शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

सुदानमधील सांगली जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 28 (जिमाका) : सुदानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून कामासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली असून जिल्ह्यातील जवळपास ८० ते १०० नागरिक सुदानमध्ये असून ते सर्वजण सुखरूप आहेत. या नागरिकांच्या राहण्याचे ठिकाण युध्दजन्य क्षेत्रापासून ४०० कि. मी. दूर अंतरावर सुरक्षित भागात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयास संपर्क केला असता परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक १८००११८७९७ (टोल फ्री), मो क्र. ९९६८२९१९८८ प्रसिध्द केला असून याबाबत सुदान मधील नागरिकांनी या ठिकाणी संपर्क करण्यास कळविण्यात आलेले आहे. नागरिकांनी सदर ठिकाणी संपर्क केला असता त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून सहकार्य मिळत आहे असे कळविण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन सातत्याने सुदानमधील नागरिकांच्या संपर्कात आहे. कोणतीही चिंताजनक परिस्थिती नसून सध्या नागरिक असलेले ठिकाण युध्दजन्य परिस्थितीपासून दूर असून सर्व नागरिक सुरक्षित आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांना योग्य ती मदत उपलब्ध होणार असून त्यांना सुखरूपपणे परत आणण्याची कार्यवाही होईल अशी माहीती कळविण्यात आलेली आहे. याबाबत आपत्ती नियंत्रण कक्ष महाराष्ट्र राज्य यांना देखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, सुदान या देशात अडकले असल्यास परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांचे हेल्पलाइन क्रमांक १८००११८७९७ टोल फ्री), मो.क्र. ९२६८२९१९८८ वर संपर्क साधावा. त्याचबरोबर स्थानिक सहकार्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली फोन क्र. ०२३३- २६००५००, टोल फ्री क्र. १०७७ वरती संपर्क करावा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा