मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

सांगलीच्या समाजकल्याण कार्यालय परिसरात 'सेवा संकल्प अभियान'अंतर्गत वृक्षारोपण

सांगली, दि. 6 (जि. मा. का.) : दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि निसर्गाचे संगोपन करण्याच्या उदात्त हेतूने, 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत आज सांगली येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय परिसरात विशेष वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, तसेच सहाय्यक लेखाधिकारी संजय कुलकर्णी आदिंसह अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते कार्यालय परिसर व परिसरात रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण काळाची गरज असून, सध्या बिघडत चाललेला पर्यावरण समतोल आणि तीव्र तापमानावर मात करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे किती गरजेचे आहे, यावर याप्रसंगी उपस्थितांनी भर दिला. केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यालय अधीक्षक प्रशांत मोहिते, समाज कल्याण निरीक्षक राहुल जाधव, कल्याणी दैठणकर, अमृता लिमये, शितल जाधव व तुषार शिवशरण, प्रकल्प अधिकारी, बार्टी गणेश सवाखंडे, भरत चौगुले, राहुल माळी तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा