शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची उभारणी

जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची उभारणी - जलसंधारण, भूजल पातळीत वाढ आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्यासाठी तसेच भूजल पुनर्भरणास चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 500 वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यंत्रणा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात जिल्हाधिकारी श्री. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. वनराई बंधारे हे कमी खर्चात आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर करून उभारता येणारे जलसंधारणाचे प्रभावी साधन आहे. नाल्यांमधून व ओढ्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा काही काळ साठा निर्माण करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यासाठी हातभार लावणे, या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व आहे. जलसंधारणासाठी लोकसहभागावर भर जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध गावांमध्ये स्थानिक परिस्थिती आणि उपलब्धतेनुसार वनराई बंधारे उभारण्यात आले. जवळपास 500 वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे या जलसंधारणाच्या उद्दिष्टाला चालना देण्यात आली. शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत ग्रामस्थांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या उपक्रमाला हातभार लावला. जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि गावपातळीवर पाणी अडविणे व पाणी जिरविण्याच्या उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, हा या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश आहे. सामूहिक प्रयत्नांतून जलसमृद्ध गावांकडे वाटचाल बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन, पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर वनराई बंधारे उभारणीसारखे उपक्रम ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरू शकतात. गावातील उपलब्ध मनुष्यबळ, स्थानिक साधनसामग्री आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयातून अशा कामांना गती देणे शक्य आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी. विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्या सहभागामुळे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांच्या समन्वयातून या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावपातळीवर समन्वय साधत या उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे जलसंधारणाच्या कामांबाबत सामूहिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्हा परिषद सांगलीने जलसंधारणासाठी लोकसहभागातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाभरात उभारण्यात आलेले जवळपास 500 वनराई बंधारे हे जलसंधारणाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून गावोगावी जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होऊन भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा