बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कल्याणकर यांचा गौरव

- छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीमुळे परदेशात उच्च शिक्षणाची संधी सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत सांगली येथील गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कल्याणकर यांची छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समतादूत संयोगिता हेरकळ यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रथमेश यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राज्यातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध निकष व निवड प्रक्रियेतून प्रथमेश कल्याणकर यांची निवड झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे प्रथमेश यांना परदेशात उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञान व कौशल्याची उंची गाठण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी समतादूत संयोगिता हेरकळ यांनी प्रथमेश यांच्या यशाचे कौतुक करताना, "परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना यशाची नवी शिखरे सर करण्यास बळ देतो," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा