गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

श्रीदुर्गामाता मूर्तींचे विसर्जन मिरजेतील गणेश तलावात करावे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे आवाहन

- सर्व मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : कृष्णा नदीपात्रातील पाण्याची कमी पातळी, पर्यावरणाचे संरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या दृष्टीने शारदीय नवरात्र उत्सवानंतर श्रीदुर्गामाता मूर्तींचे विसर्जन श्रीकृष्णा नदीमध्ये न करता मिरज येथील गणेश तलावात करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. या आवाहनाला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेश मंडळे / नवरात्र उत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत मिरज येथील गणेश तलाव येथे मूर्ती विसर्जन करण्यास सहमती दर्शविली. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र उपस्थित होत्या. यावेळी पर्यावरणाचे संरक्षण, नदीपात्रातील पाण्याची सद्यस्थिती आणि पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने मूर्ती विसर्जनाबाबत चर्चा करण्यात आली. कृष्णा नदी ही पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असल्याने नदीपात्रात मूर्ती विसर्जन केल्यास पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी सर्व मंडळांनी श्रीदुर्गामाता मूर्तींचे विसर्जन मिरज येथील गणेश तलावात करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी यावेळी केले. सार्वजनिक हित आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या या आवाहनास सर्व मंडळांनी सहमती दर्शविली. मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये क्रेन, विद्युत व्यवस्था या सुविधा महानगरपालिका पुरविणार आहे. तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त तरतूद व इतर अनुषंगिक सुविधा पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन संयुक्तरित्या करणार आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा