शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्काडा प्रणाली वापरून उभारलेल्या आणि सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 828 मीटर लांबीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, महावितरणच्या संचालिका निता केळकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर चे अधिक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपअभियंता संजय देसाई, माजी आमदार नितीन शिंदे, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, शाखा अभियंता राजेंद्र मोगली, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, टि. ॲन्ड टी. इन्फ्रा लि. पुणे चे विकास पुराणिक, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.
सांगली येथील विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुल हा मिरज तालुक्यातील पद्माळे, सांगली, अंकली, इनामधामणी विश्रामबाग, माधवनगर, पद्माळे रस्ता राज्य मार्ग क्र. 154 भाग विश्रामबाग ते माधवनगर रेल्वे गेट क्र.  137 येथे येतो. एमआयडीसी सांगली, साखर कारखाना, सांगली कुपवाड, यशवंतनगर, बालाजीनगर, संजयनगर सर्व शहरी विस्तारीत भाग व तासगाव कराड असा उत्तरेकडील भागाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश सन 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येवून यासाठी 200 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली.
या मार्गावरील रेल्वे गेट दिवसातून 52 वेळा बंद व उघड करावे लागत असल्याने रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होवून रूग्ण सेवेला व इतर आवश्यक वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच वर्दळीची वाहतूक असल्याने वारंवार अपघात घडत होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सदर उड्डाण पुलासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. या उड्डाण पुलामुळे वाहतूकीचा त्रास कायमस्वरूपी बंद होणार आहे. या पुलाची लांबी 828 मीटर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 10.50 मीटर रूंदीचे 25 मीटरचे 6 गाळे व रेल्वे विभागामार्फत 30 मीटरचा एक गाळा असा एकूण 180 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. विश्रामबाग बाजूस 10.50 मीटर लांबीचा एक व कुपवाड बाजूस 13.50 मीटर लांबीचा एक व्हेइकल अंडर पास ठेवण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस 5.50 मीटर रूंदीचे सेवा रस्ते करण्यात आले आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी या उड्डाण पुलासाठी अतिक्रमण काढणे व त्यांचे पुनर्वसन करणे, तसेच पोलीस विभाग, रेल्वे विभाग, महानगरपालिका, विद्युत विभाग तसेच विभागांचे एकत्रित सहकार्य जमवून आणणे इत्यादी कामे अत्यंत जलदगतीने उत्कृष्ठ पध्दतीने केली. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण झाले.
000000




शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

सांगलीत कृष्णेची पातळी 29.3 फूटावर स्थिर ; कोणतीही धोकादायक स्थिती नाही नागरिकांनी घाबरू नये सतर्कता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सध्या कोयना धरणातून 41 हजार 514 व वारणा धरणातून 14 हजार 851 क्युसेक विसर्ग सुरु आहे. शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून सांगली येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फूट 3 इंचावर स्थिरावली असून आयर्विन पूलाजवळ असणाऱ्या 40 फूट या इशारा पातळीपेक्षाही सद्याची पाणी पातळी जवळपास 10 फूट कमी आहे. पर्जन्यमान व विसर्ग सध्या प्रमाणेच राहिल्यास पाणी पातळी कमी होईल. कोणतीही धोकादायक स्थिती नाही. नागरिकांनी घाबरू नये. नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
            शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजेपर्यंत कोयना 42 मि.मी., महाबळेश्वर 21 मि.मी., नवजा 44 मि.मी., वळवण 33 मि.मी., अशी पर्जन्यवृष्टी झाली आहे. कोयना धरण पाणीसाठा 103.30 टी.एम.सी (98 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांवरुन 4.50 फूट करण्यात आले आहेत. तर  पाण्याचा विसर्ग 70 हजार 404 क्युसेस वरुन 41 हजार 514 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  14 हजार 851 क्युसेक्स इतका आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 74 हजार 812 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पूल येथील पाणीपातळी सध्या 29 फुट 3 इंच इतकी स्थिर असून सध्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास यापुढे ती स्थिर राहील अथवा यामध्ये घट होईल. कृष्णा पूल कराड येथे पाणी पातळी सकाळी 6 वाजता असणारी 24 फूट 10 इंच पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजेपर्यंत ती 21 फूट 1 इंचावर आली होती. तर भिलवडी येथे दुपारी 12 वाजता 35 फूट 10 इंच असणारी पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजता 35 फूट 5 इंचावरती आली होती. याचे अवलोकन करता पाणी पात्राबाहेर जाणार नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन यामध्ये समन्वय आहे. आपल्याकडील पाणी पातळीत काही बदल संभवल्यास 24 ते 48 तास आधी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल व सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेतली जाईल. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ सावधानता व सतर्कता बाळगावी. कोणत्याही आपत्तीमध्ये मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असणाऱ्या आपत्ती निवारण कक्षाशी ०२३३-२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
00000

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि.मा.का.) : कोयना धरणातून सद्या 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून चांदोली धरणातून 3400 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग असाच पुढील दोन दिवस सुरू राहिल्यास सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सद्या 10 फूट 6 इंच असणारी पाणी पातळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्ये रहाणार असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगून सतर्क रहावे व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, धरणातून होणाऱ्या विसर्गावर प्रशासन नजर ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जावू नये पण सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी अलमट्टी धरणातून 1 लाख विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

00000

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



 सांगली, दि. 4, (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे निवडणूक विषयक कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधानसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने यंत्रणांनी निवडणूक विषयक कामकाज गतीमान करावे. परस्परांमध्ये समन्वय ठेवावा व काटेकोरपणे कामकाज हाताळावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सांगली शहरासह अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांची तपासणी करून दुरूस्तीबाबत तपशिलासह प्रस्ताव द्यावेत. मतदार जनजागृती मोहिमेबाबतचा तपशिलवार आराखडा तयार करावा असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची संख्या विचारात घेवून सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव तयार करावेत. दिव्यांग मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांचे मार्किंग करावे. एसएसटी, व्हीडिओ सर्व्हिलियंस टीम आदि अनुषंगिक टीम तयार कराव्यात. मतदान केंद्रात बदल असेल तर त्या संबंधित परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. चुनाव पाठशाला उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा, असेही निर्देश यावेळी दिले.
00000

पूरबाधित कुटूंबाना 64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

-  पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
- 28 हजार 27 घरांची पडझड

सांगली, दि. 4 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 3 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 936 कुटूंबांना 42 कोटी 21 लाख 40 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 34 हजार 397 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 21 कोटी 68 लाख 85 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 3 सप्टेंबर अखेर 79 हजार 168 कुटुंबांना एकूण 7916.8 क्विंटल गहू व 7916.8 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 60 हजार 264 इतक्या बाधित कुटुबांना 5 लिटर प्रमाणे 3 लाख 1 हजार 320 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
28 हजार 27 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 391 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 18 हजार 636 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1923 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत.

50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 99 हजार 698 शेतकऱ्यांच्या 50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 2 गावांसाठी एकूण 4 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

27 हजाराहून अधिक पशुधनावर उपचार
 जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 837 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 380 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 9 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 43 लाख 32 हजार 400 इतकी आहे.
जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 284 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 23 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 306 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 52.48 कोटी इतका आहे.

000000

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे. कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
विविध ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 71, नवजा 90, महाबळेश्वर 104, धोम 20, कन्हेर 12, उरमोडी 14, तारळी 2 व वारणा 36.

000000

नदीकाठच्या लोकांना सावधानता बाळगण्याचे नदीपात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात येवून पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे. यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होवून सद्यस्थितीत 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000