मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दैवार्षिक निवडणूक-2026 सर्व अधिकाऱ्यांनी नेमून दिलेले कामकाज काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडावे - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

- समन्वय अधिकारी व कक्ष प्रमुखांच्या बैठकीत केल्या सूचना सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दैवार्षिक निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज अतिशय काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडावे. सदर निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दैवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त समन्वय अधिकारी व कक्ष प्रमुख यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन होईल, या दृष्टीने कामकाज करावे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती करावी. भरारी पथकांसह अन्य नियुक्त पथकांनी प्रभावी कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन, अधिकारी / कर्मचारी नियुक्ती व्यवस्थापन, मतदान पेटी व्यवस्थापन, निवडणूक साहित्य व स्टेशनरी व्यवस्थापन, वाहन अधिग्रहण, वाहन व्यवस्थापन वाहतूक आराखडा, संगणकीकरण व्यवस्थापन व मतमोजणी नमुने तयार करणे, निवडणूक खर्च व्यवस्थापन, दैनंदिन अहवाल, पेड न्यूज व जाहिरात प्रमाणिकरण, मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, स्वीप कामकाज, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण, मतपत्रिका व्यवस्थापन आदी विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा