गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानअंतर्गत सांगलीत 159 बालकांची मोफत नेत्रतपासणी; 66 बालकांवर होणार शस्त्रक्रिया

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डी.ई.आय.सी.च्या माध्यमातून सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयोजित नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात जिल्ह्यातील 159 नेत्रदोष असलेल्या बालकांची मोफत तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 66 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाड्यांमधून आरोग्य तपासणीदरम्यान संदर्भित करण्यात आलेल्या नेत्रदोष असलेल्या बालकांसाठी हे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व डॉ. माधवी पटवर्धन तसेच आभाळमाया फाउंडेशनचे नारायण उंटवाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करारबध्द डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय यांच्या पथकामार्फत अद्ययावत नेत्रतपासणी साहित्याच्या सहाय्याने बालकांची सखोल तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील जतपासून शिराळ्यापर्यंतच्या सर्व तालुक्यांसह महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संदर्भित बालकांची तपासणी यावेळी करण्यात आली. तपासणीनंतर 66 बालकांना विविध प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रियांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध योजनांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. यापैकी 43 शस्त्रक्रिया योजनेंतर्गत केल्या जाणार असून, उर्वरित 23 शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र निधी मदतीच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस व रोहित चौगुले यांनी नियोजन केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बालकांचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी संदर्भित केले. कार्यक्रमासाठी डी.ई.आय.सी. व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा