मंगळवार, ३० मार्च, २०२१

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती

सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पाहता ज्या खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे असे खाजगी हॉस्पीटल कोविड-19 विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. उपलब्ध केलेल्या हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना योग्य पध्दतीने दाखल करून घेणे, त्या ठिकाणी रूग्णवाहिका तसेच शववाहिकेची आवश्यकता असल्यास संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधून त्याची पूर्तता करून घेणे, हॉस्पीटलमधील रूग्णांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही होण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 7 खाजगी हॉस्पीटलकरीता 4 पर्यवेक्षीय अधिकारी व 14 प्रशासकीय अधिकारी यांची दिनांक 31 मार्च 2021 रोजी पासून नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना दि. 31 मार्च पासून कामकाज पहाण्याचे आदेश दिले आहेत. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली व मिरज चेस्ट सेंटर मिरज करीता पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे (मो.नं. 9158686123) यांची नियुक्ती केली आहे. वाळवेकर हॉस्पीटल सांगली व विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज करीता जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एन. बी. कोळेकर (मो.नं. 9960687492) यांची तसेच मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली करीता जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व वॉन्लेस हॉस्पिटल मिरज करीता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख किशोर जाधव (मो.नं. 9422532636) यांची नियुक्ती केली आहे. हॉस्पीटलनिहाय नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पुढीलप्रमाणे. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी नायब तहसिलदार गणेश लव्हे (मो.नं. 9689742484) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरज छोटे पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता ए. जी. चव्हाण (मो.नं. 9405553953), कुल्लोळी हॉस्पीटल सांगली – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक संजय राऊत (मो.नं. 9075377001) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी मंडल कृषि अधिकारी तासगाव दिपक कांबळे (मो.नं. 9405292386), मिरज चेस्ट सेंटर मिरज – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरज चे विस्तार अधिकारी (कृषी) अमोल कोळी (मो.नं. 9403964253), रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी सहायक संचालक नगररचना सांगली कार्यालयाचे रचना सहायक सौरभ आवटी (मो.नं. 9637455585). वाळवेकर हॉस्पीटल सांगली – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-२ एस. जी. पाटील (मो.नं. 9404879812) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी महाराष्ट्र व प्रदुषक यंत्रणा सांगली चे क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर (मो.नं. 9552966799), विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी वन परिक्षण अधिकारी प्रकाश सुतार (मो.नं. 7722015999) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरज शिक्षण विभागाचे अधिक्षक विजयकुमार सोनवणे (मो.नं. 9029030490), मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी समाजकल्याण अधिकारी सचिन साळे (मो.नं. 7972221721) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी जिल्हा परिषद गा्रमीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. बी. वरूटे (मो.नं. 9689711777), वॉन्लेस हॉस्पिटल मिरज – सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी नायब तहसिलदार उमेश कोळी (मो.नं. 9764803098) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पाटबंधारे उपविभाग मिरजचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक अभियंता श्रेणी-1 जावेद शेख (मो.नं. 9975297806) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देण्याबाबत कामकाज करणे, रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देणे हे कामकाज करावयाचे आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी रूग्णालयातील बेड संख्येच्या उपलब्धतेप्रमाणे रूग्णांना दाखल करून घेतले जाते अगर कसे याबाबत तसेच प्रशासकीय सर्व कामकाज पाहणे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रणालीमध्ये हॉस्पिटलमधील बेड संदर्भातील दैनंदिन माहिती भरण्याचे कामकाज करावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांनी दर सोमवारी आपआपसात शिप्ट बदलावी. नेमून दिलेल्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 00000

बुधवार, २४ मार्च, २०२१

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार ९ एप्रिल अखेर पर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. २४, (जि. मा. का.) : सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव देशात व राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २५ मार्च २०२१ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दि. ९ एप्रिल २०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णांकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी गर्दीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार २५ मार्च २०२१ ते ९ एप्रिल २०२१ अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग व पोलीस अधीक्षक यांनी बाजारपेठा व अधिकृत भाजी मंड्यांमध्ये कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे, निर्देशांचे (सामाजिक अंतर, मास्कचा वापर) पालन होत असल्याची तपासणी करावी. तसेच कोविड-१९ अटी व शर्तीचे, निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनेच्या मालकाकडून व आपत्ती कायद्याने निश्चित करण्यात आलेल्या दंडाची आकारणी व कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. 00000

मंगळवार, २३ मार्च, २०२१

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

- गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या यंत्रणांना सूचना - आयर्विन पूल दुचाकीसाठी सुरू करा सांगली, दि. २३, (जि. मा. का.) : वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून त्यानंतर कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना जलसंधारण व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना तसेच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी संजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात पुढील दोन आठवडे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनानक आवश्यक कार्यवाही करावी. आठवडी बाजारांवर निर्बंध आणताना जनतेच्या सोयीचाही विचार व्हावा. जनतेला भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची कमतरता भासू नये याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत असताना जिल्ह्यात १ हजार ३ रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी १८१ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८२२ रूग्ण गृहअलगीकरणामध्ये आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हॉस्पीटलमध्ये कोरोना अनुषंगीक उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या काळात आणखी रूग्णांना हॉस्पीटलायझेशनची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेवून शासकीय रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्येही कोरोना विषयक उपचारांची आवश्यक तजवीज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच रूग्णांनीही ताप, कणकण यासारखे दुखणे अंगावर न काढता लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत व पुढील धोका टाळावा. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य यंत्रणेने आपली सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी. पुरेशा बेड्सची संख्या, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा सज्ज ठेवाव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये टेस्टींगची संख्याही वाढवावी, अशा सूचना कोरोना आढावा बैठकीत दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. यामध्ये सद्यस्थितीत जिल्ह्यात पहिला डोस १ लाख ८३२ जणांनी घेतला असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ हजार ७१० आहे. याबाबतची अत्यंत तपशिलवार माहिती घेवून लसीची संबंधितांनी भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आयर्विन पूल दुचाकीसाठी सुरू करा…..पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली शहराला जोडणारा आयर्विन पूल सध्या दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असून तो दुचाकी वाहनांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावा, अशा सूचना देवून दुरूस्तीचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी समाज कल्याण विभागाच्या रमाई आवास घरकुल योजना, पालकमंत्री पाणंद रस्ते योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नि:समर्थ व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ५ टक्के निधीचे नियंत्रण समिती आढावा आदि विषयांचा आढावा घेतला. 00000

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर - पालकमंत्री जयंत पाटील

१४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिकांचे लोकार्पण सांगली, दि. २३, (जि. मा. का.) : कोरोनाची दुसरी लाट आता सुरू झाली असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल. आज १४ रूग्णवाहिकांचे आरोग्य केंद्रांना लोकार्पण होत असून आणखी नविन १६ रूग्णवाहिका देण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. माधवनगर रोड येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात जिल्हा परिषदेच्यावतीने कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक सरपंच कार्यशाळा व १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या १४ रूग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिकत् मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत) तानाजी लोखंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्य शासन याबाबत सजग असून कोरोना वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतो असा अनुभव आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे याबाबत कठोर निर्णय घेण्यात येतील. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनासाठी भरीव तरतूद केली असून सर्वाधिक निधी आरोग्यावर खर्च करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधा देण्यात राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. जिल्ह्यासाठी नविन रूग्णालयेही मंजूर केली आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असाव्यात यासाठी १४ वा व १५ वा वित्त आयोग यातून मिळणारा निधी सरपंचांनी आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा. निधीचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे. तसेच कोरोना काळात सरपंचांनी योग्य प्रकारे भूमिका बजावावी. यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे या कार्यशाळेत ज्या उपाययोजना सांगितल्या जातील त्याची आपल्या गावात योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यापुढील काळात पालकमंत्री या नात्याने जिल्हा परिषदेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदेला देण्यात येईल असे ते म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. जनतेनेही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे जनतेने टाळावे. कोरोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही या लढ्यात सक्रीय सहभागी व्हावे. यासाठी प्रबोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा. लोकांनी बेफिकिरपणे न वागता स्वयंशिस्त पाळली पाहिजे. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करीत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींना विविध योजना, आयोग याकडून येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या निधीमध्ये आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेचा स्वयंस्फूर्तीने स्वीकार करून कोरोना रोखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत “मी जबाबदार” ही संकल्पना आत्मसात करावी. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीमध्ये बेफिकीरपणाचे प्रमाण वाढले असून कोरोना विषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी राज्य शासनाकडून अनेक कठोर निर्बंध अंमलात आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भागात सरपंचांची भूमिका ही महत्वाची आहे. गावाच्या भल्यासाठी ग्रामस्तरावरील दक्षता समितीने गावात कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. जनतेनेही मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सरपंचांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन करून सरपंचांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत दक्षता समितीचे कार्य, गृह विलगीकरण, जनजागृती, कोविड मॅनेजमेंट, आठवडी बाजार किंवा गर्दीची ठिकाणे यांचे नियोजन, धार्मिक स्थळे, लसीकरण, कोविड तपासणी याबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. प्रास्ताविक शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांनी केले. दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले, रांजणी, भिलवडी, देशींग, कामेरी, खंडेराजुरी, शिरसी, येडेमच्छिंद्र, आटपाडी, कोत्यांवबोबलाद, वळसंग, आगळगाव, बिळूर आणि येळवी यांना रूग्णवाहिकेंचे प्रदान पालकमंत्री जयंत पाटील व सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आले. 00000

बुधवार, १७ मार्च, २०२१

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे - सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली दि. १७ (जि.मा.का.) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करून शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेनेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील कोराना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील व राहूल रोकडे, उपमहापौर उमेश पाटील, मिरज शासकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण सुरू असून २८ हजार ४२४ हेल्थ वर्कर्स पैकी २० हजार ५२४ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १० हजार ३९२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये ११ हजार २९३ पैकी ८ हजार ५९६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर २ हजार ५० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये २९ हजार ७५३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ वर्षे वयावरील कोमॉर्बीड ५ हजार ४०७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात एकूण ६४ हजार २८० जणांनी पहिला डोस तर १२ हजार ४४२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे हे प्रमाण राज्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये विशेषत: आठवडी बाजार यामध्ये गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी अथवा होणाऱ्या गर्दीचे योग्य प्रमाणे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यात वसतीगृहामध्ये रहाणाऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे व जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारावा. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरासमोर कोविड रूग्ण म्हणून फलक लावण्यात यावेत. सध्या उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळे लसीकरणावेळी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. लस दिलेल्या व्यक्तीला अर्ध्या तासाची विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सद्यस्थितीत मागणी असणाऱ्या सर्व सुविधा येत्या काळात वेद्यकीय महाविद्यालयास पुरविण्यात येतील, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे इत्यादी नियमांचे पालन करावे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीची सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या दररोज १ हजार इतक्या कोरोना टेस्ट होत असून कोरोनाचा वाढता प्रसार पहाता कोरोना टेस्टींगची संख्या १ हजार ५०० करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यामध्ये शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजनांची संबंधित यंत्रणांकडून कडकपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. 00000