शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
वनविभागातर्फे सांगली जिल्ह्यात 247 वनराई बंधारे पूर्ण
- १,५०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने सांगली वनविभागाने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिलेल्या १,५०० वनराई बंधाऱ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वनविभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सागर गवते म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली १,५०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्राथमिक टप्प्यात २१० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असताना १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण २४७ वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू असून, या सामूहिक जलसंधारण उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
सन 2026 मधील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खालावलेली भूजल पातळी, जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा आणि कमी पर्जन्यमान या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सात वनपरिक्षेत्रांना प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण २१० बंधारे बांधण्याचे प्राथमिक उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट ओलांडण्यात आले आहे.
विटा वनपरिक्षेत्रात सर्वाधिक ७० बंधारे पूर्ण
वनविभागाने १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलेल्या बंधाऱ्यांची वनपरिक्षेत्रनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. विटा वनपरिक्षेत्रात ७०, शिराळा ६२, सांगली ३०, कडेगाव २६, जत २२, आटपाडी २२ आणि तासगाव वनपरिक्षेत्रात १५ बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. अशा प्रकारे सातही वनपरिक्षेत्रांत मिळून एकूण २४७ वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
लोकसहभागातून जलसंधारणाला चालना
या मोहिमेत वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक सहभागी होत असून, श्रमदानाच्या माध्यमातून वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर बंधारे उभारण्यात येत आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि मातीची धूप रोखणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत. या कामांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढण्यास मदत होत आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा