मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

रेशीम विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे

- रेशीम दिनानिमित्त कवठेएकंद येथे कार्यशाळा संपन्न - सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : रेशीम उद्योगासाठी मनरेगातून तसेच सिल्क समग्र या योजनेतून शेतकऱ्याला अनुदान मिळते. शेतकरी रेशीम उद्योगातून समृद्ध होत आहे. त्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम संचालनालय नागपूरचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले. रेशीम दिनानिमित्त कवठेएकंद येथे आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी लोकनेते मोहनराव कदम कृषि महाविद्यालय, कडेगावचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव, उद्योजक कृष्ण गोपाल माहेश्वरी, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूरचे सहसचिव तसेच प्रगतशील शेतकरी विश्वनाथ डांगे, केंद्रीय रेशीम मंडळ धारवाडचे शास्त्रज्ञ डॉ. विराज सोमकुंवर, जिल्हा रेशीम कार्यालय, सांगलीचे रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक सुनिल पाटील, सेवानिवृत्त रेशीम विकास अधिकारी बापू कुलकर्णी, सेवानिवृत्त वरिष्ठ क्षेत्र सहायक बी. डी. माने आदि उपस्थित होते. रेशीम संचालनालय, नागपूरच्या दि.01 सप्टेंबर 1997 रोजीच्या स्थापना वर्षानिमित्त दरवर्षी 01 सप्टेंबर हा दिवस रेशीम दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त जिल्हा रेशीम कार्यालयाकडून रेशीम विभाग आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. रेशीम आपल्या दारी ही संकल्पना शेतकऱ्याच्या मनात रूजवताना उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे म्हणाले, मनरेगांतर्गत रेशीम शेती उद्योगातून किमान चार लाख रुपये एकरी कमावता येतात. आरएसएम सिल्क कवठे एकंद यांच्याकडे रेशीम धागा काढण्याचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे युनिट कार्यान्वित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रेशीमकोषाला 500 पासून साडेसहाशे रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकूण पाचशे एकर रेशीम लागवडीचे नियोजन करण्यात आले आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री यांनी रेशीम विभागास या पावसाळ्यात 4 कोटी तुती वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. सांगली जिल्ह्याकरिता 12 लक्ष तुती वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आजअखेर 5 लक्ष 76 हजार तुती वृक्ष लागवड लक्षांक पूर्ण करण्यात आला आहे. याबरोबरच शेतकरी बंधुंनी पर्यावरणपूरक आणि शेतीशी निगडीत रेशीम उद्योग सुरू करुन रेशीम कोष निर्मितीसह आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे संयोजन केंद्रीय रेशीम मंडळ बंगळुरू, जिल्हा रेशीम कार्यालय, सांगली व आरएसएम सिल्क्सचे राकेश माहेश्वरी व मेहुल शहा यांनी यशस्वीरित्या पार पाडले. यावेळी मेरा रेशीम, मेरा अभिमान या अभियानांतर्गत तुती लागवड व तुती बाग व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यशाळेस तीन जिल्ह्यातील 500 शेतकरी उपस्थित होते. रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. 500 प्रति एकर याप्रमाणे नोंदणी केली होती. परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरु केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड का केली नाही, याबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहे. काय आहेत योजना? जिल्हा रेशीम कार्यालय सांगली मार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी योजनेतून राबविण्यात येते. यासाठी एका गावातून कमीतकमी 5 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावेत. यासाठी प्रति एकर रु. 500/- नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयाकडे जमा करावे. मनरेगा अंतर्गत एक एकर वृक्ष लागवड जोपासना यासाठी तीन वर्षात रू. 2 लाख 12 हजार 784 मजुरी, रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी म्हणून रू. 66 हजार 456 तर साहित्यासाठी रू. 1 लाख 53 हजार रुपये असे एकूण रू. 4 लाख 32 हजार 240 रुपये तीन वर्षात दिले जाणार आहेत. 5 एकरावरील क्षेत्र धारण करणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्रपुरस्कृत सिल्क सम्रग -2 योजनेअंतर्गत तुती बागेसाठी एक एकरकरिता 45 हजार रुपये सिंचन व्यवस्थेसाठी, 45 हजार रूपये कीटक संगोपनगृह बांधकामासाठी रू. 2 लाख 43 हजार 750 संगोपन साहित्यासाठी 37 हजार 500 आणि निर्जंतुकीकरण औषधीसाठी 3 हजार 750 रुपये काम पूर्ण झाल्यानंतर दिले जातात. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कक्ष क्र.१०७, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर,सांगली येथे संपर्क साधावा. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा