बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६
सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरज येथे अडीच हजार शासकीय लाभाचे वितरण
सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरज येथे आयोजित शिबिरात विविध शासकीय सेवा व योजनांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 568 शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार डॉ. अर्पणा मोरे-धुमाळ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे, शासकीय योजनांच्या मंजुरीची कागदपत्रे तसेच आवश्यक सुविधांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप, आधार कार्ड सुविधा, महसूलविषयक नोंदी, मदारी व गोसावी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, सामाजिक सहाय्य योजनांतर्गत मंजूर लाभांची प्रमाणपत्रे, ऑनलाइन शिधापत्रिका आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत लहान मुलांना किटचे वाटप, मातृत्व योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेशांचे वितरण, आभा कार्ड तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा सेवा संकल्प अभियानाचा उद्देश आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत झाली.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा