शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातर्फे शिराळा, कळंबीत आरोग्य तपासणी

सांगली, दि. 9 (जि. मा. का) : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातर्फे शालेय स्तरावर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये कळंबी आणि शिराळा येथे बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात वार्षिक शालेय आरोग्य तपासणीदरम्यान नेत्ररोग सेवेसाठी संदर्भित केलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथे करण्यात आली. यावेळी परिसरातील रॉयल अकॅडमी खंडेराजुरी, गुंडेवाडी हायस्कूल, गुंडेवाडी, जिल्हा परिषद शाळा सोनी, भोसे, कळंबी, पाटगाव, सिद्धेवाडी या शाळांतील जवळपास 350 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. नेत्रचिकित्सा डॉक्टर अभिजीत सोरमाळे (ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र माडग्याळ), नेत्रतंत्रज्ञ रोहित चौगुले (DEIC) सांगली, मयुरी तेग्गीमाळी (प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठेपिरान), जगन्नाथ बुधवले (प्राथमिक आरोग्य केंद्र, बावची) यांनी विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली नियमित शालेय तपासणीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रम मिरज टीम सी चे डॉक्टर प्रशांत पाटील व डॉक्टर प्रियांका पाटील व सिस्टर प्रीती कुरणे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या तपासणीत विद्यालयातील 124 विद्यार्थी संदर्भित सेवेसाठी संदर्भित करण्यात आले होते. त्यातील नेत्रतपासणीसाठी संदर्भित केलेल्या विद्यार्थ्यांची ही तपासणी करण्यात आली. दरम्यान, ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, शिराळा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाच्या वतीने नाक, कान व घसा (ENT) संबंधित आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 15 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या 5 मुलांवर ENT सर्जन डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नूतनगौरी टकेकर यांचे नियोजन व उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील पथकातील नियुक्त कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व सहाय्यक अनिता हसबनीस यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी यांची मदत व सहकार्य लाभले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा