मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया

- महानगरपालिका निवडणूक मतदारयादीचाही घेतला आढावा
- मतदार यादी अद्ययावत बिनचूक करण्याचे निर्देश


सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रत्येक घटकाने दक्ष राहावे. त्यासाठी चोख तयारी ठेवावी. लोकसभा, विधानसभा अन्य निवडणुका यातील मूलभूत फरक लक्षात घेऊन, आपली जबाबदारी कर्तव्ये पार पाडावीत. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने योगदान द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक मतदार यादी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेंद्र कचरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवीकांत आडसूळ, निवडणूक निरीक्षक श्रीपती मोरे, रवींद्र कुलकर्णी, सारंग कोडलकर, उत्तम पाटील आदि उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींपैकी 453 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची पूर्वतयारी तसेच, पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदार यादी बिनचूक अद्ययावत होण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही या दोन्ही बाबींचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी यावेळी घेतला.
निवडणूक निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडण्यासाठी या यंत्रणेतील प्रत्येक प्रशासकीय घटकाने घटनेने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले संपूर्ण अधिकार सजगतेने वापरावेत आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी दक्ष रहावे, असे सांगून राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले, अन्य सार्वत्रिक निवडणूका ग्रामपंचायत निवडणूक यामध्ये अनेक बाजूंनी मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. अन्य निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतात. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्ग 1 पासून वर्ग 3 पर्यंतचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यामुळे त्यांना त्यांची घटनात्मक जबाबदारी समजून देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, अडचणींचे निराकरण करणे गरजेचे आहे. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. अन्य निवडणुकांच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्या अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मदत आवश्यक तेथे सहकार्य करण्यासाठी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच, पोलीस संबंधित यंत्रणांनी तत्पर रहावे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक घटकाने योग्य संपर्क समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी अवैध दारु वाहतुकीबद्दल जागृती करण्यासाठी फलक लावावेत. परजिल्हा, परराज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. तसेच, कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक मतदार यादीबाबत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले, महानगरपालिका निवडणूक जरी पुढील वर्षी होणार असली तरी, त्यासाठी 1 जानेवारी 2018 या  अर्हता दिनांकावर ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होत आहे, अशा मतदारांची नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गृहभेटी द्याव्यात. महानगरपालिका क्षेत्रात 100 टक्के नवमतदार नोंदणी करावी. तसेच आवश्यक तेथे दुरूस्ती करून मतदार यादी अद्ययावत बिनचूक करावी. मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवू नये, असे ते म्हणाले.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत पोर्टलवर माहिती भरावी. मतदान स्लिपचे वाटप करावे, भरारी पथकांना योग्य निर्देश देऊन त्यांची संख्या पुरेशी ठेवावी, मतमोजणी करणारे अधिकारी कर्मचारी यांना या प्रक्रियेबाबत संपूर्ण प्रशिक्षण द्यावे, असे सांगितले. 
ग्रामपंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सांगली जिल्ह्यात 453 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये 1630 प्रभाग संख्या आहे. संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायती, 29 सरपंच आणि 389 सदस्यपदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 5 लाख 55 हजार 8 पुरूष तर 5 लाख 11 हजार 11 स्त्री असे एकूण 10 लाख 66 हजार 28 मतदार आहेत. जिल्हा मुख्यालयी तालुकास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिल्ह्यात 3 ऑक्टोबरपासून सुरू असलेला मतदारयादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, अवैध दारू जप्ती, मतदान कर्मचारी प्रशिक्षण, संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, तालुकानिहाय निवडणूक अधिकारी, वाहतूक आराखडा, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र साहित्य वाटप नियोजन, मतमोजणी नियोजन, विविध समित्या यांची माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पुढील वर्षी होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत बिनचूक करण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही, जाहिरात फलक, पथनाट्य, फिरती वाहने असे मतदार पुनरिक्षणाबाबत राबवण्यात येत असलेले जनजागृतीपर उपक्रम यांची माहिती दिली. यावेळी या माहितीबाबत ध्वनीचित्रफीत सादर करण्यात करण्यात आली.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नोडल अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, बी. एल. ओ. उपस्थित होते.
00000