सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय स्तरावर प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणी सांगलीत 15 ऑक्टोबरला महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत
सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : शासन निर्णयानुसार अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालती’चे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महसूल लोकअदालतीमध्ये सर्व संबंधितांनी उपस्थित राहून आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुधाकर पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. विविध कारणांमुळे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो. तसेच, एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात. त्यामुळे महसुली दावे अनेक वर्षे सुरू राहतात. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने हे दावे कायमस्वरूपी निकाली काढल्यास अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होण्यासह पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत होणार आहे.
महसूल लोक अदालतीमध्ये अपिलातील दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा वकिलामार्फत तडजोड करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल करू शकतात. या अभियानात सहभागी होऊन महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रकरणे निकाली काढून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे ही लोकअदालत १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा