शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

जिल्ह्यात 39 टँकरव्दारे 41 गावे, 286 वाड्यातील 80 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 9 ऑक्टोबर अखेरच्या अहवालानुसार 32 खाजगी व 7 शासकीय अशा एकूण 39 टँकरव्दारे 41 गावे व 286 वाड्यातील 80 हजार 799 बाधित लोकसंख्येला व 8 हजार 301 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 25 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत. जत तालुक्यातील टंचाईग्रस्त ३३ गावे व २३१ वाड्यांमधील सुमारे ६७,७९२ लोकसंख्येला ३२ टँकरद्वारे (२६ खाजगी व ६ शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १४ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून २ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी २ खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व ६ वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 6 गावे व 41 वाड्यांमधील 10318 नागरिकांना आणि 8301 पशुधनाला 5 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा