गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन देशासाठी आदर्शवत काम - जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा

- महांकाली नदी पुनरूज्जीवनाचा उपक्रम हाती घ्यावा
- अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन ही निसर्गाचे ऋण फेडण्याची संधी
- भविष्यातील अभ्यासकांसाठी केस स्टडी
- अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन हे राष्ट्रहिताचे काम
   
सांगली, दि. 5 (जि. मा. का) : अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन ही निसर्गाचे ऋण फेडण्याची संधी आहे. हे काम सर्वांना आत्मिक समाधान देणारे आहे. हे काम देशासाठी आदर्शवत आहे. ही भविष्यातील अभ्यासकांसाठी केस स्टडी आहे. त्यामुळे या टप्प्यावर नदीचे पुनरूज्जीवन करताना नदीशास्त्राचे पालन करावे. नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी नदी पुनरूज्जीवन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कर्नाटकचे प्रशांत होन्नागोळ, अण्णासाहेब अडहळ्ळी, ऍ़ड. संजय होनकांडे, सतीश अडहळ्ळी, रवी नागगूळ, धाराप्पा होन्नागोळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी, जलबिरादरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही खूप चांगली योजना आहे. ती शास्त्रीय पद्धतीने राबवण्यावर राज्य शासनाचा भर आहे. या योजनेचे फलित सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबवण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना शासनाची नव्हे तर आपली सर्वांची आहे, असे मानून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. तरच त्याची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांनी टीमवर्क समन्वयाने रखडलेल्या कामांना गती द्यावी. अग्रणी नदीचे पात्र उपसा सिंचन योजनांच्या पाण्याने भरून घ्यावे, असेही ते म्हणाले.
सांगली जिल्ह्यात अग्रणी नदी पुनरूज्जीवनात संघटनात्मक कामे झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, अग्रणी नदी पुनरूज्जीवनामध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यांमध्ये समन्वयाचे आदर्श उदाहरण निर्माण करू. आपण कोण्या एका राज्याचे नव्हे तर अग्रणी नदीची लेकरे आहोत. त्यामुळे अग्रणी नदी पुनरूज्जीवनाचे काम हे राष्ट्रहिताचे आहे. हे एक शाश्वत मॉडेल करायचे असेल तर संबंधित सर्व विभाग आणि जनसमुदाय यांचा समन्वय आवश्यक आहे. शासनाचा सहभाग 55 टक्के आणि जनतेचा सहभाग 45 टक्के असावा. जनतेने दिलेल्या पैशातून त्याच्या मूल्यापेक्षा जास्त काम होणार आहे, असा जनतेला विश्वास दिला तर ही जनचळवळ होईल. हे काम भविष्यात शेकडो वर्षे आदर्श प्रशासनाची केस स्टडी म्हणून अभ्यासले जाईल.
राजेंद्रसिंह राणा म्हणाले, सन 2018-19 मध्ये होणाऱ्या पावसाचे पाण्याबाबत आतापासूनच नियोजन करावे लागेल. दुष्काळी जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी छोटमोठ्या कामांबरोबरच महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनचाउपक्रमही हाती घ्यावा. या दोन्ही नद्यांमध्ये म्हैसाळ टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी भरून घ्यावे. डोह भरून घ्यावेत.
जिल्हाधिकारी म्हणून जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिल्याचे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान आणि अग्रणी नदी पुनरूज्जीवन यांची कार्यपद्धती जलनीतीनुसार अनुसरू. अग्रणी नदी प्रवाहित करण्यासाठी समन्वयाचा अभाव भरून काढून अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावू. अग्रणी नदी पुनरूज्जीवन हे देशातील बेस्ट मॉडेल बनण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, या कामी वाल्मी संस्थेची मदत घेऊ. जलसाक्षरतेसाठी यशदा संस्थेमध्ये कार्यशाळा घेऊ. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झालेल्या 140 गावांतील प्रत्येकी 5 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये जलसंधारणाचे शास्त्रीय महत्त्व अंमलबजावणी यांची माहिती देण्यात आली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते यांच्यासह संपतराव पवार, जलबिरादरीचे प्रतिनिधी, जलबिरादरीचे नरेंद्र चूघ, विनोद बोधनकर, उदय गायकवाड, विलास चौथाई, श्रीपाद करंदीकर, कर्नाटकचे अधिकारी यांनी विचार व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले.  
    यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह वन, कृषि, छोटे पाटबंधारे, रोजगार हमी योजना, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा