गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- जिल्हाधिकाऱ्यांनी जत तालुक्यात नुकसानीची केली पाहणी सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : जत तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माडग्याळ, उमदी, हळ्ळी, सोनलगी आदि गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन शेतकऱ्यांनी कृषि व महसूल विभागाशी त्वरित संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी जत अजयकुमार नष्टे, तालुका कृषि अधिकारी प्रदीप कदम, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, मंडळ अधिकारी अभिजीत गाढवे, ग्रामविकास अधिकारी तिटकारे, सरपंच श्री. माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माडग्याळ येथील चौगुले वस्तीवरील शेतकरी राम चौगुले यांच्या शेतातील नुकसानग्रस्त बाजरी व मका पिके तसेच मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झालेले घर याची पाहणी केली. जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख, बोरलगी, सोनलगी, सुसलाद, उमदी आदि गावांमध्ये बाजरी, मका, फळबाग यांसह अनेक पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शासनाकडून नुकसानभरपाई प्रस्ताव वेळेत पाठविण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कार्यवाहीस सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा