मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५
सेवा पंधरवड्यात नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा - मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ मिरज उपविभागातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या विशेष अभियानाचा उद्देश नागरिकांना विविध महसूल सेवा पारदर्शकतेने, तात्काळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या काळात सामान्य शेतकरी, नागरिक, घरकुल लाभार्थी तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचे उपक्रम पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यात नागरिकांना सेवा पुरविल्या जाणार आहेत. महसूल विभागाचा हा उपक्रम पूर्णपणे लोकाभिमुख आहे. या सेवा पंधरवड्यात महसूल सेवांचा जलद व पारदर्शक पुरवठा, तक्रारींचे त्वरित निवारण व शासन योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रमुख ध्येय आहे. तीन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे उद्दिष्ट हे महसूल विभागाच्या सेवांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आहे.
मिरज उपविभागातील अपर तहसिल सांगली, मिरज, तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यात तीन टप्प्यांत पुढीलप्रमाणे अभियान राबवण्यात येणार आहे.
पहिला टप्प्यात दिनांक 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत पाणंद रस्तेविषयक मोहिमेंतर्गत ग्राम समेचे आयोजन करणे, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी स्तरावर सर्व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, सर्व संबंधित शेतकऱ्यांशी सुसंवाद व समन्वय साधणे व संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली ठेवणे इत्यादी.
दुसरा टप्प्यात दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत अतिक्रमित बांधकामांचे सर्वेक्षण करणे, गावठाण वाढ विस्तार योजनेतील शिल्लक भूखंडांची माहिती घेणे, घरकुल पात्र लाभार्थी यांच्या याद्या प्राप्त करुन घेणे, अतिक्रमीत बांधकामांचे प्रस्ताव ग्रामसेवक यांच्याकडून प्राप्त करून घेणे, प्राप्त प्रस्ताव शक्ती प्रदत्त समिती समोर ठेवणे, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे.
तिसरा टप्प्यात दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पोट खराब अ क्षेत्राचे सर्वेक्षण करणे, लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत 7/12 पडताळणी करून लाभार्थी निश्चित करणे इत्यादी, "शेतकरी संवाद" आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर थेट चर्चा व उपाययोजना केली जाणार आहे. अन्नपुर्ण शिधापत्रीका (दिव्यांग लाभार्थी यांना अंत्योदय शिधापत्रिका देणे) इत्यादी.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा