गुरुवार, ३० जुलै, २०२०

कर्तव्यावर हजर न होणाऱ्या ८ जणांवर मेस्मा अंतर्गत कारवाई

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केले होते. यामध्ये ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही अशा ८ जणांवर मिरज पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे.
सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे.
पुजा कलाब, योगेश सुहास आवळे, केतन सोन्याबापू कांबळे, केतन सुर्यवंशी, ज्योती आप्पासो कांबळे, श्वेता धोंडीराम भाट, ऋषीकेश पाटील, पुजा भोसले यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
00000



शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात होईल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात नागरी भागात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केलेले आहे. तसेच राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार दि. 01 ऑगस्ट 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.
     सांगली जिल्ह्याच्या सीमा, बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील. या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल. आंतरराज्य व आंतरजिल्हा व्यक्तीच्या प्रवासावर प्रतिबंध असेल व असा प्रवास मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियंत्रित केला जाईल. सदर कालावधीत 21.00 वाजलेपासून ते 05.00 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील.
     चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस (Entertainment), प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणाची उपासनास्थळे प्रतिबंधित असतील. तसेच खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यास प्रतिबंध असेल. हॉटेल्स, रेस्टोरंट, आणि इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल्स, रेस्टोरंट व किचन येथून पार्सल देणे व घरपोच सेवा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल. तसेच निवासी व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउस या आस्थापना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि.७ जुलै २०२० च्या आदेशानुसार सुरु राहतील.
     जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके आजार असणाऱ्या व्यक्ती ( Persons with co-morbidities ) यांना अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे.
     सदर कालावधीत अंत्यविधीकरिता 20 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी Social Distancing पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच लग्नसमारंभ विषयक बाबी लॉन / विना वातानुकुलीत - मंगल कार्यालय/ हॉल / सभागृह मध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 च्या आदेशातील अटी व शर्तींचे अधीन राहून करण्यास परवानगी असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने (medical shops) वगळून सर्व मार्केट व दुकाने 09.00 वाजे पूर्वी व 19.00 वाजले नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
     सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधित असेल. तसेच पानपट्टी मधून पान, तंबाखू, सुपारी व तत्सम पदार्थ फक्त पार्सल स्वरूपात देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेस या  500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल. तसेच सदर बाबीचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) या क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
     क्रीडा संकुले किंवा स्टेडीयमच्या आतील क्षेत्र (बंदिस्त) (indoor) याचा वापर प्रतिबंधित असेल. शासन आदेशानुसार वेळोवेळी शिथिलता देण्यात आलेल्या बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरु असण्यास परवानगी असेल.
     परवानगी असलेल्या बाबीना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. क्रीडा संकुले आणि मैदाने यांच्या बाह्य जागा आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक जमणेस व समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास प्रतिबंध करणेत येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करणेस हरकत नाही. खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस, जिमनॅस्टिक, टेनिस, खुल्या मैदानातील बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून दि. 05 ऑगस्ट 2020 रोजी पासून करणेस परवानगी असेल. केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. ३० जून 2020 च्या आदेशानुसार परवानगी असेल. यापूर्वीच्या आदेशाने सुरु करणेत आलेले सर्व उद्योगधंदे व बांधकामे या पुढेही सुरु राहतील.
     जिल्हा अंतर्गत (Intra District) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालील प्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतूक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवासी व चालक / वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.  दुचाकी - 1 + 1 हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल, तीन चाकी - 1 + 2 व  चार चाकी - 1 + 3.
     जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50 टक्के प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनेसह सुरु करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
     मॉल्स दि. 05 ऑगस्ट 2020 पासून 09.00 वाजले पासून ते 19.00 वाजे पर्यंत सुरु राहतील. तथापि मॉल्स मधील सिनेमागृहे, खाद्यगृहे / रेस्टोरंट पूर्णपणे बंद राहतील. परंतु मॉल्स मधील अन्नगृहे / रेस्टोरंट ची स्वयंपाकगृहे सुरु ठेवून पार्सल सुविधा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल.
     वरील नमूद प्रतिबंधित बाबी वगळता उर्वरित सर्व बाबीना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय यांचेकडील निर्देशानुसार प्रतिबंध व सुट लागू असेल.  
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
00000


कोविड-19 : लक्षणे व सक्रीय उपचाराची गरज असणाऱ्या रूग्णांनाच कोविड रूग्णालयांमध्ये दाखल करून उपचार करावेत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कोविड-19 रूग्णांलामध्ये लक्षणे असलेल्या व ज्यांना रूग्णालयीन उपचाराची गरज आहे, अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून घेणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवलेल्या रूग्णालयातील बेड्स लक्षणे असलेल्या व ज्यांना सक्रीय उपचाराची गरज आहे अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसलेल्या व ज्यांना सक्रिय वैद्यकिय उपचाराची गरज नाही अशा रूग्णांना कोणत्याही परिस्थितीत कोविड रूग्णालयात दाखल करून घेऊ नये. तर अशा रूग्णांना कोविड केअर सेंटर किंवा त्यांच्या पसंतीनुसार पात्र असल्यास होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. यावेळी त्यांनी फॅसिलिटी ॲप व बेड मॉनिटरिंग सिस्टीम विहीत कालावधीत अद्ययावत करणे बंधनकारक असून महापालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत निर्देशित करावे, असे सांगितले.
या बैठकीत कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यात येत असणारी शासकीय व अधिग्रहित करण्यात येणारी खाजगी रूग्णालये या ठिकाणचे रूग्ण तसेच कर्मचारी वृंद यांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करावे. तसेच अद्यापही कर्तव्यावर रूजू न झालेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व कर्मचारी यांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस बजावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
00000


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचे चिंतन घरीच राहून करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जगात व देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती जनतेने घरातच राहून त्यांच्या विचारांचे, कार्याचे, साहित्याचे चिंतन करून साजरी करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या १०० व्या जयंती दिनानिमित्त्‍ जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. माणसाचं माणूस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. गावकुसाबाहेरचा, राबणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा माणूस आणि त्याची असणारी जीवनावरची निष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे लिहीत आणि गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक आणि नायिका बनवणारे अण्णा भाऊ साठे हे मराठीतील महत्वाचे साहित्यिक आहेत. कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी, गावगाढा आणि स्वातंत्र्य चळवळ याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अणा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलिकडे पोहचवली. सर्व प्रकारच्या कर्मठ आणि कट्टरपणाला विरोध करून न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणूक अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महान साहित्यिक, लोकशाहीराच्या 100 व्या जयंती दिनी  आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे, त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या विचारांचे या दिवशी स्मरण करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करावा. त्यांची जयंती  जनतेने घरातच थांबून साजरी करून त्यांना अभिवादन करावे. आणि कोरोनाविरूध्दच्या लढाईतील एकजूट दाखवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सर्व श्रेष्ठ मानवी मुल्यांचे चिंतन जन्मशताब्दी दिनी करून सर्व नागरिकांनी आपल्या घरी थांबूनच त्यांना अभिवादन करावे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करावा. तसेच प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे व कुटुंबिय तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
0000

ekhMR;mso-ascii-font-family:DVOT-SurekhMR; color:black'> 

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बार्टी समतांदूतांमार्फत 59 अनुसूचित जातीचे गावनिहाय सर्वेक्षण - जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे व जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 59 अनुसूचित जाती नामशेष होणाऱ्या जातींना इतर जातीच्या प्रवाहात येण्यासाठी सांगली जिल्ह्यात काम चालू आहे. सांगली जिल्ह्यातील 7 समतांदूतामार्फत गावनिहाय 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अशी माहिती बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी दिली.
     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील तालुक्यात कार्यरत असलेल्या समतांदूतांच्याकडून तालुक्यातील गटविकास अधिकारी व गावातील ग्रामसेवकांच्या सहकार्याने 59 अनुसूचित जातीच्या विकासासाठी अधिक प्रभावी योजना व उपक्रम राबविण्यासाठी गावनिहाय 59 अनुसूचित जातीचा सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे. बार्टी, पुणे या स्वायत्त संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीच्या विकासासाठी व उत्थानासाठी कार्य केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती मधील समाविष्ट 59 जातींपैकी महार, मांग, चांभार, मेहतर, वाल्मिकी, ढोर, अशा मोजक्याच जातीबाबत समाजात माहिती असते. परंतु या जाती व्यतिरिक्त 59 जातींतील काही जाती महाराष्ट्र राज्यातून नामशेष होताना दिसून येत आहे. म्हणून आशा जातीचा शोध घेऊन त्याची सध्यपरिस्थिती जाणून घेऊन संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. जेणेकरून या इतर जाती देखील विकासाच्या प्रवाहात येतील. या सर्वेक्षणासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. परंतु आरोग्याची काळजी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून समतादूत अंकुश चव्हाण, सागर आढाव, आबासाहेब भोसले, विक्रांत शिंदे, सविता पाटील, लता सुरवसे, शहाजी पाटील विशेष परिश्रम घेत असल्याचे श्री. सवाखंडे यांनी सांगितले.
00000


वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल आणि विवेकानंद हॉस्पीटलमध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली मध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोविड-19 उपचारासाठी वॉनलेस हॉस्पीटल येथील 100 बेड्स चा सेटअप महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत चालविले जातील. तसेच याच ठिकाणी आणखी 50 बेड्सचा सेटअप सशुल्क असेल. सदर हॉस्पीटलमध्ये रूग्णांना विना अडथळा सुविधा व उपचार मिळावेत यासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपायुक्त महानगरपालिका, असिस्टंट चॅरिटी कमिशनर, मिरज सिव्हील हॉस्पीटलचे डॉ. निरगुंडे, डॉ. सोमनाथ, डॉ. दिक्षीत यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेले बेड्स व सशुल्क उपचारांसाठी राखीव असणारे बेड्स या दोन्हींचे नियंत्रण प्रशासकीय समिती मार्फत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
तसेच घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली ही देखील कोविड-19 उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत असून वरील तीनही हॉस्पीटल्समध्ये त्वरीत कोविड रूग्णांवर उपचार सुरू करावेत, असे निर्देशित करण्यात आले आहे.
कोविड उपचारासाठी अधिगृहित करण्यात येणारी हॉस्पीटल्स ही संबंधित हॉस्पीटलच्या व्यवस्थापनामार्फतच चालविण्यात येतील. आवश्यक तेथे प्रशासकीय यंत्रणा मदत पुरविण्याचा प्रयत्न करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परखड शब्दात स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजने अधिगृहित करण्यात येणाऱ्या हॉस्पीटल्सना विस्तृत ट्रेनिंग पुरवावे, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले. तसेच संबंधित हॉस्पीटल्सनी त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची त्वरीत यादी उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जी हॉस्पीटल सद्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचिबध्द नाहीत, अशा हॉस्पीटल्समधील जेवढ्या संख्येचे बेड्स कोविड-19 च्या उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत आहेत तेवढे बेड्‌स महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येतील, असे सांगितले.
सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पहाता खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडस्‍ कोविड-19 विषाणू बाधित रूग्णांसाठी उपलब्ध करून घेणे व त्यावर देखरेख ठेवणे याकरिता समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती विविध रूग्णांलयांना भेटी देवून तेथील उपलब्ध साधन सामग्री व सुविधा याबद्दल अहवाल सादर करते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात येतो. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सेवासदन हॉस्पिटल मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया, सांगली, श्वास हॉस्पिटल गारपीर रोड, सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग, सांगली यांचे अधिग्रहण करण्यात आले असून या ठिकाणी डेडिकेटेड कोविड उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिगृहित करण्यात आलेल्या रूग्णांलयांमध्ये रूग्णांना आवश्यक सुविधा विना अडथळा मिळाव्या तसेच रूग्णालयातील प्रशासकीय नोंदी व लेखे तपासणी यासाठी प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
दरम्यान महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी डॉ. शरद घाटगे यांचे घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली हे अधिगृहित केले असून या हॉस्पीटलमध्ये शनिवार दि. २५ जुलै पासून कोविड रूग्णांवर उपचार देण्याबाबत आदेश जारी केले आहेत.


000000

गुरुवार, २३ जुलै, २०२०


मास्क, रूमाल किंवा कापडाने नाक तोंड झाकून वावरणे बंधनकारक अन्यथा 500 रूपये दंड
                                  - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव तात्काळ नियंत्रण करणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरल्याने कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रूमाल किंवा कापडाने नाक तोंड झाकून वावरणे बंधनकारक असलेबाबतच्या दि. 13 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.
हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू


सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : विविध आंदोलने आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 24 जुलै ते 5 ऑगस्ट 2020 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 24 जुलै 2020 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते  दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
00000