मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत माहिती अधिकार दिनानिमित्त मार्गदर्शन
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : 28 सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायत जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी कायद्यातील विविध तरतुदी व त्यातील बारकावे समजावून सांगितले.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे व जबाबदारीने कामकाज करावे. माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने अर्जावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण प्रकरणात विहित कालमर्यादेत माहिती देणे आवश्यक आहे. माहिती अधिकाराबाबत अनाठायी भीती न बाळगता कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-1 भारत राणे, उपनिबंधक बिपीन मोहिते, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक अनिल कोळी व अनुराधा काटकर, तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा