गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत सीईओ विशाल नरवाडे मांडणार कडेपूर ग्रामपंचायतीचा डिजीटल ग्रामविकास

- महाराष्ट्र राज्यातर्फे नामनिर्देशन - धर्मशाळा येथे 16, 17 ऑक्टोबरला कार्यक्रम सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कारामध्ये सलग दोन वर्षे महाराष्ट्रातील दोन ग्रामपंचायतींना अव्वल स्थानी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुधारणा परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातर्फे नामनिर्देशन करण्यात आले आहे. धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे येत्या 16 व 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत श्री. नरवाडे कडेपूर ग्रामपंचायतीचा डिजिटल ग्रामविकासाचा अनुभव मांडणार आहेत. ग्रामपंचायतींमधील ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरासाठी प्रथमच २०२५ मध्ये स्वतंत्र पुरस्कार श्रेणी सुरू करण्यात आली. पहिल्या दोन्ही वर्षात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कारात 2025 मध्ये आदिवासीबहुल रोहिणी ग्रामपंचायत (जि. धुळे) आणि 2026 मध्ये कडेपूर ग्रामपंचायत (जि. सांगली) दोन ग्रामपंचायतींनी देशभरात प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पुरस्कार पटकावला. ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी सुरू झाल्यापासून सलग दोन्ही वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सुमारे २ लाख ७० हजार ग्रामपंचायतींमधून या दोन ग्रामपंचायतींनी अव्वल स्थान मिळवले. या उल्लेखनीय यशस्वी उपक्रमांची माहिती देशातील इतर राज्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातर्फे राष्ट्रीय परिषदेत सादरीकरणासाठी श्री. नरवाडे यांचे नामनिर्देशन केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाकडे करण्यात आले आहे. धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद होणार आहे. या परिषदेत देशभरातील केंद्र व राज्यस्तरीय संस्था सुशासन आणि ई-गव्हर्नन्समधील अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत. या परिषदेत कडेपूर ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रवास आणि यशस्वी कार्यपद्धती श्री. नरवाडे सादर करतील. ग्रामपंचायत स्तरावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकाभिमुख सेवा आणि नवोन्मेषी प्रशासनाची क्षमतेची नोंद घेऊन ग्रामपंचायत स्तरावर ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर आणि डिजीटल ग्रामविकासातील या उपक्रमांची या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा