मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक - जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत 13 कार्यशाळा
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी SVEEP मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी, म.न.पा. सांगली यांच्यामार्फत १३ कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. तसेच केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक आणि शाळांचे मुख्याध्यापक यांच्या बैठका घेऊन मतदार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने पात्र शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष व जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.
जिल्ह्यात महिला बचत गटातील महिला व ग्रामसखी यांच्यासाठी पदवीधर मतदार जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी साखळी, शहरातील मुख्य चौकांमध्ये पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती, सहविचार सभा, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संदेश, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि स्लोगनद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 1, जिल्हा परिषद कार्यालय परिसर 1, महानगरपालिका सांगली 1, तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 3 फलक लावण्यात येणार आहेत.
मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राची माहिती एका मिनिटात मिळवा
पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक तपासण्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Search या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी – (1) ‘मतदार संघ निवडा (पदवीधर / शिक्षक)’ हा पर्याय निवडावा. (2) जिल्हा सांगली, तालुका व नाव टाकावे. (3) Captcha टाकून Search करावे. (4) भाग क्रमांक व अनुक्रमांक नोंद करून ठेवावा. आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून मतदानाचा हक्क बजावावा.
000000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा