शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विभागीय आयुक्त यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

            सांगली, दि. 2, (जि. मा. का.) :  पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश देवून नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज शेतकऱ्यांना दिली.
डॉ. म्हैसेकर यांनी आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, शेळकेवाडी व तासगाव तालुक्यातील मणेराजुरी व कवठेएकंद येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, डाळींब, ज्वारी, सोयाबीन आदि पीकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपविभागीय अधिकारी मिरज समिर शिंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी पीकांची पाहणी केल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे, शेतकऱ्यांकडे अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत असे सांगून पंचनाम्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्रे काढून ठेवावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबतची कागदपत्रे तयार करावीत. त्यासाठी विमा प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगितले.
जिल्ह्यात माहे ऑक्टोबर महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत एकूण दोन ते अडीच पट पाऊस जास्त झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 512 गावांमधील १ लाख १७ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे   33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे काढणी योग्य सोयाबीन, मका, भुईमुग, ज्वारी व बाजरी आदि पिकांचे नुकसान झाले आहे. अतिजोराच्या अवेळी झालेल्या पावसामुळे फळे व भाजीपाला पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षांचे घड कुजले आहेत. द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाची फळे झडली आहेत. हवेतील आद्रता वाढून फळकुज, बॅक्टेरिया व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रब्बी हंगामातील उगवण झालेली मका व रब्बी ज्वारी पीक अतिपावसामुळे काही ठिकाणी पिवळे पडले आहे. एकूणच परतीच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यात कृषि क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देवून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

00000