शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना 1370 रास्तभाव दुकानांमधून लाभार्थ्यांना धान्य वाटप - प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यात पात्र लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचे वाटप सुरू असून, सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1 हजार 370 रास्त भाव दुकानांमार्फत हे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 970, तर शहरी भागातील 400 रास्तभाव दुकानांचा समावेश असल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, उपलब्ध आकडेवारीनुसार, सांगली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत 28 हजार 937 शिधापत्रिकाधारक, तर प्राधान्य कुटुंब गटातील (PHH) 3 लाख 86 हजार 341 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. या दोन्ही गटांतील अनुक्रमे 1 लाख 8 हजार 66 आणि 16 लाख 3 हजार 258 लाभार्थी घटकांचा (Units) समावेश आहे. ग्रामीण भागासाठी सर्वाधिक धान्याचे नियतन ग्रामीण भागासाठी नोव्हेंबर 2026 करिता अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 387.93 मेट्रिक टन गहू आणि 222.34 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब गटासाठी 3 हजार 581.784 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 342.86 मेट्रिक टन तांदळाचे नियतन आहे. शहरी भागासाठी नोव्हेंबर 2026 करिता अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 255.20 मेट्रिक टन गहू आणि 150.80 मेट्रिक टन तांदूळ, तर प्राधान्य कुटुंब गटासाठी 1 हजार 100.922 मेट्रिक टन गहू आणि 733.95 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. एकूण धान्य नियतन सांगली जिल्ह्यासाठी दोन्ही योजनांतर्गत एकूण नोव्हेंबर 2026 करिता 5 हजार 325.834 मेट्रिक टन गहू आणि 3 हजार 449.943 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप सुरू असल्याचे आकडेवारीत नमूद आहे. या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्य उपलब्ध होत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा