बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी पात्र उमेदवारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होत असते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील सर्व 23 वर्षांखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा, ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. तरी या स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in / या लिंकवर भेट देवून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून 50 देशातील एक हजार उमेदवार सहभागी झालेले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. सन 2024 मध्ये आयोजित जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक स्पर्धेच्या नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling, Mechatronics, Robot System Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात, पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 17 मार्च 2024 (मे 2024). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 27 जुलै 2024 (ऑक्टोबर 2024). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2024 - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, फेब्रुवारी 2024, पूर्व परीक्षा 16 जून 2024 (ऑगस्ट 2024). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2024 (जानेवारी 2025). सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2024, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 26 ऑक्टोबर 2024 (जानेवारी 2025). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2024 - कर सहायक, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्या परीक्षा 17 नोव्हेंबर 2024 (फेब्रुवारी 2025). महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2024 - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024, राज्य सेवा-33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 (जुलै 2024). अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक आयुक्त अनन तथा पदनिर्देशन अधिकारी व अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब - पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत व यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2024, कृषि अधिकारी गट अ, कृषि अधिकारी गट ब, कृषि अधिकारी गट ब कनिष्ठ, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक १, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (फेब्रुवारी 2025). निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2024, निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 1 डिसेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024, एकूण 33 संवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 14 डिसेंबर 2024, सकाळ भाषा पेपर-1 मराठी, दुपार भाषा पेपर-2, 15 डिसेंबर 2024, सकाळ सामान्य अध्ययन-2, दुपार सामान्य अध्ययन-1, 16 डिसेंबर 2024 - सकाळ सामान्य अध्ययन-4, दुपार सामान्य अध्ययन-3 (मार्च 2025). महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक वनसंरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 28 डिसेंबर 2024, सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकी, दुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 29 ‍डिसेंबर 2024, सकाळ वनस्पति शास्त्र / प्राणिशास्त्र, दुपार रसायनशास्त्र (मार्च 2025). 30 डिसेंबर 2024 सकाळ गणित/सांख्यिकी, दुपार वनशास्त्र, 31 डिसेंबर 2024 सकाळ भूशास्त्र, दुपार भौतिकशास्त्र (मार्च 2025). शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : यावर्षी जागतिक एड्स दिन दि. 1 डिसेंबर व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रभातफेरींचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयव्ही संसर्गित लोकांना उद्योगाच्या संधी मिळवून देण्यासाठी स्किल इंडिया उपक्रमातून प्रशिक्षण व पतपुरवठा करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध अशासकीय संस्था व देणगीदार यांच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित 18 वर्षे पेक्षा कमी वयोगटातील मुला मुलींना व HB कमी असलेल्या रूग्णांना पोषण आहार देणे व मुला मुलींच्यासाठी वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर YRG Care संस्थेच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित लोकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचे छोटे माहितीपुस्तक QR code सहीत तयार करून रूग्णांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम यांनी दिली. जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमिवर माहिती देताना डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 17 ICTC, 1 Mobile ICTC व 1 PPP-ICTC च्या माध्यमातुन HIV समुपदेशन व चाचणी सेवा दिली जाते. तसेच HIV शोध मोहिमेसाठी 2 गुप्तरोग तपासणी केंद्रे व 18 रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळते. जिल्ह्यातील 4 ART सेंटर व 11 लिंक ART सेंटरच्या माध्यमातून 10 हजार 705 HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार दिला जातो. ART औषधोपचारमुळे HIV विषाणूंची संख्या नियंत्रणात राहून होणाऱ्या संधीसाधु आजारांना अटकाव केला जातो, असे ते म्हणाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, Treat all Policy अंतर्गत सर्वच HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. तसेच ज्या रूग्णांच्या तपासणीमध्ये HIV संसर्ग असल्याचे आढळून आले आहे, परंतु अद्याप ते उपचारासाठी ART सेंटर पर्यंत गेले नाहीत अशा सर्वांना गृहभेटी घेऊन त्यांना ART औषधोपचाराचे महत्व पटवून दिले जात आहे व या सर्वांना ART औषधोपचारावरती घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. HIV संसर्गित रूग्णांकरिता वेगळी डायलेसीस मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी कार्यान्वीत झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व रूग्णांना पुरेल एवढा औषधसाठा आपणाकडे उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व HIV संसर्गित रूग्णांनी या औषधप्रणालीचा लाभ घेऊन आपले आयुष्य सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे. 00000

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान ‍दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 00000
संविधान दिनानिमित्त बाईक रॅलीस प्रतिसाद सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान ‍दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त अशोक पवार, नितीन जोंधळे, अरुण परसुळे, विठ्ठल काळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचा जागर करणारा समता चित्ररथ व बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस. टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक - राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात रॅलीची सांगता झाली. संविधानाचा जागर करून या माध्मयातून घराघरात समता पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 00000

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- विकसित भारत संकल्प यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ - 26 जानेवारीपर्यंत चालणार मोहीम - जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रमोद काळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 6 व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, ती जिथे जिथे जाईल, तिथे तिथे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे. तरी सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे ते म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. यात्रेंतर्गत पहिल्या टप्प्यात 6 तालुक्यांमध्ये व्हॅन फिरणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 4 तालुक्यामध्ये व्हॅन फिरणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत आज दि. 24 व उद्या 25 नोव्हेंबर रोजी सदर व्हॅनचे तालुकानिहाय मार्गक्रमण पुढीलप्रमाणे – शिराळा – दि. 24 नोव्हेंबर – रेड, बेलदारवाडी, दि. 25 नोव्हेंबर – खेड, भटवाडी मिरज – दि. 24 नोव्हेंबर – सावळी, कानडवाडी, दि. 25 नोव्हेंबर – मानमोडी, रसूलवाडी कडेगाव – दि. 24 नोव्हेंबर – कोतवडे, नेर्ली, दि. 25 नोव्हेंबर – अपशिंगे, खंबाळे औंध जत – दि. 24 नोव्हेंबर –अंकले, डोर्ली, दि. 25 नोव्हेंबर – बाज, बेळुंखी विटा – दि. 24 नोव्हेंबर –गार्डी, घानवड, दि. 25 नोव्हेंबर – हिंगणगादे, नागेवाडी कवठेमहांकाळ – दि. 24 नोव्हेंबर –अलकूड एम, बोरगाव दि. 25 नोव्हेंबर – जायगव्हाण, मळणगाव 00000

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

एच. आय. व्ही संसर्गित रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 23 ‍(जि. मा. का.) : एच. आय. व्ही सह जगणाऱ्या रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. आयुष्मान कार्ड मिळवून देण्यासाठी, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत समावेशासाठी त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात एचआयव्ही बधितांची संख्या घटत आहे ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करून डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एच. आय. व्ही. संसर्गिताचे आरोग्य, शिक्षण, रोजगार व आर्थिक मदत यावर भर द्यावा. त्यासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची छोटी माहिती पुस्तिका क्यू आर कोडसह तयार करावी. सर्व बाधितांना आयुष्मान कार्ड द्यावे. तसेच, पारंपरिक कारागिरांची नोंदणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये करावी. मागणीनुसार कौशल्य विकास विभागाकडून व्यवसाय प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, औषधोपचारांबरोबर पोषक आहार देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना, आर्थिक निकड दूर करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, १८ वर्षांखालील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीसाठी बालसंगोपन योजना, औषधोपचारासाठी प्रवासासाठी बस सवलत योजना यांचा लाभ देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. तसेच, साखर कारखानदारांना एच. आय. व्ही. संसर्गित रूग्णांना पोषक आहारासाठी देणगी देण्याचे आवाहन करावे. तसेच, ज्यांनी देणगी दिली आहे, त्यांचा सत्कार एड्स दिनाच्या कार्यक्रमात करावा, अशा सूचना दिल्या. गर्भवती मातांची पहिल्या तिमाहीत तपासणी करावी जेणेकरून सर्व संसर्गित मातांना वेळेत उपचार मिळतील व मातेपासून बाळाला होणारा एच. आय. व्ही. संसर्ग थांबविण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. यासाठी शहरी व ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एचआयव्ही संसर्गित रूग्णांना ए. आर. टी. सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच, अनिच्छुक रूग्णांचे विशेष समुपदेशन करावे. माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रमाद्वारे व तपासणीद्वारे संबंधित रूग्णांवर उपचार करावेत, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण, तालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्या, ए. आर. टी. सेंटरमधील उपचार, सुरक्षा क्लिनिक, रक्तसुरक्षा कार्यक्रम, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प, अतिजोखमीचे गट, स्थलांतरीत कामगार, एच. आय. व्ही – टी. बी. समन्वय, गर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली. 00000

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

बेरोजगारांसाठी 30 नोव्हेंबरला प्लेसमेंट ड्राईव्ह

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक, कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय प्लेसमेट ड्राईव्हचे आयोजन गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करावा. मुलाखतीसाठी 30 नोव्हेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण 4 विविध खाजगी नामवंत कंपन्या व हॉस्पीटल सहभागी होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने विरेशा कास्टिंग प्रा. लि. एमआयडीसी कुपवाड, सुपरक्राफ्ट फौन्ड्री नं. 2, एमआयडीसी मिरज, बालाजी ॲटो सर्व्हीसेस कुपवाड व कुसुंभ कल्याण निधी लिमीटेड वसंतनगर सांगली भाग घेणार असून त्यांच्याकडील एकूण 101 जागा भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

रब्बी हंगाम 2023 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

सांगली, दि. 22 ‍(जि. मा. का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात गहू बागायत, ज्वारी बागायत, ज्वारी जिरायत व हरभरा या पिकासाठी अनुक्रमे ६८, १७, ५० व ५९ महसूल मंडळामध्ये विमा क्षेत्र घटक धरुन भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या योजनेंतर्गत नैर्सगिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास योजनेतील अटी-शर्तीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेवू शकतात. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील ५ वर्षाचे पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पन्न गुणीले जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित करण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतून वजावाट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतीम मुदत, नोंदणीच्या अंतीम मुदतीच्या ७ दिवसआधी द्यावी. जे कर्जदार शेतकरी विहीत मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहीत धरुन, शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहीत पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टरी 1 रूपया असून पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर व कंसात विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे आहे. गहू बागायत - 30 हजार रूपये (15 डिसेंबर 2023), ज्वारी बागायत - 35 हजार रूपये (30 नोव्हेंबर 2023), ज्वारी जिरायत - 25 हजार रूपये (30 नोव्हेंबर 2023), हरभरा - 35 हजार रूपये (15‍ डिसेंबर 2023), उन्हाळी भुईमुग - 40 हजार रूपये (31 मार्च 2024). प्रतिकुल हवामान घटकामुळे अपूरा पाऊस, किंवा हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकाची अधिसूचित विमाक्षेत्र घटकातील पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण अथवा पेरणी / लावणी न झाल्यास ही तरतूद लागू आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीमुळे अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के मर्यादेपर्यत आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देय राहील. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे. स्थानिक नैर्सगिक आपत्ती अंतर्गत पडलेल्या पावसामुळे विमासंरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्ख्लन, गारपीठ, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे नैर्सगिक आगयामुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. काढणीपश्चात नुकसान भरपाई हे अधिसूचित क्षेत्रातील, पिक शेतात कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकासाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवसापर्यंत गारपिट, चक्रिवादळ व त्यामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. स्थानिक नैर्सगिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार, बाधीत पिक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. यासाठी प्राधान्याने कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित मोबाईल क्रॉप इन्शुरन्स अँपद्वारे तक्रार नोंदविणे अभिप्रेत आहे. त्यानंतर केंद्रिय टोल फ्रि क्रमांक १८००४१९५००४ चा वापर शेतकऱ्यांनी करावा. केंद्रिय टोल फ्रि क्रमांक उपलब्ध न झाल्यास आपत्तीबाबतची माहिती भारतीय कृषि विमा कंपनीच्या तालुका/ जिल्हास्तरीय कार्यालयास द्यावी किंवा हेही उपलब्ध न झाल्यास बँक/कृषि व महसूल विभाग यांना तात्काळ द्यावी. स्थानिक आपत्ती अथवा काढणी पश्चात पिक नुकसानीची तक्रार नोंदवल्याशिवाय शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही. या योजनेंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका / बँक शाखा /प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था (नोडल बँकमार्फत), व बिगर कर्जदार शेतकरी प्राधिकृत बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), जवळच्या तसेच संबधित विमा कंपनीची कार्यालये, www.pmfby.gov.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधारकार्ड /आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, भाडेपट्टाकरार असेल तर नोंदणीकृत करारनामा/ सहमतीपत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स्, मोबाईल क्रमांक इ. जोडणे/ ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

जिल्हा परिषद गट-क पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 पद्मभूषण वसंतरावदादा पाटील ‍ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली या परीक्षा केंद्रावर घेण्यात सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा एकूण चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस,डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पेठ या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी सांगली या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4 व दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली व आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा खंबाळे भा., एमआयडीसी विटा या परीक्षा केंद्रावर दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभ

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियान दि. 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महारेशीम अभियानाच्या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज करण्यात आला. यावेळी रेशीम विकास अधिकारी बी. बी. कुलकर्णी, वरिष्ठ तांत्रिक सहायक डॉ. बी. एम. खंडागळे, वरिष्ठ क्षेत्र सहायक सुनिल पाटील, क्षेत्र सहायक बी. डी. माने, श्री. कदम, श्री. शेख तसेच रेशीम शेतकरी उपस्थित होते. हा रेशीम रथ जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव, आटपाडी, पलूस इत्यादी तालुक्यामधून फिरवण्यात येणार आहे. या माध्यमातून रेशीम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच, सन 2024-25 साठी रेशीम शेती नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 00000

मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. सांगली मिरज एमआयडीसीमधील रस्ते कामासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, महानगरपालिकेचे अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वित्त अधिकारी सुशील केंबळे, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके आणि अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम तसेच अन्य पदाधिकारी आदि उपस्थित होते. मिरज एमआयडीसी महानगरपालिका क्षेत्रात आहे. या क्षेत्रात एकूण 11.53 कि.मी.चे रस्ते असून यामध्ये 8.75 किमी मुख्य रस्ता व 2.78 किमी अंतर्गत रस्ते आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज एमआयडीसीमधील रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक संबंधित विभागांनी प्राधान्याने आणि तात्काळ करावे. तसेच समांतरपणे अन्य प्रशासकीय प्रक्रिया प्राथम्याने आठवड्याच्या कालमर्यादेत पूर्ण करावी. रस्त्यांसाठी आवश्यक एकूण निधीच्या २५ टक्केअंतर्गत रक्कम स्वनिधीमधून एमआयडीसीतील उद्योजकांनी करापोटीचा महसूल म्हणून महानगपालिकेकडे जमा करावी. उर्वरित निधी नगरोत्थानमधून देण्यात येईल. उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले. हे रस्ते काम होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदारपणे करावे, अशा सूचना डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व आयुक्त सुनील पवार यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसंदर्भात विचार मांडले. उद्योजकांनी त्यांचे मत मांडले. 00000

जिल्हा परिषद गट-क पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 पद्मभूषण वसंतरावदादा पाटील ‍ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली या परीक्षा केंद्रावर घेण्यात सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा एकूण चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस,डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पेठ या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी सांगली या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4 व दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली व आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा खंबाळे भा., एमआयडीसी विटा या परीक्षा केंद्रावर दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी आज शिबिर

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दि. २१ व २४ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ति यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शिबिरावेळी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड/ मतदानकार्ड/ पॅनकार्ड/ जन्माचा दाखला/ रेशनकार्ड/ पासपोर्ट/ पासबुक/ जातीचा दाखला/ मनरेगा कार्ड या नमूद दस्तऐवजांपैकी कोणतेही एक सोबत घेवून येणे आवश्यक असेल. पत्रकात म्हटले आहे, तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सांगली - पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांवरोड, घाटगे हॉस्पिटल मागे, सांगली, या कार्यालयाकडून जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तिंना राष्ट्रीय पोर्टलवरून ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 21 व 24 नोव्हेंबर रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर शिबिरामधून ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ती यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. 00000

सांगलीत 26 डिसेंबरला डाक अदालत

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत दि. 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. तक्रारी स्विकारण्याचा अंतिम दि. 11 डिसेंबर 2023 आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. संबंधितांनी आपली तक्रार तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा याचा सपष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह दि. 11 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवर अधिक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांच्या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा महोत्सव आयोजनाची बैठक संपन्न

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : सन २०२३ – २४ च्या जिल्हा स्तरावरील युवा महोत्सवाच्या आयोजनाची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकऱ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नेहरू युवा केंद्राचे सागर व्हनमाने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 30 नोव्हेंबरपूर्वी आयोजन करावे. महोत्सव आयोजनाबाबतची सर्व प्रक्रिया शासन नियमानुसार पार पाडावी. महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच अंमली पदार्थ विरोधी पथनाट्यांना महोत्सवात सहभाग द्यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केल्या. बैठकीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे स्वरूप व बाबी, स्पर्धेचे ठिकाण व दिनांक, तज्ज्ञ परीक्षक नियुक्ती यासह अन्य अनुषंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी दर वर्षी जिल्हास्तरावर युवा महोत्सव आयोजित केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिली आहे. या महोत्सवामध्ये समूह व वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत कथा लेखन, पोस्टर लेखन, वक्तृत्त्व स्पर्धा, फोटोग्राफी, संकल्पना आधारीत स्पर्धा तसेच हस्त कला, ॲग्रो प्रॉडक्ट आदि प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगट राहील. जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवा स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र राहतील. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे, वंचित लाभार्थींची नोंदणी करणे व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तरी संबंधित सर्व विभागांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपसंचालक नगररचना ज्ञानेश्वर ढेरे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्राकडून नियुक्त पर्यवेक्षक तथा जिल्हा प्रभारी अधिकारी श्री. शुक्ला तसेच, जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. या मोहिमेत सर्व विभागांनी सक्रिय योगदान द्यावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या मोहिमेंतर्गत ग्रामविकास, नगरविकास आणि अन्य महत्त्वाचे विभाग असे ३ प्रकारे वर्गीकरण करून पात्र वंचित लाभार्थींना लाभ द्यायचा आहे. प्रत्येक विभागासाठी त्यांच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही एक सुसंधी आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ६ व्हॅन प्राप्त होणार आहेत. प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. तरी प्रत्येक शासकीय विभागाने आपापल्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रचार-प्रसिध्दी, या मोहिमेचे सखोल नियोजन करावे. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्या लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. सांगली जिल्ह्यात या आठवड्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्याच्या अनुषंगाने सर्वांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री. शुक्ला म्हणाले, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी, मोहिमेच्या आधीच्या परिस्थितीची आणि नंतर झालेल्या बदलाची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती केंद्र शासनाकडून राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम राबविली जात आहे. “जनजाती गौरव दिनी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून, सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. या मोहिमेंतर्गत ग्राम/शहरी/नगरपालिका स्तरावर भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. 00000

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) :- कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार आज म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाच्या पंप गृह क्र.१ येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व श्री. पवार उपस्थित होते. रब्बी आवर्तनामध्ये म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये पुच्छ भाग ते शीर्ष भाग (Tail to Head) धोरणाअन्वये पाणी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला जत, सांगोला, मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार असून तदनंतर 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 00000

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे 24 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपध्दतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. या समितीचा विभागनिहाय दौरा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित झाला आहे. या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा आढावा घेणारा लेख... उद्दिष्टे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी लेक लाडकी योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. मिळणारा लाभ या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. अटी व शर्ती ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच दुसऱ्या प्रसूतिच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे तसेच लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लाख पेक्षा जास्त नसावे. आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील), पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला), संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied), कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार) १०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे.) थेट लाभार्थी हस्तांतरण शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे लाभाची रक्कम लाभार्थींना अदा करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालय स्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येईल. लेक लाडकी’ योजनेत लाभार्थींची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, सबंधित पर्यवेक्षिका, तर नागरी भागात मुख्यसेविका यांची राहील. (संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली) 00000

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तिंना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्क्यांपर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांच्या लाभासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गामधील गरजू व्यक्तिंनी ऑनलाईन कर्ज अर्ज www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेत स्थळावर दाखल करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत लाभार्थीस व्यवसायासाठी 10 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून (१२ टक्केच्या मर्यादेत ) अनुदान स्वरुपात देण्यात येते. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रूपये इतके कर्ज वितरीत करण्यात येते. कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून (१२ टक्केच्या मर्यादेत ) अनुदान स्वरुपात देण्यात येते. गट कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, इत्यादींना व्यवसायासाठी 15 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादित) महामंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येते. थेट कर्ज योजना - महामंडळाकडून लाभार्थीस व्यवसायासाठी 1 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली दूरध्वनी 02332321513 येथे संपर्क करावा, असे आवाहन श्री. दरेकर यांनी केले आहे. 00000

अंगणवाडी मदतनीस पदासाठी 8 डिसेंबरपर्यंत अर्जमागणी

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सांगली शहर या प्रकल्पांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत अंगणवाडी मधील 8 रिक्त मदतनीस पदे सरळ नियुक्तीने भरावयाची आहेत. स्थानिक रहिवासी असलेल्या 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, वय वर्षे किमान 18 ते कमाल 35 वर्षे पर्यंत (विधवा उमेदवारासाठी ही मर्यादा कमाल 40)असणाऱ्या महिला उमेदवाराकडून 16 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 सायंकाळी 6.15 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सांगली शहर विजयमाला माने-खरात यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी व शर्तीबाबत http://sangli.nic.in या संकेतस्थळावर पदभरती अर्ज व जाहिरात प्रसिध्द करण्यात आल्याचे श्रीमती माने-खरात यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 67 लाखांवर अभिलेखे तपासणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

आतापर्यंत 12 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहात आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरील विशेष कक्षांमार्फत 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाख 46 हजार 270 नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 12 हजार 803 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमिअभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी 11 शासकीय कार्यालयातील विविध अभिलेखे, तसेच 1967 पूर्वीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत 10 तहसील कार्यालये व 1 अप्पर तहसील कार्यालयाचे 22 लाख 43 हजार 918 नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये 9 हजार 731 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. अन्य कार्यालयांतून 45 लाख, 2 हजार, 352 नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 3 हजार 72 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. 00000

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप

सांगली, दि. 10 ( जि. मा. का.) : राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे, अशी भावना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली. सोमवार पेठ मिरज आणि कवलापूर येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात पात्र लाभार्थ्यांना 'आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीना निंबाळकर यांच्यासह परिसरातील मान्यवर पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आनंदाचा शिधा संचात केवळ १०० रूपयात सहा जिन्नस प्रति लाभार्थी देण्यात येत असल्याने गरजवंतांना सणामध्ये दिलासा मिळाला आहे. आनंदाचा शिधा वितरणात जिल्ह्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शिधा वितरणामध्ये जिल्हा राज्यात तिसरा आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 6 हजार 760 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये सांगली 53392, मिरज 46826, कवठेमहांकाळ 23639, जत 51047, आटपाडी 22893, कडेगांव 24890, खानापूर विटा 27088, तासगाव 41612, पलूस 27753, वाळवा 61628 आणि शिराळा तालुक्यात 25992 कुटुंबांना आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा संचात साखर, खाद्यतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे. मिरज तालुक्यात प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील 46 हजार 826 लाभार्थी आनंदाचा शिधा संचासाठी पात्र असून आतापर्यंत मिरज तालुक्यात ६२ टक्के कुटुंबांना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आल्याचे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी सांगितले. कवलापूर येथील आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कवलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विकास सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ०००००

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज 8 डिसेंबर 2023 पर्यंत दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ असून अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध) आहे. टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे.. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. 000000

सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली, दि. 10 (जि.मा.का.) : सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२१००) यांच्याकडे संपर्क साधावा. जो कोणी व्यक्ती कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदाराला उपद्रव देईल, तिच्यावर बळाचा वापर करील किंवा तिला धाकदपटशा दाखविल, जागोजागी पाठलाग करील, अथवा तिच्या अथवा तिच्या कुटुंबियाच्या जिविताला धोका असल्याची खात्री झाल्यास अशा प्रकरणी संबंधितांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, सांगली, पोलीस अधिक्षक सांगली व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी केले आहे. तसेच सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी व सावकारीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ दि. १६ जानेवारी २०१४ पासून अंमलात आलेला आहे. या अधिनियमातील कलम १८ अन्वये सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकरणी प्राप्त तक्रारी अर्जावर चौकशी करण्यात आल्यावर तसेच वैयक्तीक सुनावणी झाल्यानंतर सावकाराने दिलेल्या कर्जाबददल प्रतिभूती म्हणून स्थावर मालमत्ता सावकाराच्या कब्जात असल्याची जिल्हा निबंधकाची खात्री पटली तर तो संलेख किंवा अभिहस्तांतरणपत्र अवैध असल्याचे घोषित करता येईल आणि त्या मालमत्तेचा कब्जा कर्जदाराकडे किंवा यथाशक्ती त्याच्या वारसाकडे किंवा उत्तराधिकाऱ्याकडे परत करण्याचा आदेश देण्याची तरतूद आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या एकूण तक्रारीपैकी 5 प्रकरणांमध्ये एकूण 62 हेक्टर 16 आर इतकी स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम 18 अंतर्गत चौकशी करून परत करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी सर्व सावकारी तक्रारी अर्जासंबंधातील संबंधीत यंत्रणांनी वेळेवर तक्रारी निकाली काढाव्यात. गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी. तसेच परवाना नसतांना अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये पाच वर्षांचा कारावास व 50 हजार रूपये इतक्या दंडाची तरतूद कायद्यात केलेली असून सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे. तरी सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली (संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६००३०० ईमेल- ddr_sng@rediffmail.com किंवा sangliddr@gmail.com) यांच्याकडे अथवा संबंधीत तालुक्याचे उपनिबंधक /सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. 00000

मिठाई व इतर अन्न पदार्थांची खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 10 (जि.मा.का.) : दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, इतर अन्न पदार्थांची खरेदी केली जाते. या कालावधीत दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने नागरिकांनी असे अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नि. सु. मसारे यांनी केले आहे. मिठाई व इतर अन्न पदार्थ खरेदी करताना व सेवन करताना नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ती ताजी आहे याची खात्री करून किमान आवश्यकतेनुसार खरेदी करावी. बिलाशिवाय मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नये तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्याबाबत आग्रही रहावे. उघडयावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये, तसेच फेरिवाल्याकडून खवा (मावा) खरेदी करणे टाळावे. माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे, तसेच, त्याची साठवणूक योग्य तापमानास / फ्रिजमध्ये करण्यात यावी. बंगाली व तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो ८-१० तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचे सेवन न करता ती नष्ट करावी. मिठाई खराब झाल्याची शंका असल्यास अथवा चवीत फरक जाणवला तर त्याचे सेवन न करता मिठाई नष्ट करावी. ग्राहकांना गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सांगली यांच्याकडे ०२३३-२६०२२०१ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी. अन्न व्यावसायीकांनी ताजे अन्न पदार्थ विकावेत, मुदतबाह्य किंवा शिळे अन्न पदार्थ विक्री करू नये. दिवाळी कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून स्वीट मार्ट, तात्पुरते फराळ विक्रेते व इतर अन्न पदार्थ यांच्या तपासण्या व अन्न नमुने घेण्याचे कामकाज सुरु राहणार असल्याचेही श्री. मसारे यांनी कळविले आहे. 00000

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आत्तापर्यंत 2 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 8 नोव्हेंबरअखेर 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली असून, नागरिकांकडे याबाबत काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. त्यानुसार सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष कक्षांमार्फत 8 नोव्हेंबरअखेर 10 लाख 6 हजार 655 दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या दस्तावेजातून 2 हजार 211 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये मराठी भाषेतील 2 हजार 157 व मोडी लिपीतील 54 नोंदींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या दस्तावेजामध्ये मिरज तालुक्यात 4 लाख 25 हजार 518 तपासणी करण्यात आली. यामध्ये 183 नोंदी आढळून आल्या. तासगाव तालुक्यात 2 लाख 5 हजार 784 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 546 नोंदी आढळून आल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात 50 हजार 977 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 41 नोंदी आढळून आल्या. जत तालुक्यात 3 हजार 205 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. खानापूर- विटा तालुक्यात 77 हजार 537 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 16 नोंदी आढळून आल्या. आटपाडी तालुक्यात 27 हजार 803 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. कडेगाव तालुक्यात 22 हजार 381 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 13 नोंदी आढळून आल्या. पलूस तालुक्यात 41 हजार 562 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 3 नोंदी आढळून आल्या. वाळवा तालुक्यात 75 हजार 416 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 605 नोंदी आढळून आल्या. शिराळा तालुक्यात 1 हजार 723 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 804 नोंदी आढळून आल्या व अपर तहसील सांगलीमध्ये 74 हजार 749 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. 00000

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

माविममार्फत वेलणकर मंगल कार्यालयात 7 ते 9 नोव्हेंबर कालावधीत दिवाळी मेळावा

सांगली, दि. 6 (जि.मा.का.) : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या मालाची विक्री वाढावी या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे दि. 7 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये तीन दिवशीय दिवाळी मेळावा 2023 आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत वेलणकर मंगल कार्यालय, राममंदिर-काँग्रेस भवन रोड सांगली येथे संपन्न होत आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयमाला माने-खरात, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात 35 बचत गट सहभाग नोंदविणार असून दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले दिवाळी फराळ, फराळाचे विविध मसाले, ड्राय फ्रुट्स, कलाकुसरीच्या वस्तू, आकाश कंदील, पणत्या, लाईटच्या माळा, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, सुवासिक अत्तरे, उटणे, ज्वेलरी, लहान मुलांची कपडे, केरसुणी व झाडू, विविध खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू एका छताखाली मिळणार आहेत. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे. सर्व नागरिकांनी दिवाळी मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी केले आहे. 000000

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

सांगली दि. 3 ‍(जि.मा.का.) : जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच 22 ग्रामपंचायतीमधील 27 रिक्त जागांकरीता आणि 3 थेट सरपंच पोट निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होत आहे तर सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली. या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 365 मतदान केंद्रे असून राखीवसह 1 हजार 83 B.U. उपलब्ध करून दिलेले आहेत तर राखीवसह 541 C.U. उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 प्रत्येकी 454, 127 मतदान अधिकारी-4, शिपाई 459 अशा एकूण 2 हजार 434 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 1 लाख 87 हजार 798 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 96 हजार 867, स्त्री मतदार 90 हजार 930 व इतर 1 मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांना तसेच मतदान केंद्रावरील साहित्य ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 56 बसेस व 55 जीप वापरल्या जाणार आहेत. निवडणूका असलेल्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मिरज तालुक्यातील जानराववाडी, अपर सांगली मधील हरिपूर व नांद्रे, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, कोकळे, ढालगाव, दुधेभावी, ढोलेवाडी व देशिंग, पलूस तालुक्यातील कुंडल व आमणापूर ही संवेदनशील गावे आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदाना दिवशी व मतमोजणी दिवशी मद्यपान आस्थापना बंद राहतील. तासगाव तालुक्यातील चिखलगोठण, कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, मळणगाव, ढालगाव, कडेगाव, तालुक्यातील मौजे चिंचणी, शाळगाव, पलूस तालुक्यातील कुंडल अशा एकूण 7 गावामध्ये मतदानादिवशी बाजार दिवस असल्याने या गावामध्ये बाजार बंद राहील. मतदान केंद्राच्या परिसरामध्ये फौजदारी दंड संहिता कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. त्याचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी. मतदानास येताना मतदारांनी विहीत केलेल्या 17 ओळखपत्रापैकी ओळखीचे पुरावे म्हणून आणावेत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरल्यापासून मतमोजणी पर्यंतच्या कालावधीतील निवडणुकीवरील खर्च आयोगाने मर्यादा घालून दिलेल्या मर्यादेनुसार करण्याचा आहे. दैनंदिन झालेला खर्च हा उमेदवारांनी True Voter App यामध्ये भरण्याचाआहे. उमेदवारांनी केलेला खर्च पडताळणीसाठी तालुकास्तरावर पथक नेमण्यात आले असून त्याचे सनिंयंत्रण जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विहीत मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवाराविरूध्द निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. निवडणूक प्रचार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बंद झाला आहे. मतमोजणी दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार असून तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे. मिरज - शासकीय धान्य गोदाम, वैरण बाजार मिरज, तासगाव - बहुउद्देशीय हॉल, तहसिल कार्यालय तासगाव, कवठेमहांकाळ - नवीन प्रशासकीय इमारत, जत / अपर संख - नवीन प्रशासकीय इमारत शेजारील तहसिल कार्यालय सभागृह, खानापूर- ‍विटा - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तिसरा मजला मिटींग हॉल, आटपाडी - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत भवन पहिला मजला मिटींग हॉल, कडेगाव - तहसिल कार्यालय कडेगाव पहिल्या मजल्यावरील हॉल, पलूस - ‍मिटिंग हॉल तहसिल कार्यालय पलूस, वाळवा-इस्लामपूर - नूतन इमारत तहसिल कार्यालय वाळवा-इस्लामपूर तळमजला, शिराळा - तहसिल कार्यालय शिराळा नवीन प्रशासकीय इमारत, अपर सांगली - अपर तहसिल कार्यालय सांगली, अपर आष्टा - अपर आष्टा तहसिल कार्यालय परिसरातील पशुवैद्यकीय गोदाम. 00000

तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडीचा ट्रिगर २ मध्ये समावेश करावा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी सांगली, दि. ३ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील तासगांव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी हे नेहमी दुष्काळ असणारे तालुके आहेत. यावर्षी झालेला पाऊस, पिकांची परिस्थिती पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तातडीने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. तरी विशेष बाब म्हणून या सर्व तालुक्यांना दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर २) लागू करून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यामध्ये चालू वर्षी सरासरी पर्जन्‍यमान 62.3 टक्के झाले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा आणि मिरज या चार तालुक्यांना दुष्‍काळाची दुसरी कळ (ट्रिगर - 2) लागू झालेली आहे. मात्र, तासगांव, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यामध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली नसली तरी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. या तालुक्यात नेहमी अत्यंत कमी पर्जन्यमान होते. तसेच हे नेहमी दुष्काळ असणारे तालुके आहेत. यावर्षी झालेला पाऊस, पिकांची परिस्थिती पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे तातडीने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव दि. 26 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्‍त, पुणे यांना सादर करण्यात आला आहे. तरी विशेष बाब म्हणून या सर्व तालुक्यांना दुष्काळाची दुसरी कळ लागू करून तातडीने दुष्काळ जाहीर करणेबाबतचे आदेश संबंधितांना द्यावेत, ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. 00000

दीड हजार रोहित्रांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती

- वीज वितरणासाठी 1673 रोहित्रांची आवश्यकता - विशेष बाब म्हणून 73.50 कोटी निधीची मागणी सांगली, दि. ३ (जि. मा. का.) - सांगली जिल्ह्यामधील कृषी पंपासाठी वाढत्या वीज मागणीनुसार वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संभाव्य दुष्काळ परिस्थिती विचारात घेवून त्वरित उपाययोजना करण्यासाठी अतिरीक्त वितरण रोहित्रे उभा करणे आवश्यक आहेत. जिल्ह्यासाठी 1 हजार 673 रोहित्रांकरिता (TC) 73.50 कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, सदरचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून मिळावा, अशी विनंती कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. याबाबत सविस्तर तपशील देणारे निवेदन डॉ. खाडे यांनी आज प्रत्यक्ष भेटून उपमुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर हे तालुके आणि मिरज तालुक्याचा पूर्व भाग हा यापूर्वी पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेमुळे दुष्काळी भागामध्ये मोडत होता. यापूर्वी या क्षेत्रामध्ये रोहित्राच्या एकूण क्षमतेपेक्षा एकाचवेळी 50 टक्क्यांपेक्षा कमी विजेचा वापर होत असल्याने प्रत्येक रोहित्रावर क्षमतेपेक्षा दीडपट म्हणजेच 100 के.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्रावर 150 के.व्ही.ए. वीजभार मंजूर करण्यात आला होता. अलीकडच्या काळामध्ये टेंभू, ताकारी, म्हैसाळ इ. उपसासिंचन प्रकल्पांमुळे या क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध झाले आहे आणि त्यामुळे कृषीपंपाच्या वीज मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सदर वाढलेल्या वीज मागणीमुळे वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा कमी पडत असून वितरण रोहित्रे (TC) अतिभारीत होऊन नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. वीज वितरण व्यवस्थेमध्ये नवीन उपकेंद्राची उभारणी, उपकेंद्रांची क्षमतावाढ, नवीन वितरण रोहित्र उभारणी आणि वितरण रोहित्रांची क्षमतावाढ अशा स्वरूपाची कामे आवश्यक आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये याबाबत केंद्र शासनाच्या RDSS (REVAMPED DISTRIBUTION SECTOR SCHEME) अंतर्गत आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी 2071 कोटी रूपयांचा प्रकल्प अहवाल पाठविण्यात आला आहे. याबाबत निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात कामकाज होण्यास विलंब लागणार आहे. वरील सर्व परिस्थिती पाहता व संभाव्य दुष्काळाची परिस्थिती पाहता टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीमधून अखंडित पाणी उपसा झाल्यास पिण्याचे व सिंचनाचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यासाठी विद्युत व्यवस्थेचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी हे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संभाव्य दुष्काळ परिस्थिती विचारात घेवून त्वरित उपाययोजना करण्यासाठी अतिरीक्त वितरण रोहित्रे उभा करणे आवश्यक असून 1 हजार 673 रोहित्राकरिता (TC) 73.50 कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे. सदरचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून करून देणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. 00000

कोयनेतील १२ टीएमसी अतिरीक्त पाणी उपलब्धतेची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी उपसा सिंचन योजनांच्या प्रलंबित वीज देयकासाठी 35 कोटींची मागणी

सांगली, दि. ३ (जि. मा. का.) - सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विचार करता पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरीक्त पाण्याची मागणी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. तसेच, टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून सन 2023-24 मधील खरीप हंगामात टंचाई अंतर्गत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रलंबित 35.23 कोटी रूपयांच्या वीज देयकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी यावेळी डॉ. खाडे यांनी केली. याबाबत सविस्तर तपशील देणारे निवेदन डॉ. खाडे यांनी आज प्रत्यक्ष भेटून उपमुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यामध्ये पाणी वापराच्या नियोजनानुसार 47.5 टीएमसी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगांव, कवठेमहांकाळ, विटा-खानापूर व मिरज तालुक्यातील पूर्व भागामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी 12 टीएमसी अतिरीक्त पाण्याची आवश्यकता आहे. कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचे नियोजन, अपेक्षित तूट, सिंचन व वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी वजा जाता सध्या 70 टीएमसी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध आहे. त्यातील पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 35 टीएमसी व पूर्वेकडील सिंचन / बिगर सिंचनासाठी 35 टीएमसी पाणी वापर अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यासाठी चालू वर्षामध्ये उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये असणारी तूट, पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये झालेली वाढ आणि संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता 12 टीएमसी पाणी हे कोयनेतून अतिरीक्त उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोयनेमध्ये वीज निर्मितीसाठी ठेवलेल्या 35 टीएमसी पाण्यामधून हे 12 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील पाणी वापर नियोजनाप्रमाणे कोयना, वारणा, वांग, तारळी व पुनर्भरण याद्वारे उपलब्ध करावयाचे 47.05 टीएमसी पाणी व अतिरीक्त आवश्यक असणारे टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि कृष्णा नदीतून सोडण्यासाठी मागणी करण्यात आलेले आवश्यक पाणी 12 टीएमसी नियमितपणे व वेळोवेळी उपलब्ध करून द्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. ऑक्टोबर महिन्यामध्ये वेळेत पाणी न सोडल्यामुळे कृष्णा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नियोजनाप्रमाणे हे पाणी अखंडितपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून नदी कोरडी पडणार नाही व पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून सन 2023-24 मधील खरीप हंगामात टंचाई अंतर्गत सोडण्यात आलेलया पाण्याचे वीज देयक रू. 35.23 कोटी इतके प्रलंबित आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. 00000