प्रस्ताव शक्ती प्रदत्त समिती समोर ठेवणे, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे.
तिसरा टप्प्यात दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोट खराब अ क्षेत्राचे सर्वेक्षण करणे, लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत 7/12 पडताळणी करून लाभार्थी निश्चित करणे इत्यादी, "शेतकरी संवाद" आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर थेट चर्चा व उपाययोजना केली जाणार आहे. अन्नपुर्ण शिधापत्रीका (दिव्यांग लाभार्थी यांना अंत्योदय शिधापत्रिका देणे) इत्यादी.
00000
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन प्रवेशित व नूतणीकरण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे ऑनलाईन अर्ज दि. 30 जून 2025 पासून https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेत स्थळावर स्विकारण्यात येत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सन 2023-24 मध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटींची पुर्तता अद्याप झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांकरिता Re-Apply TAB उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याकरीता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सांगली कार्यालय, जुना बुधगांव रस्ता, सामाजिक न्याय भवन सांगली येथे संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आय.सी.आय.सी.आय. बँक आणि एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने री-केवायसी शिबिर घेण्यात आले. जाखोटिया मंगल भवन माधवनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक जीनो जया सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक के. सुनिता दुर्गा, भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक आशुतोष भिडे, सुधीर कुमार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, रिझर्व्ह बँकेचे अक्षय गोंडेवार, प्रीती पवार, सचिन कुलकर्णी, अमोल पाटील व 250 च्या आसपास ग्राहकवर्ग उपस्थित होते.
यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक जीनो जया सिंग यांनी R-KYC करणे, शिबिरात नवीन जनधन खाते उघडणे, तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती व सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना विषयी माहिती देऊन त्याची नोंदणी करून घेणे यासंबंधी मार्गदर्शन केले. या मोहिमेत ग्रामपातळीवर कोणतीही व्यक्ति आर्थिक समावेशन योजनांपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायतीने बँकांना पूर्ण सहकार्य करावे. शिबिराची मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी अक्षय गोंडेवार यांनी डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, केवायसीची भूमिका, तसेच बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर याविषयी उपस्थित ग्राहकांना सखोल माहिती दिली. तसेच भारतीय रिझर्व बँकेचे कार्य व भूमिका यावेळी त्यांनी विषद केली.
या प्रसंगी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनामध्ये नोंदणी असलेल्या ग्राहकांचा अपघाती मृत्यू पावलेल्या ग्राहकांच्या वारसांना 2 लाख रूपये रकमेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
प्रास्ताविकात अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी डिजिटल अरेस्ट वरून होणारी फसवणूक, जास्त परताव्याच्या फसव्या योजनांपासून ग्राहकांनी दूर राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच ग्रामस्थांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा व R-KYC नोंदणीकरिता बँकेचे ग्राहक सेवा केंद्र किंवा शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
00000
जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान तालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते दसऱ्यापर्यंत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय येथे महिलांच्या 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित या शिबिराचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय कवठेमहंकाळ येथे दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानांतर्गत महिला व बालकांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी आणि महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या अभियानांतर्गत रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकलसेल आजार व रक्तक्षय तपासणी, तसेच गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन, निरोगी जीवनशैली आणि पोषण, स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन असे विविध तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच माता व बालसुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्ड, पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीत नागरिकांचा सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी, अवयवदान नोंदणी या सुविधा तसेच मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – दिनांक 17 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ 18 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, बेळंकी, 19 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, भिवघाट, 20 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, आटपाडी, 22 सप्टेंबर ग्रामीण रूग्णालय विटा, 23 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, पलूस व ग्रामीण रुग्णालय, तासगाव, 24 सप्टेंबर उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर, 25 सप्टेंबर उपजिल्हा रुग्णालय, शिराळा, 26 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ, 27 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, चिंचणी वांगी, 29 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, कडेगाव, 30 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, जत व 1 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, कोकरूड व ग्रामीण रुग्णालय, आष्टा.
000000
कोल्हापूर येथे 27 सप्टेंबरला माजी सैनिक मेळावा
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : माजी सैनिक, वीर नारी आणि वीर मातासाठी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राच्या वतीने दि 109 इन्फट्री बटालियन (टी ए) मराठा लाइट इन्फट्री प्रशिक्षण क्षेत्र कोल्हापूर येथे दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने पी. सी. डी. ए. (पेन्शन) प्रयागराज, वैद्यकीय शिबिर तसेच पेन्शनबाबत मार्गदर्शन होणार आहे. सर्व रेजिमेंट, कोरमधील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
00000
माधवनगर जकात नाका ते रजपूत गार्डन रस्ता कामासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : पद्माळे, सांगली, हरिपूर, अंकली, इनाम धामणी विश्रामबाग माधवनगर पद्माळे रस्ता राज्य मार्ग क्र. 154 वर कि. मी. 27/677 मध्ये सी.डी. वर्क करावयाचे आहे. त्यासाठी रस्ता (भाग-माधवनगर जकात नाका ते रजपूत गार्डन) दिनांक 16 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद करून सदर वाहतूक पर्यायी वाहतूक मार्गावरून वळविण्याबाबत तसेच वाहतूक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून निर्गमित केले आहेत.
वाहतूक वळविण्याच्या दृष्टीकोनातून करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची दक्षता
काम चालू करीत असताना रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, असे मोठ्या आकारातील माहितीदर्शक फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसेल अशा पध्दतीने मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक, रेडियम रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी काम होणार, त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याच्या दोन्ही बाजूस 24 तासांकरिता ठेकेदार यांनी त्यांचेकडील सुरक्षारक्षक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यांवर रात्री विद्युत पुरवठा चालू राहील याची ठेकेदार यांनी गांभीर्याने दक्षता घेण्याची आहे. काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार हे त्याकरिता सर्वस्वी जबाबदार असतील. ठेकेदार यांना नमूद ठिकाणी काम करीत असताना स्थानिक पोलिसांची बंदोबस्त कामी गरज भासल्यास आवश्यकतेनुसार त्यांनी योग्य तो शासकीय मेहताना भरून अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे आहे. या उपाययोजना व दक्षतांची अंमलबजावणी होण्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी दक्षता घ्यावी.
पर्यायी वाहतूक मार्ग
पलूस, कडेगाव, कराड शहराकडून येवून माधवगनगरकडे जाणाऱ्यांसाठी वाहनांचा मार्ग - कर्नाळ गाव - म्हसोबा चौक - शिवशंभो चौक - जुना बुधगांव रोड टोलनाका - चिंतामणीनगर रेल्वे ब्रिज - साखर कारखाना मार्गे माधवनगरकडे जाता व येता येईल.
आष्टा-इस्लामपूरकडून माधवनगरकडे जाणाऱ्यांसाठी वाहनांचा मार्ग - सांगलीवाडी टोलनाका -शिवशंभो चौक जुना बुधगांव रोड टोलनाका - चिंतामणीनगर रेल्वे ब्रिज - साखर कारखना मार्गे माधवनगरकडे जाता व येता येईल.
मौजे डिग्रजकडून माधवनगरकडे जाणाऱ्यांसाठी वाहनांचा मार्ग - म्हसोबा मंदिर चौक - शिवशंभो चौक जुना बुधगांव रोड टोलनाका चिंतामणीनगर रेल्वे ब्रिज - साखर कारखाना मार्गे माधवनगर रोडकडे जाता व येता येईल.
00000
सांगली जिल्ह्यात 681 आरोग्य शिबिरांतून 36 हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य यंत्रणांच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 681 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यातून 36 हजार 778 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी तर, विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या 2 हजार 276 रुग्णांना पुढील उपचाराकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडे संदर्भित करण्यात आले.
‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियान 2025’ हे अभियान दिनांक 27 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात आले. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये 681 इतकी समुदाय आरोग्य शिबिरातून 36778 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 360 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच, 2696 नागरिकांना आभा कार्ड वितरित करण्यात आले.
यासंदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून सांगली जिल्ह्यात 35 हजारांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तर, विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने आणि जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष संलग्नित असलेली रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रुग्णालये, जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये तसेच स्टेमी व एच.एल.एल. यंत्रणेच्या सहकार्याने ही समुदाय आरोग्य शिबिरे यशस्वी करण्यात आली. या शिबिरांमधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांचे मार्गदर्शन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या डॉ. मनिषा पाटील यांचा समन्वय व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे डॉ. रोहित खोलखुंबे, डॉ. सुभाष नांगरे, लक्ष्मण कुंडले यांचे सहकार्य लाभले. गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. त्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.
00000
वारणा धरणात 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.95 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.05 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.88 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.02 (34.40), राधानगरी 8.17 (8.36), दूधगंगा 21.43 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.65 (2.77), पाटगांव 3.69 (3.72), अलमट्टी 122.48 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 505, कण्हेर 40, धोम बलकवडी 330, वारणा 1630, दुधगंगा 300, तुळशी 50, हिप्परगी बॅरेज 24 हजार 802 व अलमट्टी धरणातून 25 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12 (40) व अंकली पूल हरिपूर 9.2 (45.11).
00000
जिल्ह्यात सरासरी 6.9 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 6.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 17.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 17.1 (377.3), जत 5.5 (385.5), खानापूर 10.8 (342.6), वाळवा 1.6 (500.7), तासगाव 11.5 (403.2), शिराळा 0.0 (1172.7), आटपाडी 2.9 (394.5), कवठेमहांकाळ 11.1 (389), पलूस 1.5 (442.6), कडेगाव 1.1 (357.5).
00000
सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५
महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महिला व बाल विकास, उद्योग केंद्राने परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : जिल्हा महिला व बाल विकास विभागाने महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करावे व त्या महिलांनी जिल्ह्यात छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने प्रयत्न करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राकडील विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात उद्योग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, सामूहिक प्रोत्साहन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत महिलांना माहिती देऊन उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या या योजना 5 टक्के बीज भांडवल, 35 टक्के अनुदान व उर्वरित कर्ज अशा स्वरूपात राबवल्या जातात. उद्योगाची मर्यादा एक लाख रूपये असणाऱ्या उद्योगासाठी आपण स्वत: बीज भांडवलाची रक्कम उभा करून देऊ, असे त्यांनी आश्वासीत केले. तसेच, महाविद्यालयीन युवतींनाही कमवा व शिका या तत्त्वावर शिक्षणासाठी मदत म्हणून प्रायोगिक तत्त्वावर विलिंग्डन महाविद्यालय परिसरात एखादे युनिट सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी करण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल सविस्तर सादरीकरण केले.
00000
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे उपस्थित होते.
या अभियानाची सविस्तर माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेस प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, गावे समृध्द होण्यासाठी ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देणे, ग्रामस्तरीय समित्या सक्षम करणे, ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच स्वच्छतेवर भर देणे या बाबींचा समावेश आहे. या अभियानामध्ये एकूण 8 मुख्य घटक असून यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), जल समृध्द, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गावपातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, समाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे.
या अभियानामध्ये ग्रामपंचायतीची महत्वपूर्ण भूमिका असल्याने, ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरपंच / प्रशासक यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गाव पातळीवरील सर्व अधिकारी / कर्मचारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील. समितीचे सदस्य सचिव म्हणून "ग्रामपंचायत अधिकारी" हे काम पाहतील. उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त गुणांकन मिळविणे, हे या समितीचे महत्वाचे कार्य असणार आहे.
या अभियांना अंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर तपासणी करून ग्रामपंचायतीची पुरस्काराकरिता निवड करण्यात येणार आहे.
00000
दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : दिव्यांगत्व ही मर्यादा नसून ती नवी संधी आहे. दिव्यांगांनी आपल्यात दडलेले कलागुण समाजासमोर आणून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे, असा प्रेरणादायी संदेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला.
दिव्यांगांना युनिफाईड डिसॅबिलिटी आयडी (UDID) प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हा दिव्यांग समन्वयक मानसिंग भोसले, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, लाभार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात 42 हजारहून अधिक व्यक्तिंनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 30 हजार 521 दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. यामधील काही दिव्यांगांना आज प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर लावल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.
दिव्यांग व्यक्तिंना या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के आरक्षण, एसटी व रेल्वेमध्ये सवलत यासह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत. या योजनांची सर्वसमावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी. शासन व प्रशासन दिव्यांगांच्या पाठिशी असून, यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
दिव्यांगांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता, शारीरिक उणिवांची खंत न बाळगता आत्मविश्वासाने जगावे, असा मूलमंत्र देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग व्यक्तिंना युडीआयडी कार्डमुळे सर्व लाभ मिळणार आहे. या कार्डचा डेटा देशपातळीवर असून देशातील कोणत्याही राज्यात दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यासाठी शिबिरे घेण्यात आली असून ज्या व्यक्तिचे किमान 40 टक्के अपंगत्व आहे अशांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबरोबरच सामाजिक सहाय्य योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते 40 दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी वाटप करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास जल अर्पण करण्यात आले.
यावेळी रामदास कोळी व अमोल चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले.
दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वुई फौंडेशनचे दिनेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.
00000
किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठी ज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण
- प्रबोधनाचे मॉड्युल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- नोव्हेंबर महिन्यातील चार रविवारी चालणार प्रशिक्षण सत्र
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दिवाळीनंतर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन विविध विषय हाताळणारे प्रबोधनाचे सर्वसमावेशक मॉड्युल राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे, याचे पूर्वनियोजन काटेकोर करून हे मॉड्युल यशस्वी करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या प्रतिनिधी डॉ. अनघा लवळेकर, उपक्रम समन्वयक अश्विनी देशपांडे, मुख्य प्रशिक्षक दीपाली शेंडे आदि उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू करून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यात आली आहे. यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीतून काम सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रबोधनाच्या पुढील टप्प्यात ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या माध्यमातून आठवी ते दहावीतील किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मॉड्युल राबवण्यात येणार आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व खाजगी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आठवडाभरात सर्व मुख्याध्यापकांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांना पीपीटीद्वारे याबाबत माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात शनिवारी दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत पहिल्या तासात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, हे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करावे, शिक्षकांनी प्रबोधन करताना दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच, मराठीसह इंग्रजी, उर्दु, कन्नड माध्यमाच्या शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
संचालक डॉ. अनघा लवळेकर म्हणाल्या, ज्ञानप्रबोधिनीचे 20 हून अधिक प्रशिक्षक एका वेळी 4 आठवड्यात शिक्षकांना प्रशिक्षण देतील. या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन प्रत्येक आठवड्याला सहा तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थानिक स्तरावर समन्वयक नेमण्यात येईल. तीन महिन्यांनंतर त्याचा शास्त्रीयदृष्ट्या ट्रॅकिंग केले जाईल.
समन्वयक अश्विनी देशपांडे आणि प्रशिक्षक दीपा शेंडे यांनी या सर्वसमावेशक मॉड्युलबद्दल सादरीकरण केले.
00000
रविवार, १४ सप्टेंबर, २०२५
जिल्ह्यात सरासरी 12.6 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 12.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 33.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.3 (358.5), जत 5.8 (378), खानापूर 25.9 (331.8), वाळवा 4.8 (498.9), तासगाव 27.4 (391.6), शिराळा 8.4 (1173.4), आटपाडी 23.5 (392.1), कवठेमहांकाळ 33.8 (377.9), पलूस 3.5 (441.1), कडेगाव 13 (356.4).
00000
वारणा धरणात 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.73 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.05 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.89 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.07 (34.40), राधानगरी 8.12 (8.36), दूधगंगा 21.36 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.63 (2.77), पाटगांव 3.68 (3.72), अलमट्टी 122.83 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 505, कण्हेर 340, उरमोडी 250, तारळी 116, दुधगंगा 100, तुळशी 50, हिप्परगी बॅरेज 25 हजार 27 व अलमट्टी धरणातून 20 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 7.8 (45.11).
00000
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
गावाच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबबावे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
- अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावातल्या ग्रामस्थ, सरपंच आणि गावाच्या समृध्दीचे अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक चळवळ उभी करावी. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गाव विकासाचे आदर्श केंद्र बनेल, यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल इनाम धामणी येथे आयोजित या कार्यशाळेस आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे राज्याचे प्रशिक्षण शिबिर पार पडले असून, तालुक्या - तालुक्यामध्ये प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत, जिल्ह्याचे प्रशिक्षण शिबिर आज येथे होत आहे. या शिबिरासाठी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्यांनी भाग घेतला आहे. 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरवात होत असून, या अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ग्रामसभेची सगळी गावे ऑनलाईन प्रणालीने जोडण्यात येणार असून सगळ्या गावांमध्ये किमान 400 लोकांची ग्रामसभा झाली पाहिजे, अशा पध्दतीने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले,
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, या अभियानाबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता असून, गावच्या सरपंचामध्ये प्रचंड ताकद असून, त्याने गावाची प्रगती करायचे ठरवले तर सर्वांचे हात पुढे येतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थांच्या एकीने सगळ्यांनी ठरवलं तर हे अभियान नक्कीच यशस्वी होईल, असे ते म्हणाले.
ग्रामविकासासाठी संत गाडगेबाबा अभियान, हागणदारीमुक्त अभियान, तंटामुक्त अभियान आदि अभियाने माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकालात झाली. ही सगळी अभियाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात एकत्र आली आहेत. गावातील प्रत्येक घटकासाठी शासनाची योजना आहे. जर शासनाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी केली तर गावातील 65 टक्के काम संपते. त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्वांना आपल्या गावासाठी या अभियानामध्ये सहभागी करुन घेण्याची भूमिका सरपंचांनी घ्यावी. ग्रामसभेला गावातील मंडळे, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांना बोलवावे. सगळ्यांनी मिळून हे अभियान पुढे घेवून जावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)