सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

अप्रमाणित व अवैध वजन, मापे वापरणे बेकायदेशीर

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : अप्रमाणित व परदेशातून आयात केलेले वजन काटे व वैध परवाना नसलेल्या व्यक्तींनी तयार केलेले अवैध वजन काटे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात विशेष तपासणी मोहिम वैधमापन शास्त्र विभागाकडून हाती घेण्यात येत आहे. अप्रमाणित अवैध वजन काटे याचा वापर व विक्री संबंधितांनी त्वरीत थांबवावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल व अशी अवैध वजन काटे जप्त केली जातील. वैध परवाना नसलेल्या व्यक्तिीने सुध्दा अप्रमाणित वजन काट्याचे उत्पादन व विक्री त्वरीत थांबवावी, असे आवाहन वैधमापन शास्त्र सांगली कार्यालयाचे उपनियंत्रक द. प्र. पवार यांनी केले आहे. केंद्र शासनाकडून वैध प्रतिकृती मान्यता प्रमाणपत्र घेवून वैधमापन शास्त्र कायद्यातील तरतुदीनुसार तयार केलेली व स्थानिक निरीक्षकांव्दारे विहित पद्धतीने पडताळणी मुद्रांकन केलेली वजन मापे व तोलन उपकरणे हि प्रमाणित वजन माप असून अशीच वजन मापे व्यवहारात किंवा सुरक्षेकरिता वापरणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. वैध मापन शास्त्र कायद्यातील तरतुदीनुसार जी प्रमाणित नसतील अशा अवैध वजन मापांचा वापर कायद्याने प्रतिबंधित केलेला असून ती जप्त करून वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद वैधमापन शास्त्र कायद्यात आहे. त्यामुळे वैध प्रमाणित वजन मापे व इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर उपयोगकर्त्यांनी आपल्या व्यवहारात करावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे. अवैध व अप्रमाणित वजन मापांच्या वापरामुळे अचूक मोज मापाची खात्री देत येत नसल्याने उपयोगकर्त्यांना आपल्या व्यवहारामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते, शिवाय यामध्ये फसवणुकीच्या दृष्टीने सहजासहजी फेरफार केला जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे उपयोगकर्त्यांनी अशा अवैध वजनमाप व इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर त्वरित थांबवावा. कोणत्याही वजन मापांची उत्पादन विक्री व दुरुस्ती या बाबी वैधमापन शास्त्र कायद्याव्दारे नियमित केल्या जात असल्याने त्या करण्यासाठी वैध परवान्याची आवश्यकता असते. त्यामुळे वैध परवाना नसलेल्या व्यक्तींनी वजन मापाचे उत्पादन, विक्री व दुरुस्ती करू नये. अशी कृती बेकायदेशीर असून या करिता कायद्यात दंडाची तरतूद आहे. त्यामुळे परदेशातून आयात केलेले परंतु शासनाचे वैध प्रतिकृती मान्यता प्रमाणपत्र नसलेले व वैध परवान्याशिवाय सुटे भाग एकत्र करून बनविलेले अशी वजन मापे व इलेक्ट्रोनिक काटे अप्रमाणित असून त्यांची विक्री व वापर कोणत्याही व्यक्तींनी करू नये. ऑनलाईन ई कॉमर्स साईटवरुन वजन मापे खरेदी करणाऱ्यांनीसुध्दा कायदेशीर बाबीची खात्री करुनच वजन काटे खरेदी करावेत. विक्रेत्यांनी सुध्दा कायद्यातील तरतुदीची पुर्तता होत असल्याची खात्री करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे. 00000

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिला उमदी घटनेतील विद्यार्थ्यांना धीर

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : उमदी गावामध्ये असलेल्या समता अनुदानित आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना काल दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून आल्यानंतर या विद्यार्थ्यांना जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. याची दखल घेत गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ग्रामीण रूग्णालय जत येथे भेट देवून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. जत रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना धीर दिला. अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर आवश्यक ते योग्य उपचार करावेत, अशा सूचना श्री. सावे यांनी आरोग्य प्रशासनास दिल्या. यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार जीवन बनसोडे, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. देशमुख, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर उपस्थित होते. 00000

उमदी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत व सर्वोत्तम उपचाराबाबत जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयास भेट जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट देऊन, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच, जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ येथील रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या. विद्यार्थ्यांवर चार ठिकाणी उपचार समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील विद्यार्थ्यांना दि. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसून आली. या मुलांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जत ग्रामीण रूग्णालय येथे 81 विद्यार्थी, ग्रामीण रूग्णालय, माडग्याळ येथे 21, ग्रामीण रूग्णालय, कवठेमहांकाळ येथे 41 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे 26 अशा एकूण 169 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. 24 तास विद्यार्थ्यांना वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या मुलांच्या उपचारावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल विद्यार्थ्यांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दरम्यान, या घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना दिल्या आहेत. चौकशीअंती दोषींवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे प्रमुखांनी मुलांना आहार देताना व शिजवताना अत्यंत काळजीपूर्वक, सतर्क राहून स्वच्छ, पोषक, आरोग्य दायी व भेसळमुक्त आहार देण्याची खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रूग्णालय स्तरावर पथके गठीत करून वसतिगृहे व आश्रमशाळेची ‍नियमित तपासणी करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. वसतिगृहे व आश्रमशाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आहार देताना नेहमीच योग्य ती खबरदारी घ्यावी. यापुढे असा अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. 00000

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. दिव्यांग व्यक्तिंसाठी शासन स्तरावरून कार्यान्वित योजनांच्या जनजागृती अभियानाची सुरवात पालकमंत्री डॉ. खाडे आणि दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनंजय गार्डन येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अरुण लाड, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपायुक्त राहुल रोकडे व स्मृती पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र विभागामुळे लक्षावधी दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. दिव्यांगांमध्ये अनेक कला गुण असतात, त्या गुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. तसेच, जिल्हा प्रशासनाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण - आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा दिव्यांग बांधवांसाठी महत्वाचा आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण आणले जाईल. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग आणि नवे धोरण यामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास या अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला. आमदार श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांचे सर्वेक्षण अधिक चांगल्या प्रकारे होईल यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने दक्षता घ्यावी. दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करून दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. घरकुल योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देऊन त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून द्यावे, असे त्यांनी सूचित केले. दिव्यांगांसाठी 5 टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून ते म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दिव्यांगाना अधिक तत्परतेने लाभ मिळण्यास मदत होत आहे. स्वतःचे दुःख विसरून दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जीवन जगत असतो. या दिव्यांग व्यक्तीला सर्वांनीच आधार देऊन त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही आमदार श्री. कडू म्हणाले. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात सुमारे 40 हजार दिव्यांग बांधवांची नोंदणी झाली आहे. दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणीनंतर अशा दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. याबरोबरच जिल्ह्यात दिव्यांगाच्या तपासणीसाठी कॅम्प आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. दीप प्रज्वलनानंतर मिरज येथील अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी जागेवर जावून संवाद साधला व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची सांगली जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करावी - राज्य समन्वयक नेहा गुंजू

- पीएमएफएमई योजनेची कार्यशाळा संपन्न सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यित महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वैयक्तिक व गट लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा. सांगली जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन योजनेच्या राज्य समन्व्ययक नेहा गुंजू यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक जाभवंत घोडके, विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वासराव वेताळ, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले आदि उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. योजनेचे महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याकडूनही अधिक अपेक्षा असल्याचे सांगून नेहा गुंजू म्हणाल्या, जिल्हा प्रशासन, स्टार्ट अप, शेतकरी, स्वयंसहाय्यता गट, महिला यांच्या समन्वयाने या योजनेची सांगली जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. पात्र इच्छुकांपर्यंत या योजनेची माहिती व लाभ पोहोचवा. या माध्यमातून त्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना आर्थिक, व्यावसायिक, तांत्रिक सहाय्य देण्यात येत आहे. तरी प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, बेरोजगार युवक-युवती, महिला, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, खाजगी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्यात अव्वल राहण्यासाठी योगदान द्यावे, असे त्या म्हणाल्या. विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे यांनी मार्केटिंग व ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे शंकानिरसन केले. प्रकल्प संचालक आत्मा जाभवंत घोडके यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रियांका भोसले यांनी योजनेच्या सांगली जिल्ह्यातील कामगिरीचा आढावा सादर केला. आभार उपविभागीय कृषि अधिकारी विटा विवेकानंद चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेस बँकांचे प्रतिनिधी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, लघु उद्योजक, स्वयंसहाय्यता गटाच्या प्रतिनिधी, आत्माचे गटप्रतिनिधी आदि उपस्थित होते. 00000

मार्गदर्शन व उपाययोजनासाठी जिल्हास्तरावर लम्पी चर्मरोग कॉल सेंटर सुरू

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : लम्पी चर्मरोगाची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन, उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर लम्पी चर्मरोग कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लम्पी चर्मरोग संदर्भात जनावरांची आरोग्य तपासणी, उपचार व लसीकरण संदर्भात कॉल सेंटरसी 0233-2375108, 9356938116 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा साथ रोग आढळून आला आहे व जलदगतीने किटकापासून पसरणारा रोग असल्याचे दिसून आले आहे. सांगली जिल्ह्यमाध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पशुसंवर्धन विभग जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने लम्पी चर्मरोग कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 00000

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान आज सांगलीत

सांगली दि. 23 (जि.मा.का.) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत उद्या दि. 24 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होत आहे. या अभियानाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांच्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या अभियानासाठी दिव्यांग बांधवांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावण्यात आले असून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या बरोबरच दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. 00000

पशुधनाची काळजीपूर्वक सुश्रुषा करा लम्पी चर्मरोगावर मात करा

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेवून त्यांची योग्य सुश्रुषा करणे गरजेचे आहे. 20 टक्के औषधोपचार व 80 टक्के सुश्रुषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात करता येते. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेवून उपचार घेतल्यास लम्पी चर्मरोगापासून पशुधन वाचविण्यात यश मिळते. आहार विषयक काळजी रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे जनावरांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक (ढेप/ मका आदि) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. तसेच त्यांना खनिजक्षार व ऊर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावर सुद्धा तंदुरुस्त होते. ज्या बाधित जनावरांना मान, पाय, छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे. पूरक खाद्यपदार्थांचा अंतर्भाव आजारी जनावरांनी चारा खाने कमी केले असेल तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक (प्रोपायलीन, ग्लायकॉल) औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे जीवनसत्वे, खनिजक्षार मिश्रण, प्रतिकारशक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे देण्यात यावीत. रक्तशय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी, संध्याकाळी किमान 21 दिवस देण्यात यावीत. ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्रि व प्रोबायोटिक औषधे त्याचप्रमाणे भूक वाढीसाठी औषधे देण्यात यावीत. आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही कणीक / पीठ / गुळ खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत. उबदार निवारा जनावरांचे पाऊस व थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे उघड्यावर बांधू नयेत. जनावरांना योग्य तो कोरडा व ऊबदार निवारा उपलब्ध करून द्यावा व त्यांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे. लहान वासराना अंगावरती उबदार कपडे पांघरावेत. गोठ्यात अधिक वॅटेजचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल व प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल. पोळी पायावरील सुजेवर शेक देणे ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायावर किंवा छातीवर सूज आहे, अशा जनावरांना बसताना त्रास होतो म्हणून ती कित्येक दिवस उभी राहतात. अशा जनावरांना मीठाच्या संतृप्त (मीठ पाण्यात विरघळणे बंद होईपर्यंत बनवलेले पाणी) गरम द्रावणाचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत / अंग चोळत) घालावी व अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून 2 वेळा शेक द्यावा व अंग कापडाने कोरडे करावे.उगरम पाण्याचा चटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी. बसून राहणाऱ्या जनावरांची काळजी पायावरील, गुडघ्यावरील सुजेमुळे उभे राहण्यास त्रास झाल्याने किंवा अशक्तपणामुळे रोगी जनावर नेहमी बसून राहते. अशा जास्त वेळ बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. अशा बसून राहणाऱ्या जनावरांना दर २-३ तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत व शेकावेत. तोंडातील व्रणोपचार जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटेशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून दिवसातून ३-४ वेळेस बोरोग्लोसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास / वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही. नाकाची स्वच्छता व वाफ देणे रोगी जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या नाकामध्ये काही वेळा अल्सर / जखमा निर्माण होतात, नाक चिकट स्त्रावांनी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यांनी नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लोसरीन अथवा कोमट खोबरेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे. जेणेकरून मऊपणा टिकून राहील, जखमा भरून येतील व श्वसनासही त्रास होणार नाही. सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो. डोळयांची निगा डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पूढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत. बैलांची काळजी रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होवून दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना कामास लावू नये. जखमांचे व्यवस्थापन बाधित जनावरांमध्ये २-३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर उपचार करावा. यामध्ये जखमा 0.1 टक्के पोटेशियम परम्यागनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे आणि त्यानंतर जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा. जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेरकाढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. जखमा जास्त खोल व दुषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे. गोमाशांचा उपद्रव रोगी जनावर सुस्त झाल्याने तसेच अंगावरती जखमा झाल्याने माश्या बसतात व जनावर त्रस्त होते. रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर ३-४ दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावरती हर्बल / वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगीरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे. एकूणच बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास अनमोल पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात यश मिळते. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

नेत्र तपासणी आरोग्य शिबीराचा वाहन चालकांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : वाहन चालकाच्या आरोग्याची तसेच दृष्टी तपासणीकरिता परिवहन विभागामार्फत संपूर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली मार्फत दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सावळी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेत्र तपासणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. भारतामध्ये रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवतात. कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींना व कुटुंबियांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. रस्ता सुरक्षा ही परिवहन विभागाच्या महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. या करिता परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षेसंदर्भात संबंधित विभागांच्या बैठका आयोजित करून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. भारतातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहन चालकाच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्याचे संपूर्ण आरोग्य व दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. याकरिता नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्व वाहनचालक, वाहनमालक, प्रवाशी वाहतूक संघटना, बस संघटना, माल वाहतूक संघटना यांना नेत्र शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. तपासणी नंतर सर्व वाहन चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या एक दिवसीय अभियानाचे दि. 24 ऑगस्ट रोजी धनंजय गार्डन, कर्नाळ रोड, सांगली येथे सकाळी 11 वाजल्यापासून आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरूपात दिली जाणार आहेत. या अनुषंगाने दिव्यांगासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती .... दिव्यांग व्यक्तींकरिता कायदे (दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार ) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती. सर्वसमावेशक सुगम्यता निर्मितीचे शासनाचे उद्दीष्ट. दिव्यांगांसाठीच्या सर्व योजनांची परिणामकारक अंमलबजावणी. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID) वितरणाची अंमलबजावणी सुरु. शासकीय निमशासकीय सरळसेवा पदोन्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींना चार टक्के आरक्षण. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण निधीच्या पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद. उच्च शिक्षणामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण. राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात, बौध्दिक विकलांगता आणि बहुविकलांगता धारक दिव्यांग व्यक्तींच्या काळजी, सुश्रुषेकरीता व संपत्तीच्या संरक्षणाकरीता कायदेशीर पालक नियुक्त करण्याचे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार. भारतीय पुनर्वास परिषद अधिनियम 1992 दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्ससन क्षेत्रात कार्य करण्याकरीता भारतीय पुनर्वास परीषदेकडे संबंधित तज्ज्ञाची नोंदणी आवश्यक. राज्य शासन पुरस्कृत योजना शासकीय संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण व प्रशिक्षण - शासकीय संस्थांमध्ये ६ ते १८ वयोगटातील अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पदतीने विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करुन मोफत शिक्षणाची सुविधा, निवास व भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात येते. तसेच १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे दिव्यांगत्व विचारात घेवून दिव्यांगत्वानुरूप विविध कुशल व अकुशल व्यवसायाचे प्रशिक्षण, त्यांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण प्रशिक्षण - स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविणात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेमधून वय वर्षे 6 ते 18 वयोगटातील अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग व मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पध्दतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचबरोबर निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे दिव्यांगत्व विचारात घेवून दिव्यांगत्वानुरूप विविध व्यवसायाचे दिव्यांग कर्मशाळांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. शालांत परिक्षा पूर्व शिक्षण शिष्यवृती - दिव्यांग शाळेतील अनिवासी विद्यार्थी तसेच सामान्य शाळेतील इयत्त 1 ली ते 10 वी पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट न लावता शालेय शिक्षणासाठी शालांत पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनेखाली दिली जाते. शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती - ‍अंध, अधुदृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद व मनोरुग्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करून शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यासदौरा खर्चाची रक्कम दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल - 18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधीर व अस्थिविकलांग दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 1 लाख 50 हजार रुपये व्यवसायाकरीता 80 टक्के बँकेमार्फत कर्ज व 20 टक्के कमाल रुपये 30 हजार सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदान देण्यात येते. दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साधने पुरविणे - शारिरीक पुनर्वसनाच्या दृष्टीने अस्थिविकलांग दिव्यांगाकरीता कॅलिपर, कृत्रिम अवयव, तीनचाकी सायकल, कर्णबधिराकरीता श्रवणयंत्र, अंध विद्यार्थ्यांकरीता टेपरेकॉर्डर. दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय - शासकीय तसेच शासनमान्य संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 18 ते 50 वयोगटातील दिव्यांग व्यक्तीस प्रशिक्षण पूर्ण केलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या साधनांकरीता 1 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येते. दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार - उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी / स्वयंउद्योजक, दिव्यांगांचे नियुक्तक यांना राज्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना - किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता पालकत्व योजना - 1999 च्या नॅशनल ट्रस्ट अॅक्टनुसार 18 वर्षावरील मतिमंद मुलांचे पालकत्व घेण्याची योजना कार्यान्वीत आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. website-www.thenationaltrustgov.in दिव्यांग व्यक्तींकरीता असलेल्या सवलती / सुविधा / लाभ - रेल्वे / एसटी महामंडळाकडून दिव्यांग व्यक्तीस प्रवास करताना दूर प्रवास भाड्यामध्ये दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार देय असल्यास त्याच्या मदतनीसास सुद्धा सवलत. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी या संगणकीय प्रणालीतून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मोफत. दिव्यांग कर्मचारी / अधिकारी यांना विशेष वाहन भत्ता. बौध्दिक अक्षम प्रवर्गातील दिव्यांगांच्या पालकांना / दिव्यांग व्यक्तींना आयकरामध्ये सवलत. दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करामध्ये सूट. दिव्यांग व्यक्ती शासकीय / निमशासकीय / महामंडळे यांच्या नोकरभरतीमध्ये 4 टक्के इतके आरक्षण. दिव्यांग शाळा, महाविद्यालय, वसतीगृह व तत्सम उपक्रम यामधील प्रवेशामध्ये 5 टक्के इतके आरक्षण. दिव्यांग कल्याण योजनांच्या अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद, सांगली. फोन : (०२३३) २३०२०१४, E-mail: dswozpsangli@gmail.com येथे संपर्क साधावा. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 सप्टेंबरला आयोजन

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय १, २ व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे या लोकअदालातीमधे ठेवून ती तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमी संपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज (N. I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे व दावापूर्व प्रकरणे (विज बिल, टेलिफोन बिल, बँकेतील वसुली प्रकरणे ) या विषयक प्रकरणांसाठी ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. 00000

लम्पी चर्मरोग; शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे येत्या शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. एच. डी. पठाण, डॉ. महादेव गवळी, डॉ. विजय ढोले, डॉ. शरद सोनवणे, डॉ. शिरमनवार आणि डॉ. देशपांडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असून पशुपालकांनी यास प्राधान्य द्यावे. याबरोबरच ग्रामपंचायतींनी नियमित औषध फवारणी करावी. या रोगाने बाधित जनावरांचे आयसोलेशन करावे. आत्तापर्यंत 65 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून उर्वरित पशुधनाचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत मार्गदर्शन व उपचार याबाबत सल्ला देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्याकडील पथक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ०००००

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर हे सोमवार, दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा क्र. 1 कसबे डिग्रज ता. मिरज येथे अंगणवाडी (अंकूर) व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुविधा पुरविणे या प्रकल्पास व आंबेडकर रोड क्रांती हॉस्पीटल जवळ सांगली येथे यांत्रिकी पध्दतीने रोबोटच्या मार्फत ड्रेनेज चेंबरची स्वच्छता या प्रकल्प ठिकाणांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे भेट देणार आहेत. 00000

लम्पी चर्म रोग प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलनासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 17 जून 2022 अन्वये प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्र बाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात येत आहे. यापूर्वी शर्यतीला परवानगी दिली असल्यास या आदेशान्वये सदर शर्यत परवानग्या रद्द होतील. गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा कोणताही बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यत लावणे, बैल गाडी शर्यत आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शन किंवा प्राण्यांच्या अन्य जमाव मध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात येत आहे. जनावारांचा बाजार भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येत आहे. तसेच बाधीत गांवामध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रा मधून पशुधनाची ऑनलाईन पध्दतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधीत परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतूकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लंम्पी चर्मरोगाचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य मात्रा बनविणाऱ्या संस्था मार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे व वळुंची चाचणी करुन रोगाकरिता नकारार्थी आलेल्या वळुंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगा करिता वापर करावा. लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरिक्षण करण्यात यावे तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी व कीटक नाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी. कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांच्या विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावीत करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. पशुधनामध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे रोग निदान अहवाल प्राप्त झालेले आहेत. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांनी व्ही.सी व्दारे लम्पी चर्मरोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी नियंत्रित क्षेत्र घोषित करणे व जनावरांचे बाजार बंद करण्याबाबत सूचित केले आहे. लम्पी चर्मरोग जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती सभेमध्ये लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे या निष्कर्षापर्यंत आलेली आहे. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या बाधित जिल्ह्यात जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरापासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग विषाणूजण्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी केले आहेत. 00000

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

24 ऑगस्टला धनंजय गार्डन येथे आयोजन सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे येत्या 24 ऑगस्टला नियोजन करण्यात आले आहे. धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होणार आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरूपात दिली जाणार आहेत. तरी दिव्यांग बांधवांनी या अभियानाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले. या अभियानाच्या तयारीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, मंजिरी देशपांडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे व महामंडळांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. दिव्यांगांच्या तक्रारींचा त्याच ठिकाणी निपटारा करण्याठी हे अभियान होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, हे अभियान यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी तसेच दिव्यांगांची व्यवस्था पाहण्यासाठी क्षेत्रनिहाय कर्मचारी नेमावेत. दिव्यांग बांधवांची ने – आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर आदि बाबींचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यक निधी, स्टॉलची उभारणी याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेने व्यवस्था पाहावी, असे त्यांनी सूचित केले. दिव्यांगांना दैनंदिन जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या तक्रारी, अडीअडचणींचा निपटारा होऊन शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे सुलभरीत्या प्राप्त होण्यासाठी हे अभियान फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. 00000

लम्पी चर्मरोग; फवारणी व लसीकरणास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नियमित फवारणीसह गोवंशीय पशुधनाचे तातडीने लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार, सहायक निबंधक उर्मिला राजमाने आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्याच्या काही भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे. यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ज्या भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे त्या ठिकाणी लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. बाधित जनावरांचे आयसोलेशन, औषधोपचार, लसीकरण याबाबत आवश्यक खबरदारी घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरण व फवारणीसाठी पथके कार्यरत ठेवावीत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करणे, शर्यती बंद करणे, जनावरांची वाहतूक बंद करणे आदी उपाय योजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. ०००००

िल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा

ज सांगली दि. 18 (जि.मा.का.) : माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जन्म दिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली. सद्भावना दिवस प्रतिज्ञा कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन... अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. ०००००

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी वचनबद्ध - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी 749 एकर जागा - म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या 1028 कोटींच्या कामांचा कार्यारंभ आदेश - 43 हजार कामगारांना 66 कोटींच्या शिक्षणविषयक योजनांचा लाभ सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून विकासकामांसाठी 405 कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी या महत्त्वाच्या घटकासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यात 28 ठिकाणी 749 एकर जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 436 प्रस्तावांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातून 12 हजाराहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाली आहे. तर 17 हजार मेट्रीक टन द्राक्ष पिकाची निर्यात झाली आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून पावणेपाच हजार लाभार्थींना 13 कोटीहून अधिक अनुदान वितरीत केले आहे. जिल्ह्यातील गरजू, गरीब अन्नापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन - प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगून डॉ. खाडे म्हणाले, जानेवारी 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून लाभार्थींना प्रतिमाह नियत मोफत धान्य देण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतून जवळपास पावणे सतरा लाख लाभार्थींना तर अंत्योदय योजनेतून जवळपास 31 हजार कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यात 57 शिवभोजन केंद्रांवरून आतापर्यंत जवळपास 56 लाख 33 हजार शिवभोजन थाळ्यांचे सवलतीच्या दरात वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. या अमृत सरोवरांच्या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून वृक्षारोपण करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्याच्या पूर्व भागातील विशेषत: जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी 1930 कोटी पैकी 1028 कोटी रूपयांच्या म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होत आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावांचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे सांगून डॉ. खाडे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून यापूर्वी केशरी व पिवळ्या कार्डधारकांना दीड लाख रूपयांची मदत केली जात होती. आता सर्वच नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील39 रुग्णालयात ही योजना राबवण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देणारी शासकीय स्तरावरील राज्यातील पहिली वैद्यकीय स्किल लॅब उभी करण्यात आली. तसेच, एचआयव्ही बाधित रूग्णांसाठी स्वतंत्र डायलेसीस विभाग सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आत्तापर्यंत 1375 बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया तर 14,720 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. बिट मार्शल पोलीस अंमलदारांना 41 दुचाकी व संपर्कासाठी मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या माध्यमातून पोलीस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेमध्ये कामगारांचे स्थान महत्त्वाचे आहे. कामगार कल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षात जवळपास 44 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यांना शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 43 हजारहून अधिक कामगारांना जवळपास 66 कोटी रूपयांचा शिक्षण विषयक योजनांचा लाभ, 163 कामगारांना जवळपास 32 लाख रूपयांचा आरोग्यविषयक योजनांचा लाभ, 332 कामगारांना जवळपास पावणे 2 कोटी रूपयांचा विविध आर्थिक योजनांचा लाभ, 82 कामगारांना 41 लाख 82 हजार रूपयांचा विविध सामाजिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सन्मान धन योजना 2022 अंतर्गत 55 वर्ष पूर्ण केलेल्या 66 घरेलु महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे साडेसहा लाख रूपये इतका लाभ वितरीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. तर 3 हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 व 2 मधील सर्व कामे पूर्ण आहेत. टप्पा 3 मधील 14 कामांसाठी 69 कोटीहून अधिक रकमेस मंजुरी मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1 मधील 256 पैकी 244 कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा 2 मधील 58 कामांसाठी 210 कोटी 22 लाख रूपये रकमेस मान्यता प्राप्त आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेत असून येणाऱ्या काळात सर्व गावांना दर्जेदार रस्ते मिळतील. शासनाकडून कुपवाड ड्रेनेज योजना कामास मंजुरी देण्यात आली असून 253 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कुपवाड शहर तसेच मिरज व सांगली शहरातील ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री माधवराव माने, महादेव रंगनाथ दंडगे, भिमराव अण्णा गोडसे, सज्जनराव शामराव पाटील, ज्ञानू येसु सावंत, नबिलाल अमिन मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना केलेल्या साहसी पराक्रमासाठी हवालदार संदीप विश्वास जाधव (निवृत्त), लान्स नायक किसन बाबुराव आटुगडे (निवृत्त) यांचा ताम्रपट व सानुग्रह अनुदान देवून सन्मान करण्यात आला. याच पराक्रमासाठी शिपाई योगेश नागेश किर्ते यांचा सन्मान त्यांच्या कुटुबियांनी स्वीकारला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल फायरमन कासाप्पा लक्ष्मण माने यांचा गौरव करण्यात आला. गुंतागुंतीच्या न्युरोसर्जरी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉ. संतोष भिमराव दळवी व डॉ. अभिनंदन पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उकृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळी, बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रधान, महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांचा सन्मान करण्यात आला. यशस्वी लघुउद्योजक म्हणून मे. युनिव्हर्सल पॉवर कंट्रोल सांगलीच्या पूजा विजय भगत, मे. मास इंजिनिअर्सच्या अर्चना बळीराम पवार (दास), क्षारपड जमिनीमध्ये बांबूची लागवड करून जमिनीची सुपिकता वाढविल्याबद्दल डॉ. दीपक येरटे यांचा सन्मान करण्यात आला. एक्स्ट्रा ऑर्डीनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस किडमध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल दीड वर्षाची अर्शित राजेश शिंदे आणि शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या 22 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत धून वादन केले. तद्नंतर डॉ. खाडे यांनी उपस्थितांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते. 00000

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हावासियांना पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा

सांगली, दि. 14 (जि.मा.का.) :- भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उद्या 15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्या सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभास जिल्ह्यातील खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, विरपत्नी, विविध पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती आणि मान्यवर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

“मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ

सांगली (जि.मा.का.) दि. 9 : “मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंचप्रण शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दीपक शिंदे, रघुनाथ पोटे, विजया पांगारकर, वर्षा शिंगण, स्नेहल कनिचे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यांना समोर ठेवून संपूर्ण देशभर “मेरी माटी मेरा देश” विशेष मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन आणि ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम होणार आहेत. “भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ यावेळी घेण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ “मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, नागेश वरुडे, प्रदीप थोरात उपस्थित होते. 00000

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये “मेरी माटी मेरा देश" उपक्रम यशस्वी करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : “मेरी माटी मेरा देश" अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “मेरी माटी मेरा देश" या अभियानामध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे “मेरी माटी मेरा देश" अभियान राबविण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देशित केले असून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व 696 ग्रामपंचायतींमध्ये नियोजन करण्यात आले आहे. दि. 4 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश" अनुषंगाने गावात प्रचार व प्रसिध्दी करणे, गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इत्यादी) शिलाफलक बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दि. 7 ते 9 ऑगस्ट 2023 दरम्यान “मेरी माटी मेरा देश" अभियान अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उपक्रम, शिलाफलक उद्घाटन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रत्येक गावातून आणलेली माती एका कलशामध्ये पंचायत समिती स्तरावर गोळा केली जाणार आहे. हा कलश दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान राज्य स्तरावरील कार्यक्रमासाठी व दिनांक 27 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. हा कलश दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घेऊन एका युवकाची निवड केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. 00000

“ हर घर तिरंगा" मोहिमेसाठी टपाल खात्यात 25 रुपयात मिळणार राष्ट्रध्वज

सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी, या उद्देशाने गतवर्षी 15 ऑगस्टला 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे यंदाही केंद्र आणि राज्याकडून 'हर घर तिरंगा २.०' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना तिरंगा ध्वज विकत घेणे सुलभ व्हावे म्हणून भारतीय पोस्ट विभागात अवघ्या 25 रुपयात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती सांगलीचे प्रवर अधीक्षक डाकघर आर. पी. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. यंदाही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासाठी टपाल विभागाकडून 25 रूपये प्रति ध्वज अशा किफायतशीर दराने दर्जेदार राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यात येत आहे. पोस्ट विभागाच्यावतीने सरकारी/ खासगी संस्था, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोस्ट विभागाकडे त्यांच्या कार्यालयासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ध्वजाची आवश्यकता असल्यास १० ऑगस्टपर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झेंडा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा ग्राहक खरेदी करू शकतात. ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांनी www.epostoffice.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. 00000

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

बीएलओंच्या 21 ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी, अचूक मतदार यादीसाठी सहकार्याचे आवाहन

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित भागातील बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलाची पडताळणी संबंधित कुटुंबप्रमुखाकडून माहिती घेऊन करत आहेत. मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन 281-मिरज विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 281-मिरज विधानसभा मतदार संघातील बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार, 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑगस्ट 2023 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत. मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण व मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदि कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 व अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसिल कार्यालय मिरज (निवडणूक शाखा) अथवा बीएमओ मार्फत सादर करण्यात येणार आहेत किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline Mobile App वर देखील सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओ यादी तहसिल कार्यालयात उपलब्ध असल्याचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 ऑगस्ट अर्ज करण्याची मुदत

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक (व्यक्ती) यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्तिंनी पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली यांच्याकडे दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. सन 2019-2020, 2020-2021, 2021-2022 व 2022-2023 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी ज्यांनी सन 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या वित्तीय वर्षाकरिता अर्ज केला आहे, त्यांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि, त्यांनी ज्या वर्षाकरिता अर्ज केला आहे, त्या वर्षाकरिता चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीकरिता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तिंनी पुन्हा अर्ज केल्यास त्या अर्जांचाही विचार करण्यात येईल. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी व त्या पुरस्काराकरिता विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच, पुरस्कारासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. (उदा. सन 2019-2020 या वर्षाकरिता पात्रतेचा कालावधी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर2019 असा विचारात घेण्यात येईल.) अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली या कार्यालयात तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 00000

संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी डोळ्यांची काळजी घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : राज्यातील अनेक भागात पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ येताना दिसत आहे. डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे ही लक्षणे आहेत. यासाठी नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. इतर व्यक्तिंच्या रूमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे डोळ्यात टाकावीत. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. कदम यांनी केले आहे. 00000

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील राहून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी विकास खरात, बी. आर. माळी, वर्षा शिंगण, राजीव शिंदे, विजया पांगारकर, रघुनाथ पोटे, स्नेहल कनिचे यांच्यासह महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, शासनाच्या सर्व योजना राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर असल्याने या विभागाची नाळ सामान्य माणसाला जोडलेली आहे. महसूल विभागानेही सामान्य माणसाची कामे गतीने करून त्याला शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आग्रही भूमिका बजावावी. या पुढील काळात महसूल विभागाने जनतेची कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले, महसूल विभागाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर, आपत्ती, दुष्काळ, निवडणूक आदि कामांमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करतात. लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारा हा विभाग आहे. यापुढेही विभागाने आपल्या चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी. महसूल विभाग हा शासनाच्या सर्व खात्यांना एकत्र घेऊन काम करणारा विभाग आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी असे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी शुभांगी थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे, निवास ढाणे, नायब तहसीलदार विनायक महाजन, अव्वल कारकून आशिष देशिंगे, श्रीमती हेमा साबळे, मंडळ अधिकारी तानाजी पवार, फैयाज मुल्ला, महसूल सहाय्यक दिपक माने, श्याम ठाकूर, तलाठी श्रीमती शुभांगी थोरात, गणेश क्षीरसागर, वाहन चालक उत्तम जगताप, शिपाई दत्ता शिंगे, अंकुश खोत, माणिक माळी, कोतवाल विकास काळबागे, भीमराव हत्तीकर, गुरुदास माळी, अल्फास मुजावर, पोलीस पाटील श्रीमती अनिता पाटील आणि पहारेकरी या संवर्गात राजकुमार लोटके यांचा समावेश आहे. प्रारंभी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ०००००

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन

सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज अभिवादन केले. तद्नंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, सत्यजीत देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, डॉ. प्रेम हनवते, विकास गायकवाड, रामदास लोखंडे, समाधान दुधाळ, गणेश सवाखंडे, सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील आदि उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या वतीने वाटेगाव येथे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन सभाही झाली. या सभेत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी राज्य शासनाने त्यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी त्यांनी उपस्थितांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. बार्टी संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेची प्रत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व इतर महापुरुषांच्या जीवनातील दुर्मिळ पुस्तके विक्री स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते अनुयायांना पुस्तके देऊन करण्यात आले. यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे, अमर पुणेकर, अशोक गायकवाड, आर. के. भोसले आदि कलाकार व संच यांनी महापुरुषांच्या जीवनावरील शाहिरीच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन केले. यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व समतादूत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अण्णा भाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सांगलीच्या पुष्कराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 00000

'मेरी माटी मेरा देश' उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 1 (जि.मा.का.): मेरी मिट्टी मेरा देश' हा उपक्रम 9 ते 15 ऑगस्ट कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शिलाफलकम, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन आणि ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून लोकसहभागातून उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त ज्ञानेश्वर ढेरे प्रत्यक्ष उपस्थित होते तर महापालिका आयुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांनी सांगितले, आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत राज्यासह देशभरात 'मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेत लोकसहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. या उपक्रमांतर्गत गावातील, शहरातील संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकमची उभारणी करा. या शिलाफलकमवर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींची नावे द्यावीत. लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी दिवे घेवून पंच प्रण शपथ घ्यावी. गावातील योग्य ठिकाण निवडून ‘वसुधा वंदन’ म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करावी. देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करा, अभियानांतर्गत गावात योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवून तिरंगा फडकवण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करा. तालुकास्तरीय समितीच्या बैठका घ्या. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी वनविभागाकडे करा, उपक्रमातील कार्यक्रमांची प्रचार प्रसिद्धी करा, उपक्रमात राष्ट्रध्वजाचा वापर करताना ध्वजसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार करावा, पोलीस विभागाने पोलीस स्टेशननिहाय व चेक पोस्टच्या ठिकाणी बॅनर, पोस्टर लावावेत. परिवहन विभागाने एस.टी.बसेसवर व एस.टी. स्टँडवर उपक्रमाची जाहिरातीव्दारे जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 000000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुंसार प्रधानमंत्री पीक विमा योजना शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2023 होती. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. 00000

शिराळा तालुक्यात 32.9 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.5 (199.3), जत 1.5 (151.5), खानापूर-विटा 1.6 (117.7), वाळवा-इस्लामपूर 7 (219.8), तासगाव 3.4 (203.2), शिराळा 32.9 (577), आटपाडी 0.2 (113.5), कवठेमहांकाळ 2.6 (170), पलूस 3.9 (188.3), कडेगाव 3 (151.9). 00000

वारणा धरणात 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 74.22 (105.25), धोम 10.56 (13.50), कन्हेर 6.80 (10.10), वारणा 29.28 (34.40), दूधगंगा 17.86 (25.40), राधानगरी 8.30 (8.36), तुळशी 2.28 (3.47), कासारी 2.33 (2.77), पाटगांव 3.10 (3.72), धोम बलकवडी 3.53 (4.08), उरमोडी 5.83 (9.97), तारळी 5.02 (5.85), अलमट्टी 108.35 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12.6 (40) व अंकली पूल हरिपूर 18.7 (45.11). कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 3999, कण्हेर 24, वारणा 5975, राधानगरी 5684, कासारी 250, धोम बलकवडी 1951, उरमोडी 490, तारळी 2409 व अलमट्टी धरणातून 57 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 00000