रविवार, ३० एप्रिल, २०२३

जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवू. जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनसह राज्यस्तरांवरून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सामान्य माणूस, शेती आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2022-2023 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 363 कोटी 56 लाख रुपये पेक्षा अधिक निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे. यातून शिक्षण, आरोग्यासह अन्य विभागामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2023-24 साठी 404 कोटींचा जिल्हा नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 77 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांच्या मर्यादेत 282 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सन 2022-23 मध्ये 1 लाख 92 हजारावर शेतकऱ्यांना 32 कोटी 91 लाखाची व्याज सवलत देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात विविध आपत्तींमध्ये बाधित झालेल्या 77 हजार पेक्षा अधिक लाभार्थीच्या खात्यावर 66 कोटी 12 लाख रुपयेहून अधिक मदत वर्ग करण्यात आली आहे. पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी व कुंडल या ग्रामपंचायतीना मा. राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींचे व समस्त ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच सांगली येथे नुकत्याच पार पाडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिक्षा बागडी हिने प्रथम क्रमांकाची मानाची गदा पटकावून जिल्ह्याच्या क्रीडा लौकीकात भर घातली असल्याचे ते म्हणाले. यंदाचे वर्ष हे एल निनो चे वर्ष असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, जलस्त्रोत बळकट करावेत. वातावरणातील बदलामुळे उन्हाचा तडाखा वाढला असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून महाराष्ट्राला त्यात प्रथम क्रमांक मिळाला हे जलयुक्त शिवार योजनेचे मोठे यश आहे. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा 2.0 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील एकूण 147 गावांची निवड झाली आहे. या गावात पाणलोट जलपरीपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच जोडीला गाळयुक्त जमीन, गाळमुक्त धरण योजना देखील राबविली जाणार असल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेतील वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली कामे गतीमान केली आहेत. या योजनेतील कामांसाठी 981 कोटी रूपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून स्वीकृतीसाठी ती शासनस्तरावर पाठविण्यात आली आहे. या योजनेमुळे जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. लवकरच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये मार्च 2023 अखेर 3 लाख 62 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 अखेर 96 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 683 गावांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून यातील कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील पाण्याची समस्या असणाऱ्या शोषित, अतिशोषीत अशा पाच तालुक्यांतील 95 गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. पाणी बचतीसाठी ठिबक व स्प्रिंकलर सारख्या उपाययोजना करीता शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जादाचे 25 ते 30 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान प्राप्त होत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 2 हजार पेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना 5 कोटी 74 लाख रुपयापेक्षा अधिक अनुदान वितरित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या योजनेत गत आर्थिक वर्षात 38 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतला आहे. त्यासाठी विविध हॉस्पीटलला मोबदला म्हणून 98 कोटी 48 लाख रुपयांपेक्षा अधिक निधी दिलेला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे केंद्र शासनाकडून यावर्षी जिल्ह्याचा कास्य पदक देऊन सन्मान केला आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. स्मार्ट पीएचसी, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सदृढ बालक मोहीम, सुंदर माझा दवाखाना या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याव्दारे सामान्य माणसाला आरोग्य विषयक मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा - मॉडेल स्कुल या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 172 जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल केल्या आहेत. दुसऱ्या टप्यात 141 शाळा मॉडेल स्कूल होतील आणि 136 शाळांची तिसऱ्या टप्यासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आत्तापर्यंत 15 हजार पेक्षा जास्त घरकुले पुर्ण झालेली असून 6 हजार 700 पेक्षा जास्त घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते यावेळी म्हणाले. कामगारांना व त्यांच्या कुटुंबाला सन्मान मिळावा, कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबाजवणी सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गत आर्थिक वर्षात जिल्ह्यात 71 हजार पेक्षा अधिक कामगारांना शैक्षणिक योजनासाठी 141 कोटी 28 लाख रुपये, आरोग्य विषयक योजनासाठी 2 कोटी 13 लाख रुपये, इतर आर्थिक योजनासाठी 89 लाख रुपये, सामाजिक योजनांच्या लाभासाठी - 4 कोटी 56 लाख रुपये असे एकुण 148 कोटी 86 लाख अनुदान देण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली-मिरज ही नगरी नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सांगली येथे नव्याने होणाऱ्या अद्ययावत नाट्य मंदिरासाठी 25 कोटी रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये, दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरूड येथील स्मारकासाठी 20 कोटी रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नविन, सुसज्ज व जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी नविन पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत लवकरच पूर्ण होत आहे. ही इमारत पर्यावरणपूरक वास्तू असणार आहे. जिल्ह्यातील आटपाडी, कडेगाव व कुंडल या पोलीस ठाण्याच्या इमारतींचे नविन बांधकाम सध्या सुरू आहे. त्याही लवकरच पूर्ण होतील. वंचित घटकांच्या विकासासाठी शासन अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करीत आहे. सन 2022-2023 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेतून 108 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 27 वसतीगृहांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर 15 हजारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सन्मानासाठी राज्य शासन नेहमी अग्रेसर राहिले आहे. राज्य शासनाने महिलांच्या सन्मानासाठी त्यांना एस.टी बसच्या प्रवासात तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली आहे. सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 25 लाखाहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांसाठी एस. टी. प्रवास विनामूल्य केला असून मार्च 2023 अखेर या योजनेचा लाभ 21 लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरीकांनी घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले. अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे गोरगरीबांचा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणीत झाला. सांगली जिल्ह्यामध्ये सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा 4 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळाला आहे. चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये वापर करा, निरोगी आरोग्यासाठी हे आपल्याला आवश्यक आहे. भारत देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री यांनी सन-2014 मध्ये जाहिर केला होता. त्यास अनुसरुन कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील 500 ग्रामपंचायतीची निवड करुन त्याठिकाणी ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे नियोजित आहे. त्यास अनुसरुन दि. 5 मे 2023 ते 6 जुन 2023 कालावधी राज्यामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये मोफत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील युवकांना मोफत व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. विकसीत भारताचे उद्दिष्ट साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुध्दा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर, सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास आराखडा सन 2023-24 पासून तयार करावयाचा आहे. हा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्या संधीचा वापर करून अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे साध्य ठरवावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सूचना, माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. ज्याव्दारे जिल्ह्याचा परिपूर्ण व सर्वंकष आराखडा तयार करू शकू. आणि विकसीत भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देवू, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले. राज्य शासन नोकर भरतीलाही प्राधान्य देत असून आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या १५ उमेदवारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. याबरोबरच पोलीस दल, जिल्हा प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कामगार विभागाच्या वतीने दीपक पांडुरंग देशमुख यांना उपचारासाठी 25 हजाराचा आणि अक्षय विभुते यांना परदेशी शिक्षणासाठी 50 हजाराचा धनादेश वितरीत करण्यात आला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल, बँड, श्वान, निर्भया, डायल 112, फौंरेन्सीक लॅब, बीडीडीएस आदि पथकांचा समावेश होता. पत्रकार दिपक चव्हाण यांचा दिव्यांगाच्या विविध योजनांबाबत चित्ररथाचाही यामध्ये सहभाग होता. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. 00000

शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

पुराचा फटका बसणाऱ्या नागरी वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करा - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात ज्या नागरी वस्त्यांना पुराचा फटका बसतो त्यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. शासकीय विश्रामगृह सांगली येथे सांगली, कुपवाड, मिरज परिसर आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे येत असलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूरस्थिती रोखणे, कायमस्वरूपी उपाय शोधणे, संबंधित भागात पुरामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, योजनांची अंमलबजावणी या संदर्भात जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील महापूराचा फटका बसणाऱ्या गावांचा आढावा घेवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली शिष्यवृत्ती, जिल्ह्यातील ॲट्रॉसिटीची प्रकरणे, वृध्दाश्रम, आंतरजातीय विवाह प्रकरणी वाटप करण्यात आलेले अनुदान, सफाई कामगार, दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना यांची सविस्तर माहिती घेतली. याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी कृष्णा नदीत मृत झालेले मासे व कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण याबाबत करण्यात येत असणाऱ्या कारवाईचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमध्ये जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 810 गॅस कनेक्शन देण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 531 गॅस जोडण्या अनुसूचित जाती संवर्गाला तर 353 जोडण्या अनुसूचित जमातीतील संवर्गाला पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात सन 2016 पासून आत्तापर्यंत 21 हजार 872 घरकुले मंजूर असून त्यापैकी 15 हजार 308 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर 6 हजार 564 घरकुलांचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 ची महानगरपालिकेतर्फे अंमलबजावणी करण्यात येत असून अशा सफाई कामगारांच्या मृत्यूबाबत नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली महानगरपालिकेने दोन जणांच्या मृत्यू प्रकरणी प्रत्येकी 10 लाख रूपये असे 20 लाख रूपये अदा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत यावेळी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातील, शिष्यवृत्तीपासून कोणीही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. ॲट्रॉसिटी प्रकरणांचा आढावा घेऊन ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये संवेदनशिलपणे तपास होणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत दक्षता घ्या, असेही त्यांनी निर्देशित केले. 00000

सुदानमधील सांगली जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 28 (जिमाका) : सुदानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून कामासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली असून जिल्ह्यातील जवळपास ८० ते १०० नागरिक सुदानमध्ये असून ते सर्वजण सुखरूप आहेत. या नागरिकांच्या राहण्याचे ठिकाण युध्दजन्य क्षेत्रापासून ४०० कि. मी. दूर अंतरावर सुरक्षित भागात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयास संपर्क केला असता परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक १८००११८७९७ (टोल फ्री), मो क्र. ९९६८२९१९८८ प्रसिध्द केला असून याबाबत सुदान मधील नागरिकांनी या ठिकाणी संपर्क करण्यास कळविण्यात आलेले आहे. नागरिकांनी सदर ठिकाणी संपर्क केला असता त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून सहकार्य मिळत आहे असे कळविण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन सातत्याने सुदानमधील नागरिकांच्या संपर्कात आहे. कोणतीही चिंताजनक परिस्थिती नसून सध्या नागरिक असलेले ठिकाण युध्दजन्य परिस्थितीपासून दूर असून सर्व नागरिक सुरक्षित आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांना योग्य ती मदत उपलब्ध होणार असून त्यांना सुखरूपपणे परत आणण्याची कार्यवाही होईल अशी माहीती कळविण्यात आलेली आहे. याबाबत आपत्ती नियंत्रण कक्ष महाराष्ट्र राज्य यांना देखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, सुदान या देशात अडकले असल्यास परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांचे हेल्पलाइन क्रमांक १८००११८७९७ टोल फ्री), मो.क्र. ९२६८२९१९८८ वर संपर्क साधावा. त्याचबरोबर स्थानिक सहकार्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली फोन क्र. ०२३३- २६००५००, टोल फ्री क्र. १०७७ वरती संपर्क करावा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 000000

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : सध्या उष्णता वाढत असून नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताचे लक्षणे आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे - तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी, व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना, पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करावी. काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा. टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे. छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात. काय करू नये - लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयं पाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर रहावे. 00000

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सोमवार, दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी बेवसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. निमंत्रितांना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 00000

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. २६, (जि. मा. का.) : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. कार्यक्रमानंतर असे कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज संबंधिताकडून इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. या अनुषंगाने सर्व आस्थापनांना आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे. 00000

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची अभियानाचा लाभ घ्या - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची" हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनाशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. कृषी विभागामार्फत 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यामधील एकूण १५ हजार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे, पात्र शेतकऱ्यांना पूर्व संमती देणे व अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचे कृषि विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांमध्ये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नोंदणी करून घ्यावी. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत "प्रति थेंब अधिक पिक" या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ठिबक संच व तुषार संच करिता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व सर्वसाधारण शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदानाची तरतुद आहे व पूरक अनुदानामधून याच शेतकऱ्यांना अनुक्रमे 25 टक्के व 30 टक्के असे एकूण 75 टक्के व 80 टक्के अनुदानाची तरतुद आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टरचलित औजारे, औजारे बँक व ड्रोन यांसारख्या विविध घटकांकरिता 35 टक्के ते 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे. एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, प्लास्टिक मल्चिंग, संरक्षित शेती तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान अंतर्गत शीतगृह, पॅकहाऊप, शीतवाहन इ. घटकांकरिता 35 टक्के ते 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणी व विस्तारीकरण याकरिता 35 टक्के अनुदानाची तरतूद आहे. फळबाग लागवडीकरिता इच्छुक शेतकऱ्यांपैकी अल्प- अत्यल्प भूधारक जॉब कार्डधारक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये फळबाग लागवड करिता अर्ज करावा व या योजनेमध्ये अपात्र ठरत असणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत तरतुद असलेल्या 16 विविध फळपिकांकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाची शेततळ्याकरिता खोदकामासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते (14 हजार रूपये ते 75 हजार रुपये). या योजनांबरोबरच माती परिक्षण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, सेंद्रीय शेती, कृषि सेवा केंद्राचे परवाने वितरित करणे इत्यादी महत्वाच्या योजना लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची अभियान यशस्वी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 21 (जि.मा.का.) :- जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, दि. 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार असल्याने शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयात असे कक्ष स्थापन करून सामान्य माणसाला शासन योजनांचा लाभ मिळवून द्यावा. जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियानातून सांगली जिल्ह्यातून विविध शासकीय योजनांच्या ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी शासकीय योजनांच्या लाभ देण्यात येणार असून यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून होत असलेल्या कामांचा नियमित आढावा घेण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या कक्षाकडे याची माहिती विभागांनी दररोज पाठवावी. ही माहिती मुख्यमंत्री सचिवालयास नियमित पाठवली जाणार आहे. त्यामुळे या कामास प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. 00000

रोजगार मेळावा 26 एप्रिलला पात्र उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 21 (जि.मा.का.) :- खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पहिल्या प्लेसमेंट ड्राईव्हचे व जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. 26 एप्रिल 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर सांगली येथे करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करूनच मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये रोटाडाईन टुल्स प्रा.लि., माई इंडस्ट्रीज, बेगॉन पेस्ट कंट्रोल, कुसुंभ्भ कल्याणनिधी लिमीटेड सांगली व श्रीराम जनरल इन्शुरंन्स कंपनी, महाबळ मेटल्स इत्यादी कंपन्याकडील विविध 182 पदे भरण्यात येणार आहेत. इयत्ता 10 वी, 12वी, आयटीआय, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा इंजिनिअर, बी.ई. मेकॅनिकल व इलेक्रीकाकल इंजिनिअर आदि शैक्षणिक पात्रतेची विविध पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

जात पडताळणी विशेष मोहिमेंतर्गत त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे आयोजन

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर करुन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे व समितीने ईमेलद्वारे त्रुटी पुर्तता करण्याबाबत कळविलेले आहे, अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता 24 ते 28 एप्रिल या कालावधीत "त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नंदिनी आवडे यांनी केले आहे. सन 2023-24 या चालू शैक्षणीक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE) , National Eligibility Cum Entrance Test (NEET), Graduate Aptitude Test in Engineering (GATE) , National Aptitude Test in Architecture (NATA) तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन "सामाजिक न्याय पर्वच्या" अनुषंगाने करण्यात येणार असल्याचे श्रीमती आवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

आनंदाचा शिधा मिळाल्याने सणाचा आनंद द्विगुणित लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रीया

सांगली जिल्ह्यात 2 लाख 95 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संच वितरण सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : मायबाप शासनाने दीपावली व गुढीपाडवा सणाला आनंदाचा शिधा दिल्याने आमचा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला, अशा प्रतिक्रिया आनंदाचा शिधा योजनेच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील योजनांमधील आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) लाभार्थ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात 2 लाख 95 हजार 473 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आले असून वितरणाचे हे प्रमाण 74 टक्के इतके आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेला शिधा मिळाला का, त्यातील साहित्याची गुणवत्ता याबाबत विचारपूस केली. तसेच आनंदाचा शिधा याबाबत लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ॲपवर नोंदवाव्यात, असे आवाहन केले. ०००००

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

आनंदाचा शिधा व इतर योजनांतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज संवाद साधणार

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : आनंदाचा शिधा संचाचे वितरण, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) आणि शिवभोजन थाळी योजनेच्या निवडक लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 13 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे होणाऱ्या संवाद कार्यक्रमास जिल्ह्यातील 50 लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यापैकी निवडक लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वितरीत करणाऱ्या शिधा जिन्नसाचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होत आहे किंवा कसे याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया, रास्त भाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेणे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहेत. 00000

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

महापुरूषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : महापुरुषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक असून महापुरूषांच्या विचारांची कास धरूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत येथे बोलताना केले. जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, राजरत्न आंबेडकर, जत संस्थानचे शार्दुलराजे डफळे, तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पुतळा समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जत शहरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अभिमान वाटतो. बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून दीन दुबळ्यांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या लेखणीतून समाजाला नवी दिशा मिळाली. यामुळे त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हे उद्यान व पुतळा उभारण्यात आल्यामुळे जत शहरात बाबासाहेबांचे चिरंतन स्मारक झाले असून या पूर्णाकृती पुतळ्यामुळे जत शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी काढले. जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला याचा मनस्वी आनंद झाला आहे. उद्यान व पुतळा सुशोभीकरण कामास आवश्यक ती सर्व मदत करू, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली. बऱ्याच वर्षानंतर जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहिला आहे, याचा जतकर म्हणून अभिमान वाटतो. जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात जतसह तालुक्यातील मान्यवर व नागरिकांचे योगदान मोठे आहे, असे आमदार विक्रम सावंत यावेळी बोलतांना म्हणाले. महापुरुषांनी त्यांच्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली आहे. त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून महापुरूषांच्या विचारांचा सोहळा साजरा करूया, असे माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करूया. त्यांचे पुतळे व स्मारकातून सकारात्मक ऊर्जा घेऊन हे विचार समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केले. कार्यक्रमात सी. आर. सांगलीकर, दीपक केदार, अतुल कांबळे, राहुल सरवदे, संजीव सदाफुले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी संजय कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ००००००

डफळापूर येथे अवकाळी पावसाने कोसळलेल्या द्राक्ष बागेची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केली पहाणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकरी रेखा सुनिल परीट यांच्या अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्ष बागेची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‍विषय मांडून शेतकऱ्यांना नुकसानीबाबत मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, प्रकल्प संचालक आत्मा जी. घोडके, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोजकुमार वेताळ, तहसीलदार जीवन बनसोडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात 20 गावातील 92 शेतकऱ्यांचे 34.85 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष, आंबा, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती घेवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत ‍मिळवून देण्यसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी ‍दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तहसिलदार व कृषि अधिकारी यांना सूचना दिल्या. अवकाळी पावसामुळे ७ एप्रिल रोजी डफळापूर गावच्या शेतकरी रेखा परीट यांच्या 17 गुंठे द्राक्ष बागेचे पूर्ण नुकसान होवून विक्री योग्य तयार झालेली द्राक्षबाग पूर्णपणे कोसळली. कृषि पदवीधर मुलाने मोठ्या कष्टाने उभी केलेली द्राक्षबाग वादळवाऱ्यात नष्ट झाली. 30 रूपये किलोने द्राक्षबागेचा विक्रीसाठी सौदाही झाला होता. मुलाच्या कष्टावर निसर्गाने पाणी फिरवले या शब्दात रेखा परीट यांनी आपले दु:ख पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासमोर व्यक्त केले. संकट काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली. 00000

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या जाणीव जागृतीसाठी १० एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या जाणीव जागृतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले व सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना आमंत्रित करुन अल्पसंख्याक समुदायाचे हक्क व त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये भारतातील अल्पसंख्याक समुदायाची पार्श्वभूमी, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल या विषयावर डॉ. विनोद पवार, अल्पसंख्यांकाना मिळणारे शासकीय लाभ व त्याबाबत येणाऱ्या अडचणी या विषयावर एलिया डेव्हिड पांढरे, अल्पसंख्यांकासाठीच्या घटनात्मक तरतुदी, हक्क व त्यांचे कायदे या विषयावर शाहीन शेख, अल्पसंख्यांक तरूणांची आत्मनिर्भरता व त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास या विषयावर डॉ. अजित पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ०००००

बहुजन समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्धतेसाठी पुणे येथे 10 एप्रिलला कार्यशाळा

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : बहुजन समाजातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने दि. 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत बार्टी, येरवडा संकुल, पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये लिड बँकेचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास यांचे अधिकारी, बार्टीचे पदाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अर्थसहाय्य केलेल्या लाभार्थी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून अर्थसहाय्य केलेल्या मागासवर्गीय औद्यागिक सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नवउद्योजक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

मिरज शहरात दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी प्रायोगिक तत्वावर अधिसूचना जारी

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : मिरज शहरातील वाहतुकीची वाढती कोंडी, वाढती समस्या, दुचाकी व चारचाकी वाहनांची होणारी गर्दी, होणारे अपघात टाळण्याकरीता व लोकांना धोका, अडथळा व गैरसोय होवू नये म्हणून मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक व स्टेशन चौक ते मिरा दरबार चहा व रंगरेज किराणा दुकान ते मिरज शहर पोलीस ठाणे या रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी P1-P2 पार्किंग केल्याचा जाहिरनामा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी प्रसिध्द केला आहे. हा जाहीरनामा 10 ते 25 एप्रिल 2023 रोजी पर्यंत प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम १(ब) रहदारी अधिकारान्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मिरज शहरामध्ये P1-P2 पार्किंग करण्याबाबतचे नियम / अधिसूचना निर्गमित केली आहे. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक व स्टेशन चौक ते मिरा दरबार चहा व रंगरेज किराणा दुकान ते मिरज शहर पोलीस ठाणे पर्यंत रोडच्या दोन्ही बाजूस दुचाकी वाहनांसाठी पार्किंग करीता सम-विषम तारखेस पार्किंगसाठी P1-P2 पार्किंग उपलब्ध करण्यात येत आहे. नागरिक, रहिवाशी, मोटार वाहनचालकांनी वाहतुक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे. 00000

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचे काम तातडीने पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : आगामी मान्सून काळात संभाव्य पूर व आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. महापालिका आणि जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाले सफाईच्या कामाला गती देवून ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आगामी मान्सून पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य आपत्तीच्या नियंत्रणासाठी विभागांनी आपआपल्या स्तरावर बैठका घेवून नियोजन करावे, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पावसाळ्यात नाले वाहते राहण्यासाठी ते स्वच्छ करण्याबरोबरच नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यास संबंधितांनी काम करणे गरजेचे आहे. हरिपूर येथील नाला सफाई संदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नाले सफाई तातडीने करावी. मान्सून व संभाव्य आपत्तीबाबत गावा-गावात जनजागृती करावी. गावातील एनजीओंची बैठक घ्यावी. आपत्तीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या आपदा मित्रांची यादी तयार करावी आणि ती जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षास पाठवावी, अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. संभाव्य आपत्तीमध्ये काम करण्यासाठी जिल्हास्तरावरून 300 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक किट उपलब्ध करून दिले आहे. ज्या ग्रामपंचायती किंवा शासकीय कार्यालयांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, अशा कार्यालयातील शासकीय दस्ताऐवज सुस्थितीत राहण्यासाठी विषयवार गठ्ठे बांधून ठेवावेत. संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांनीही अत्यावश्यक बाबीचे किट तयार ठेवावे जेणेकरून स्थलांतराची गरज पडल्यास हे किट यावेळी वापरता येईल. यापूर्वी पूरपरिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात आली होती त्या निवारा ठिकाणची पाहणी करून आवश्यकता भासल्यास दुरूस्तीही करून घ्यावी. याबरोबरच जनावरांसाठी निवारागृहे, चारा याचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्ती व पूल दुरूस्ती कामे, आरोग्य विभागाने मान्सून कालावधीत आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. ग्रामीण भागासाठी प्रशासनामार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. ०००००

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, सण, उरूस, जयंती, यात्रा, जत्रा आदिंच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 6 एप्रिल 2023 रोजीचे 10.00 वाजल्यापासून ते दि. 20 एप्रिल 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

राष्ट्रीय लोकअदालत 30 एप्रिलला

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रविवार, दि. 30 एप्रिल 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. 00000

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यात अवैधपणे विनापरवाना कृषी निवेष्ठांची विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अथवा मोहीम अधिकारी यांना तात्काळ द्यावी. विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, सांगली, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद सांगली, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज, जत व विटा, तालुका कृषी अधिकारी, (सर्व), कृषी अधिकारी पंचायत समिती, (सर्व) अशा एकूण जिल्ह्यातील ३२ गुण नियंत्रण निरीक्षक मार्फत जिल्ह्यात अनधिकृतपणे खते, बियाणे व कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यातील तालुकास्तरावर असलेले तालुका तक्रार निवारण समिती, तालुका स्तरावर असलेले भरारी पथक तसेच जिल्हास्तरावरील भरारी पथक यांचेमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये कृषी सेवा केंद्र व त्या व्यतिरिक्त विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विना परवाना कृषी निविष्ठाची खरेदी न करणेबाबत शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणे, मेळावे घेणे अवैध कृषी निविष्ठा खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून देणे यासाठी कृषी विभागाने विशेष पथके स्थापन केली आहेत. या विशेष पथकांचे सनियंत्रण संबधित उपविभागीय कृषी अधिकारी यांचे मार्फत करण्याचे सूचित करण्यात येत असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रातून गुणवत्ता पूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना देण्याबाबत व निविष्ठा देताना सर्व कायदेशीर बाबींचे पालन करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. अनियमीतता आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात सर्व गुण नियंत्रण निरीक्षक यांनी बियाण्याचे ९३.७८ टक्के, खताचे ९७.२६ टक्के व कीटकनाशके यांचे ९९.०३ टक्के इतके नमुने काढून विश्लेषणासाठी सादर केलेले होते, त्यामध्ये अप्रमाणित आलेल्या नमुन्याबाबत चालू वर्षी बियाणे २५ खते २१ कीटकनाशके १ याप्रमाणे कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण ८७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद आदेश दिलेले असून २१ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द केलेला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी विनापरवाना किटकनाशके विक्री करणाऱ्या इसमांवर वाळवा तालुक्यातील बागणी येथे १४ लाख ५० हजार इतक्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मणेराजुरी येथे विनापरवाना खत उत्पादन करणाऱ्या दोन इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून ४६ मेट्रिक टन खत सुमारे ८ लाख ५० हजारांचा साठा जप्त केलेला आहे. पंचायत समिती इस्लामपूर कृषी अधिकारी संजय बुवा यांनी इस्लामपूर येथे विनापरवाना बियाणे विक्री करणाऱ्या इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून सुमारे २३ लाख ५० हजार या किंमतीचा सोयाबीन बियाणाचा १०.५७ मेट्रिक टन इतका साठा जप्त केला आहे. वाळवा येथे औद्योगिक कारणासाठी युरिया या खताचा वापर व साठा करणाऱ्या व्यक्तींवर एफ. आय. आर. दाखल केलेला असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच बियाणे कीटकनाशके व रासायनिक खते यांची खरेदी करावी व त्याचे पक्के बिल घ्यावे. तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्यांकडून कृषी निविष्ठांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी केले आहे. 00000

कोविड रूग्णांसाठी मदत कक्ष व हेल्पलाईन सुरू

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगली येथे कोविड मदत कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहे. या मदत कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2374900 असून कोविड रूग्णांना काही अडचण असल्यास, काही माहिती अथवा मदत हवी असल्यास त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधावा. तसेच कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. 00000

जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून तसेच इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत सध्या सन 2022-23 या चालू वर्षात प्रवेशित असणाऱ्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व संबंधित शैक्षणिक संस्थांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE) , National Eligibility Cum Entrance Test (NEET) , Graduate Aptitude Test in Engineering (GATE) , National Aptitude Test in Architecture (NATA) तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत सध्या सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशित असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तात्काळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली या कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष नंदिनी आवडे यांनी केले आहे. ००००००

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी 1 ते 30 एप्रिल या कालावधीत सामाजिक न्याय पर्व निमित्ताने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी दिली. सन 2022-23 व सन 2023-24 या चालू शैक्षणीक वर्षात इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व होऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आयोजित विशेष मोहिमेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी यांना जात पडताळणी म्हणजे काय? जात पडताळणीकरिता कोण-कोणती कागदपत्रे लागतात / जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने झालेली असल्याने ऑनलाईन पध्दतीने कसा अर्ज सादर करावा, अर्ज केव्हा करावा, ऑनलाईन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, अर्ज समितीकडे विहित मुदतीत कसा व कधी जमा करावा, कागदपत्रासंबंधी असलेल्या अडचणी इ. सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर दृकश्राव्य माध्यमाद्वारे (PPT Presentation) तालुकास्तरीय महाविद्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबत सर्व मागासवर्गीय विद्यार्थी यांनी प्रवेशित संबंधित महाविद्यालयांशी अथवा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्याप जातीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जातीचे प्रमाणपत्राबाबत उप विभागीय अधिकारी (महसूल विभाग) यांच्या स्तरावरुन विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून सदर जातीचे प्रमाणपत्र विशेष शिबिराचा लाभ सर्व मागासवर्गीय लाभार्थी यांना घेणेबाबत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे. 000000

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व, निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वक्तृत्व स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी कळविले आहे. महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर या स्पर्धांचे आयोजन करून प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे सहाय्यक समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे पाठवावीत, असे आवाहन केले आहे. याबरोबरच 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक मिरज या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या शाळा विद्यालयांनी विद्यार्थी संख्या, समन्वय शिक्षक यांची माहिती समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावी, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या जाणीव जागृतीसाठी १० एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन

सांगली दि. 5 (जि.मा.का.) अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या जाणीव जागृतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना आमंत्रित करुन अल्पसंख्याक समुदायाचे हक्क व त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले व सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. ०००००

मशरूम शेती : आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत

राज्य व केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास निधीमधून आठ लाखाचे अनुदान घेऊन वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शेतकरी दादासो आत्माराम पाटील यांनी शिव प्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्म सुरू केली. यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेशातील ICAR-DMR सोलन येथे मशरूम लागवड तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग करून त्यांनी यशस्वी मशरूम शेती केली आणि शेतकऱ्यांसाठी मशरूम शेती आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत असल्याचा मार्ग दाखवून दिला. मशरूम शेती बाबत माहिती देताना श्री. पाटील यांनी सांगितले, शिवप्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्ममध्ये 16 तांत्रिक आणि गैरतांत्रिक मजुरांच्या सहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बग्यास, कोंबडीचे खत, गव्हाचा कोंडा, जिप्सम, एरिया हे सर्व एकत्र करून ओले केले जाते. कंपोस्ट खत निर्मिती हा यातील महत्त्वाचा भाग आहे. कंपोस्ट खत निर्मितीनंतर फेज एक मध्ये भरलेले सर्व साहित्य तीन दिवस ठेवले जाते. कंपोस्ट मिश्रण कंडिशनिंग आणि पाश्चरायझेशनसाठी सहा-सात दिवस भरले जाते. कंपोस्ट 56 ते 59 डिग्री सेल्सियस तापमानात चार ते सात तासासाठी पाश्चराईजड केले जाते. पाश्चरायझेशननंतर कंपोस्ट 25 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड केले जाते. आणि स्पॉनिंग केले जाते. स्पॉनचा वापर 0.5 ते 0.75 टक्के दराने केला जातो. स्पॉनिंगनंतर कंपोस्ट पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये भरले जाते आणि स्पॉनरनसाठी खोल्यांमध्ये हलवले जाते. यासाठी 23 ते 25 सेल्सिअस तापमान, 85 ते 90 टक्के आद्रता आणि C02-10000ppm पेक्षा जास्त आवश्यक आहे. स्पॉनरन पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 दिवस लागतात. C02 कमी करण्यासाठी ताजी हवा दिली जाते या टप्प्यात तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस आणि आद्रता 80 ते 85 टक्के असते ताजी हवा दिल्यानंतर मशरूम काढण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात एका खोलीतून 30 दिवस मशरूम काढता येते. दहा किलोच्या एका बॅगमध्ये 50 ते 100 ग्रॅम स्पॉन टाकल्यानंतर यातून दीड ते दोन किलो मशरूमचे उत्पादन मिळते. एका बॅच मधून सरासरी दीड टन उत्पादन मिळू शकते. एक महिन्यात तीन बॅच मधे चार ते पाच टन उत्पादन मिळते. मुंबई, बेंगलोर यासह मोठ्या शहरात याची विक्री व्यवस्था असून उत्पादन खर्च वजा जाता 18 ते 25 टक्के नफा मिळू शकतो. मशरूम शेती कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा नवा स्त्रोत असल्याने शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे व श्री. पाटील यांच्याप्रमाणे आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग स्वीकारावा. - जिल्हा ‍ माहिती कार्यालय, सांगली

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

एमपीएससी, युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणी अर्ज करण्याचे महाज्योतीचे आवाहन

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी याकरीता विविध योजना राबविण्यात येतात. महाज्योतीतर्फे सन 2023-24 साठी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थानी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील Notice Board मधील Application Training 2023-24 यावर जाऊन सर्व अटी व शर्तींचे पालन करून 10 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह 10 हजार रूपये विद्यावेतन लागू होईल व एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रूपये देण्यात येईल. युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्याससाहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 10 हजार रूपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रूपये आकस्मिक खर्च देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 13 हजार रूपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ 18 हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल. अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे, पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा. प्राप्त अर्जांची निकषानुसार छाननी करून विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

महाराष्ट्र राज कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत थेट उत्पादक ते ग्राहक विक्रीसाठी महोत्सवाचे आयोजन करण्याकरिता फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी व पणनशी संबंधित असलेल्या सहकारी संस्था, शासनाचे विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था घेऊ शकतात. महोत्सवाचा कालावधी हा किमान पाच दिवसाचा असणे आवश्यक आहे. महोत्सवात प्रति स्टॉल दोन हजार रूपये याप्रमाणे अर्थसहाय अनुज्ञेय, भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त असल्यास प्रति स्टॉलसाठी तीन हजार रुपये याप्रमाणे अर्थसाह्य देय, महोत्सवामध्ये किमान दहा व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय, महोत्सव आयोजनापूर्वी कृषी पणन मंडळाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आणि महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रस्ताव पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी पणन मंडळाचे मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालय येथे संपर्क साधावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे. ०००००