शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

रास्त किंमतीत सोयाबीन बियाणे उपलब्धतेसाठी घरचे बियाणे वापरण्याचे नियोजन आतापासूनच करा - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : खरीप हंगाम सन 2026- मधील अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर, आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची संभाव्य कमतरता लक्षात घेता, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणे शास्त्रीय पद्धतीने जतन व साठवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील वर्षी चांगल्या दर्जाचे व रास्त किंमतीत सोयाबीन बियाणे उपलब्ध होण्यासाठी, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्याचे नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होत आहे. सोयाबीन हे सांगली जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असल्याने, यंदाच्या कमी उत्पादनामुळे पुढील वर्षी बियाण्याच्या उपलब्धतेबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांनी स्वतः जवळ चांगल्या दर्जाचे बियाणे राखून ठेवून ते पुढील खरीप हंगामातील पेरणीसाठी वापरणे हा अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित ओलीत केले आहे आणि ज्यांचे सोयाबीन उत्पादन समाधानकारक दर्जाचे आहे, त्यांनी पुढील खरीप हंगामासाठी आवश्यक तेवढे बियाणे राखून ठेवावे. तसेच, आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनाही ते उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांनी पुढील हंगामात आवश्यक असलेल्या बियाण्याची उपलब्धता आत्तापासूनच सुनिश्चित केल्यास, गावात अथवा परिसरात चांगल्या दर्जाचे बियाणे वाजवी किंमतीत उपलब्ध होईल. पुढील हंगामात वापरायच्या सोयाबीन बियाण्यासाठी पिकाची योग्य पद्धतीने मळणी व साठवणूक करावी त्याकरिता आवश्यक सूचना व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे - बियाण्याची उगवणक्षमता टिकवण्यासाठी मळणी यंत्राचा आरपीएम 350 ते 400 पेक्षा कमी ठेवावा. वेगवेगळ्या वाणांचे बियाणे काढणी व मळणीच्या वेळी एकमेकांत मिसळणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. मळणीसाठी वापरलेले यंत्र पूर्वीच्या पिकाचे अवशेष न राहता स्वच्छ करावे, यामुळे वाणांची भेसळ टाळता येते. बियाणे साठवताना जास्त मोठी थप्पी लावू नये. तसेच, वाहतूक व हाताळणी करताना बियाण्याची आदळापट होणार नाही, याची काळजी घ्यावी; कारण सोयाबीन बियाणे उगवणीसाठी संवेदनशील असते. याबाबत शेतकरी वर्गात व्यापक जनजागृती व्हावी व त्यांनी स्वतःकडील बियाणे शास्त्रीय पद्धतीने जतन करून बियाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने कृषि विभाग "घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीम" राबवित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा