गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

आनंदाचा शिधा मिळाल्याने सणाचा आनंद द्विगुणित लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रीया

सांगली जिल्ह्यात 2 लाख 95 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संच वितरण सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : मायबाप शासनाने दीपावली व गुढीपाडवा सणाला आनंदाचा शिधा दिल्याने आमचा सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला, अशा प्रतिक्रिया आनंदाचा शिधा योजनेच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील योजनांमधील आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) लाभार्थ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात 2 लाख 95 हजार 473 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आले असून वितरणाचे हे प्रमाण 74 टक्के इतके आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेला शिधा मिळाला का, त्यातील साहित्याची गुणवत्ता याबाबत विचारपूस केली. तसेच आनंदाचा शिधा याबाबत लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ॲपवर नोंदवाव्यात, असे आवाहन केले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा