गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा - प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर

कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : वनांचे, वनसंपदेचे उत्तम प्रकारे रक्षण करा. गणवेशासोबत उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या ओघानेच येतात. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात योग्य समतोल साधून, येणाऱ्या आव्हानांचा, संकटांचा शांतपणे, धैर्याने सामना करून योग्य उत्तर शोधा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केले. कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर., सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, सामाजिक कार्य विभाग, एसएनडीटी, पुणेचे विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक भास्कर इगावे, प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत, प्राध्यापक (प्रशासन व व्यवस्थापन) एच. एस. वाघमोडे, अपर संचालक (प्रशिक्षण) भरत शिंदे, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे उपप्राचार्य सुनील शेटे आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर म्हणाले, वनरक्षकांचे शिस्तबद्ध संचलन व सांघिक भावना पाहून भारावून गेलो आहे. अंगी काही विशेष गुण असल्यामुळेच, स्पर्धा परीक्षेतून वन सेवेसाठी निवड झाली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक जीवनात प्रवेश होत आहे. शासनाचा एक भाग म्हणून, शासनाचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून यापुढे तुमच्याकडे पाहिले जाईल. मानसिक, शारीरिक व तांत्रिक बाबींमध्ये सक्षम राहून, तुमची भूमिका समजावून घेऊन त्यामध्ये सर्वोत्तम काम करा. समाजाची, देशाची उत्तम सेवा करण्याची संधी तुम्हाला लाभली असून मदतीच्या अपेक्षेने तुमच्याकडे येणाऱ्या जनसामान्यांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ते करा, अशा शब्दांत त्यांनी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या. प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर. यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रबोधिनीमध्ये आजवर ३८१ वनरक्षक प्रशिक्षणार्थी, देशाच्या विविध राज्यांतील ४९७ वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत विविध खात्यांचे ३९,०४४ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्र संचालक कल्याणी यादव यांनी निकाल वाचन केले. प्रशिक्षणार्थीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून ऋतुजा पंढरीनाथ खताळ सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना एक रजत पदकही मिळाले. अविनाश आचला यांना दोन रजत पदके तर प्रतीक्षा जाधव व समता कालपाड यांना प्रत्येकी एक रजत पदक प्राप्त झाले. क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष गटात धीरज गोटा हे मॅरेथॉन विजेते व अॅथलेटिक चॅम्पियन ठरले तर महिला गटात दुर्वा धारणे या मॅरेथॉन विजेत्या व अॅथलेटिक चॅम्पियन ठरल्या. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच त्यांना एसएनडीटी महाविद्यापीठामार्फतही प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशिक्षणार्थीतर्फे श्रुती मेश्राम व आकाश खोजे यांनी मनोगत व्यक्त केले. दि. २९ मार्च २०२५ रोजी सुरू झालेल्या व दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झालेल्या सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या वनवृत्तांतील ९५ महिला व ४५ पुरुष अशा एकूण १४० वनरक्षक प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणार्थीच्या पासिंग आउट परेडसाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे, विजयानंद गद्रे, सूरज पाटील, किरण इरकर, राहुल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सांगली पोलीस बँड पथकाचे परेडसाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस यांनी तर आभार प्रदर्शन सहायक वनसंरक्षक कल्याणी यादव यांनी केले. कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस, सहायक वनसंरक्षक तथा सत्र संचालक कल्याणी यादव, दत्तात्रय शेटे, अर्जुन सोनवणे, सहयोगी प्राध्यापक रमेश लिधडे, निवृत्त मुख्य वनसंरक्षक एम.एम. कुलकर्णी, निवृत्त उपवनसंरक्षक श्री. माणिक भोसले. निवृत्त विभागीय वन अधिकारी श्री. एस. डी. खैरनार, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, सुखदेव खोत व इतर अधिकारी कर्मचारी, वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थीचे पालक, एन.सी.सी. कॅडेट व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा