मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५
जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरिता 30 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी - सहाय्यक आयुक्त इ. सि. शेख
- स्पर्धेतील विजेत्यांचे जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 साठी नामांकन
-
सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : शांघाई (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरिता सांगली जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in/ या लिंकवर भेट देवून दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नावनोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इ. सि. शेख यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असते. सदर स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील सर्व 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 47 जागतिक कौशल्य स्पर्धांमध्ये 63 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार सहभागी झालेले असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आलेली होती.
यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये शांघाई (चीन) येथे आयोजित होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरिता पात्रता निकष पुढीलप्रमाणे - जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry 4.0, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल. तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा