गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती; सांगलीत १२,०८५ घरकुले पूर्ण
- प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी संवाद साधण्यावर भर;
- क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प”चा संदेश
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा परिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीणमधील घरकुलांच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात मंजूर ४१,५६४ घरकुलांपैकी १२,०८५ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित घरकुलांचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेले जात आहे. सेवा संकल्प अभियानातून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी थेट संवाद साधत घरकुल कामाचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प” याच भावनेतून कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.
“सेवा हाच सर्वोच्च संकल्प” हाच संदेश देत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत वेळेवर मार्गदर्शन आणि शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, ही प्रशासनातील प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्याची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यात १५ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील घरकुल आणि मनरेगा विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. लाभार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे.
याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी बेडग आणि आरग येथे प्रत्यक्ष भेट देऊन घरकुलांच्या कामांची पाहणी केली. तर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी वाळवा तालुक्यातील कामांचा आढावा घेतला. या क्षेत्रीय भेटींमधून लाभार्थ्यांशी संवाद, स्थानिक यंत्रणांना मार्गदर्शन आणि कामांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला जात आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर मिळवून देण्याच्या उद्दिष्टाला गती मिळत आहे. प्रशासन, क्षेत्रीय यंत्रणा आणि लाभार्थी यांच्या समन्वित प्रयत्नांतून सांगली जिल्ह्यात घरकुल पूर्ततेची मोहीम पुढे सुरू आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा