सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६
रब्बी ज्वारी बियाणे मिनिकीट वितरणासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सांगली जिल्ह्याकरीता 4 किलो प्रति या प्रमाणे 18 हजार 10 मिनिकीट असे एकूण 720.40 क्विंटल बियाणे वितरण लक्षांक प्राप्त झालेला आहे. हे मिनिकीट 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2026 पूर्वी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई, शेती उत्पादनावरील संभाव्य प्रतिकूल परिणाम विचारात घेता, रब्बी ज्वारी पिकास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. रब्बी ज्वारी हे तुलनेने कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे तृणधान्य व चारा पिक असल्याने सद्यपरिस्थितीत या पिकाच्या लागवडीस चालना देणे आवश्यक आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून सन २०२६-२७ मध्ये प्रथमच विशेष बाब म्हणून रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिनिकीट द्वारे बियाणे उपलब्ध करून रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ घडवून आणणे आणि प्रतिकूल पर्जन्यमानाच्या परिस्थितीत अन्नधान्य व पशुचारा उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थितीचा संभाव्य परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्याकरीता 4 किलो प्रति या प्रमाणे 18 हजार 10 मिनिकीट असे एकूण 720.40 क्विंटल बियाणे वितरण लक्षांक प्राप्त झालेला आहे. हे मिनिकीट 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असून या घटकांसाठी लाभार्थी निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
000000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा