मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान

सांगली, दि. 6 (जि. मा. का.) : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजना व कायदेशीर तरतुदींची माहिती करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 1 व 2 ऑक्टोबर रोजी विविध उपक्रम घेण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली यांच्या वतीने चैतन्य आश्रम, विश्रामबाग, सांगली येथे सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. तसेच इस्लामपूर येथील बचतधाम सभागृह, पंचायत समिती येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली आणि अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. चैतन्य आश्रम येथे समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, कार्यालय अधीक्षक प्रशांत मोहिते, समाज कल्याण निरीक्षक अमृता लिमये, राहुल जाधव व तुषार शिवशरण यांनी ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच, दैनंदिन जीवनात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याबाबत चर्चा करण्यात आली. इस्लामपूर येथे बचतधाम सभागृहातील कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम यांनी केले. विधी प्राधिकरणाचे ॲड. किरण पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांशी संबंधित कायदे व कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाज कल्याण विभाग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे अतूट नाते असून ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव व योगदान समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून समाजाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजना आणि उपलब्ध सुविधांबाबत जनजागृती करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, कार्यालय अधीक्षक प्रशांत मोहिते, समाज कल्याण निरीक्षक अमृता लिमये, समतादूत प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, तालुका समन्वयक सुहास लोखंडे, समतादूत विक्रांत शिंदे यांच्यासह मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अंकुश पाटील यांनी केले, तर समाज कल्याण निरीक्षक अमृता लिमये यांनी उपस्थितांचे आभार मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा