शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६
प्रत्येक मत महत्त्वाचे; सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
- मतपत्रिका अवैध ठरणार नाही, यासाठी मतदानाच्या नियमांचे पालन करा
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 मध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असून, सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. या निवडणुकीत मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने मतपत्रिका अवैध ठरणार नाही, यासाठी मतदानाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. याबाबत मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत पदवीधर व शिक्षक मतदार जनजागृतीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी मनोज जाधव, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नानाभाऊ हजारे, विस्तार अधिकारी (प्राथमिक) रामचंद्र टोणे, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणेश भांबुरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, मतदान करताना मतदारांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करावा. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना पहिला पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. पसंतीक्रम अंकांमध्येच नोंदवावेत; अक्षरांमध्ये लिहू नयेत. मतपत्रिका व्यवस्थित हाताळावी आणि त्यावर अनावश्यक खुणा करू नयेत. या सूचनांचे पालन केल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता टाळण्यास मदत होईल. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेची योग्य माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्वीप नोडल अधिकारी मनोज जाधव यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणेश भांबुरे यांनी सादरीकरणाद्वारे मतदानाची पद्धत, मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया आणि मतदान करताना घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
या बैठकीस विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक तसेच पदवीधर मतदार उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा