सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ

- सावळीत महिला गृहउद्योग केंद्र, स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण - पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप - जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी - 32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील सावळीतील महिलांसाठी सोमवारचा दिवस स्वप्नवत व अविस्मरणीय ठरला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष आपल्या गावात येतात, आपण उभारलेल्या गृहउद्योग केंद्राला भेट देतात, आपल्या उत्पादनांची आत्मियतेने माहिती घेतात आणि स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण करतात, हा क्षण येथील महिला भगिनींसाठी आनंदाची मर्मबंधातील ठेव बनला. त्यांच्या या “बंधु”तुल्य वावर आणि अनौपचारिक सहजतेने पायावर उभे राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिला भगिनींच्या स्वप्नांना बळ दिले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील सावळी येथे उभारण्यात आलेल्या विजयश्री महिला गृहउद्योग केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) आणि नवतेजस्विनी महिला स्वयंरोजगार विक्री (व्हेंडर स्टॉल) केंद्राच्या लोकार्पणाचा हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. पालकमंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागताच सकाळपासूनच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहउद्योग केंद्र आणि विक्री केंद्राची सजावट, उत्पादनांची आकर्षक मांडणी आणि पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. वाहनांचा ताफा केंद्रासमोर थांबताच महिलांच्या चेहऱ्यावरील उत्सुकतेचे रूपांतर आनंदात झाले. तुतारीच्या निनादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रात दाखल झाले आणि काही क्षणांतच औपचारिकतेचे वातावरण आपुलकीच्या संवादात बदलले. त्यांनी प्रत्येक महिलेशी बोलत तिच्या कामाची माहिती घेतली. गृहउद्योग केंद्रातील यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया आणि महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ, शेवया, मसाले, विविध प्रकारची पिठे आणि पौष्टिक खाद्यपदार्थांविषयी त्यांनी आत्मियतेने चौकशी केली. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुक करताना पालकमंत्र्यांनी स्वतः काही वस्तु खरेदी केल्या. स्वयंरोजगार विक्री केंद्रातून त्यांनी पौष्टिक लाडू विकत घेतले आणि तेच लाडू उपस्थित महिला भगिनींना स्वतःच्या हाताने वाटले. त्यांच्या या छोट्याशा कृतीने महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी खुलला. आपण तयार केलेल्या उत्पादनाला पालकमंत्र्यांनी ग्राहक म्हणून पसंती दिल्याची भावना महिलांसाठी अभिमानाची ठरली. महिलांनी पालकमंत्र्यांसोबत छायाचित्रे काढली. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी “व्यवसाय करताना कोणालाही वस्तू मोफत देऊ नका. उत्पादनाला योग्य किंमत मिळाली, तरच व्यवसाय वाढेल आणि तुमच्या श्रमाचे मूल्य टिकेल,” असा व्यावहारिक सल्ला पालकमंत्री पाटील यांनी दिला. केंद्रातून बाहेर पडताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच “नारीशक्तीचा विजय असो” अशी घोषणा दिली. उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. या क्षणी अनेक महिलांच्या चेहऱ्यांवर आनंदाबरोबरच नव्या आत्मविश्वासाची झळाळी दिसून आली. महिला उद्योजिकांना मिळणार नवी संधी महिला गृहउद्योग केंद्र आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे, उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे या केंद्रांमुळे अधिक सुलभ होईल. महिलांनी केवळ बचतगटांच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. महिला सक्षमीकरणाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी 32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी ‘महिला लखपती’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के राखीव निधीतून महिला गृहउद्योग केंद्रे आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. महिला व बाल सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत शेतीमाल आणि अन्नप्रक्रियेद्वारे मूल्यवर्धित वस्तूंचे उत्पादन गावपातळीवर व्हावे, बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी पोर्टेबल व्हेंडर स्टॉलच्या स्वरूपात स्वयंरोजगार विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 56 लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील सात तालुक्यांत 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच जवळपास 32 लाभार्थी महिला गटांतील 384 महिला लाभार्थींसाठी महिला गृहउद्योग केंद्रे (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात आली आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सावळीतील हा कार्यक्रम केवळ दोन केंद्रांच्या लोकार्पणापुरता मर्यादित राहिला नाही. तो महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणारा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवे बळ देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. 00000

बचतगटांचे सक्षमीकरण, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- लाभार्थी महिलांना शेअर्स व कर्जधनादेशांचे वितरण सांगली, दि. 3 (जि. मा. का.) – महिला बचतगटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. त्यामुळे महिला बचतगटांना केवळ आर्थिक मदत देण्याबरोबरच, प्रत्येक महिलेला लखपती दीदी बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे ध्येय आहे. महिलांना प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी भांडवल आणि बचत गट निर्मित उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विविध माध्यमांतून महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. मिरज तालुक्यातील सावळी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सांगली यांच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विहानराजे मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरजच्या अध्यक्ष मनिषा पाटील, सावळीच्या सरपंच सन्मती गणे आदि उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला कुटुंब घडवत असते. महिला भगिनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे उभे राहतात. या पार्श्वभूमिवर, कौटुंबिक जबाबदारीत आर्थिक योगदान देण्याइतपत महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख होईल, यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात महिलांना कर्जपुरवठा करण्यासाठी महिला बँक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात सांगली जिल्ह्याने पुढाकार घेत सांगली जिल्हा लाडकी बहीण सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे. त्याचे प्रत्येकी 700 रूपयांचे शेयर्स असून त्याचे प्रातिनिधीक वितरण आज करण्यात आले. या माध्यमातून गरजू महिलांना कर्जपुरवठा करण्यात येईल. कर्जप्राप्त महिलांना उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्हा लाडकी बहीण सहकारी पतसंस्थेचे शेअर्स व महिला उद्योजिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने लाभार्थी महिलांना कर्जधनादेश वितरण करण्यात आले. माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रास्ताविक केले. श्री. उमराणीकर यांनी आभार मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र मिरजच्या 16 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचतगटांच्या प्रतिनिधी, लाभार्थी महिला, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 00000

शिराळा तालुक्यात 6.3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 6.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.9 (246.1), जत 0.2 (168.8), खानापूर 0.3 (257.6), वाळवा 1.1 (359.6), तासगाव 2.1 (263.2), शिराळा 6.3 (718), आटपाडी 0.0 (183.3), कवठेमहांकाळ 0.2 (154.2), पलूस 1.9 (267.4), कडेगाव 1.1 (309.7). 00000

वारणा धरणात 29.72 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 3,(जि.मा.का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.72 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 91.43 (105.25), धोम 11.98 (13.50), कन्हेर 9.60 (10.10), धोमबलकवडी 3.56 (4.08), उरमोडी 9.15 (9.97), तारळी 5.27 (5.85), वारणा 29.72 (34.40), राधानगरी 8.33 (8.36), दूधगंगा 18.45 (25.40), तुळशी 3.12 (3.47), कासारी 2.35 (2.77), पाटगांव 2.83 (3.72), अलमट्टी 111.97 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 30223, धोम 5350, कण्हेर 2335, धोम बलकवडी 1329, उरमोडी 1799, तारळी 2182, वारणा 6900, राधानगरी 4256, कासारी 950 व अलमट्टी धरणातून 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 28.6 (40) व अंकली पूल हरिपूर 32.9 (45.11). 00000

प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षसंवर्धन करावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- ‘हरित सांगली’ वृक्षारोपण कार्यक्रमात केले आवाहन सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपनही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लावलेली झाडे जिवंत ठेवणे आहे. निसर्ग आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे, फुले, लाकूड आणि प्राणवायू देतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित ‘हरित सांगली’ वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहाय्यक वनसंरक्षक मयुर शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी कौशल्या भोसले, मकरंद देशपांडे, बाळासाहेब व्होनमोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दरवर्षीचे नियोजन आखण्यात आले असून, सांगली जिल्ह्याला सन 2026 च्या पावसाळ्यात 15 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच प्रत्येक सांगलीकर नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असे ते म्हणाले. मिरज रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या एक एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत सामंजस्य करार करून ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अटल आनंदवन घनवन विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कमी जागेत अधिक झाडे लावून अल्पावधीत दाट वनराई निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून तीन वर्षांनंतर विकसित केलेला परिसर रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धन, प्राणी-पक्ष्यांबद्दल संवेदनशीलता आणि पर्यावरण संरक्षणाचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता व्यक्त केली. झाडे जगविण्यासाठी सोप्या आणि परिणामकारक उपायांचाही उल्लेख करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वापरलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना लहान छिद्र करून त्या झाडांच्या मुळाशी ठेवाव्यात. त्यामुळे पाणी हळूहळू थेट मुळांपर्यंत पोहोचून झाडांची वाढ चांगली होते, असे त्यांनी सांगितले. समाजातील अनेक नागरिक स्वतःच्या पुढाकारातून नियमित झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करत असल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थी व युवकांनी सिगारेट, तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनाचा संकल्प करावा, तसेच गुरुजनांचा आणि आई-वडिलांचा आदर करावा, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सामाजिक शिस्त अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड आराखडा फलकाचे फीत कापून व वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सेल्फी पॉइंटचे उद्घाटन त्यांनी स्वतः सेल्फी घेऊन केले. यावेळी राष्ट्रीय हरित सेना 'पंचतारांकित हरित शाळा' अंतर्गत विभागीयस्तरीय पुरस्कार प्राप्त मातोश्री गंगाबाई शिवजी कोठारी विद्यालय, सांगली या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

वारणा धरणात 29.72टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 1,(जि.मा.का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.72 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 90.04 (105.25), धोम 12.22 (13.50), कन्हेर 9.47 (10.10), धोमबलकवडी 3.58 (4.08), उरमोडी 9.09 (9.97), तारळी 5.33 (5.85), वारणा 29.72 (34.40), राधानगरी 8.32 (8.36), दूधगंगा 17.00 (25.40), तुळशी 2.96 (3.47), कासारी 2.35 (2.77), पाटगांव 2.63 (3.72), अलमट्टी 112.95 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 23520, धोम 8219, कण्हेर 6072, धोम बलकवडी 3274, उरमोडी 4962, तारळी 3596, वारणा 6900, राधानगरी 4256, कासारी 950 व अलमट्टी धरणातून 1 लाख 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 24.6 (40) व अंकली पूल हरिपूर 27.2 (45.11). 00000

कडेगाव तालुक्यात 29.1 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 29.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 12.4 (244.5), जत 1.2 (168.5), खानापूर 14.5 (256.6), वाळवा 26.1 (356.4), तासगाव 15.5 (260.4), शिराळा 22.5 (701.5), आटपाडी 2.6 (183.3), कवठेमहांकाळ 5.9 (154), पलूस 27 (264.6), कडेगाव 29.1 (307.4). 00000