मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

सांगली जिल्हा परिषदेत माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा परिषदेत माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती, प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद कृषि अधिकारी मोहिनी वाळेकर, शिक्षण विस्ताराधिकारी गणेश भांबुरे, कृषी अधिकारी गणेश भोसले, माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषि अधिकारी मोहिनी वाळेकर यांनी शेतकरी व नागरिकांना कृषि खात्याच्या विविध योजना, अनुदान आणि कृषीविषयक योजनांची माहिती आणि माहिती अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्ताराधिकारी गणेश भांबुरे यांनी शिक्षण क्षेत्रातील शासकीय योजना, सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगितले. माहितीचा अधिकार हा नागरिकांना सक्षम करणारा महत्त्वाचा कायदा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करून नागरिकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि लोकहितासाठी या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व स्पष्ट करताना नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असून, सार्वजनिक प्राधिकरणांनी आवश्यक माहिती स्वयंस्फूर्तीने प्रसिद्ध करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनीही माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक होऊन प्रशासनाशी सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहन केले. दरम्यान, माहिती अधिकार दिनानिमित्त विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. रिक्षा व मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंवरही माहिती अधिकाराचे जनजागृती फलक लावण्यात आले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा