शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
सेवा संकल्प अभियानांतर्गत सांगलीत 208 हृदयरोग संशयित बालकांची मोफत तपासणी
- 13 ऑक्टोबरला सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे मोफत नेत्ररोग तपासणी
सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत सांगली जिल्ह्यातील 208 हृदयरोग संशयित बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. यापैकी 48 बालकांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून, 35 बालकांवर आवश्यकतेनुसार औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. तसेच 40 बालकांची सहा महिन्यांनंतर पुन:श्च तपासणी करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आज दि. ९ ऑक्टोबर रोजी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे संशयित हृदयरूग्ण बालकांकरिता शाळा व अंगणवाडीतून आरोग्य तपासाीतून संदर्भित करण्यात आलेल्या बालकांकरिता बालाजी हॉस्पीटल मुंबई येथील पथकामार्फत मोफत 2 डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी बालकांची इको तपासणी केली, तर व्यवस्थापक प्रतीक मिश्रा यांनी रुग्णालयाशी समन्वय साधला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी उपस्थित राहून लाभार्थी बालके व पालकांना मार्गदर्शन केले. शस्त्रक्रिया व उपचार आवश्यक असलेल्या बालकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून २०८ हृदयरोग संशयित बालके उपस्थित होती. या बालकांचे वयोगट शून्य ते १८ वर्षे असून, त्यामध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची संख्या अधिक होती. हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे. या बालकांच्या उपचारांसाठी मोफत प्रवास, निवास व भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणीचे काम प्रभावीपणे सुरू असून या कार्यक्रमामध्ये जिल्हा सातत्याने अग्रस्थानी राहिला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील १,९५० लाभार्थ्यांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, तर 25,334 लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या समन्वयातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील मंजूर सर्व शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन असून, आवश्यक संदर्भसेवाही १०० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिरासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी गाव, तळ, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांना संदर्भित केले. जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस, डॉ. परशुराम हरणे, अनिरूध्द लोंढे यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
शुन्य ते 18 वर्षे वयोगटातील सर्व नेत्ररोग संबंधित बालकांकरिता दि. 13 ऑक्टोबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे केले असून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा