मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक, विक्री करण्यास मनाई

सांगली, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर जिल्ह्यात व सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जात आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात भविष्यात गंभीर चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका व त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 (BNSS) चे कलम 163 मधील अधिकारांचा वापर करून सांगली जिल्ह्याच्या महसुली सीमेमध्ये पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. आदेशात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची (उदा. कडबा, कुट्टी, पेंढा इ.) वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) च्या 223 कलमांनुसार (पूर्वीचे IPC कलम 188) कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हा आदेश दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर 2026 रोजीचे 11.59 वाजेपर्यंत लागू राहील, असे आदेशात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा