शनिवार, २७ जुलै, २०१९

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त दर्जेदार स्मारक - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नियोजन व पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, वाटेगावचे सरपंच सुरेश साठे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने वाटेगाव मधील मागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, यापूर्वी  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी 28 ठिकाणे, स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवलापूर आणि वाटेगावचा समावेश आहे. वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी यापूर्वीच जवळपास 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अण्णाभाऊ साठे राहत असलेल्या मुंबईतील निवासस्थानीही त्यांचे भव्य स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जन्म असल्याने अण्णाभाऊ साठे यांचे जिल्ह्यात एक दर्जेदार स्मारक उभा करण्यासाठी जागा निश्चिती करून, प्रस्ताव सादर करावा. या स्मारकाच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी अभ्यासिका आदिंचा समावेश असावा. याचबरोबरच संस्था, संघटना आदिंकडून येणाऱ्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी दि. 1 ऑगस्ट रोजी त्यांचे जन्मस्थळ वाटेगाव आणि मिरज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगिता खोत यांनी मौलिक सूचना केल्या. स्वागत अविनाश देवसटवार यांनी केले. तर आभार सचिन कवले यांनी मानले.
00000


सोमवार, १५ जुलै, २०१९

शहरांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे शासनाचे धोरण - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) :   दिवसेंदिवस शहरामधील लोकसंख्या सातत्याने वाढत असून वाढत्या लोकवस्त्यांना पुरेशा नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सांगलीसह राज्यातील अन्य महानगरपालिका, नगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषदा यांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
    महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजनेंतर्गत सांगली महानगरपालिकेला 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधील विविध विकास कामांचा शुभारंभ व भुमिपूजन कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महापौर संगीता खेात, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, एमएसईबीच्या संचालिका निता केळकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदि मान्यवर उपस्थित होते.
    सांगलीवाडी येथील विकास कामांचा यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्याहस्ते वॉटर एटीएमचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या सुविधा प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात सुरू कराव्यात असे सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, सर्वोच्च न्यायालयातही कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्थगितीला नकार दिल्याने नोकर भरतीमध्ये अडथळा येणार नाही. सर्वांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी धनगर समाजाचे आरक्षणही दृष्टीक्षेपात असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी विश्रामबाग चौकातील दिशादर्शक फलकाचे उद्घाटन, खरे कल्बजवळील रस्ता, शिवदर्शन कॉलनी वार्ड नं. 19 येथील रस्ता, संजयनगर येथील रस्ता, कुपवाड येथील यशवंतनगर येथील रस्ता सुधारणा कामाचे, पंढरपूर रोड मिरज येथील वारकरी भवनाचे काम व शिवाजी स्टेडियम येथील नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.
    यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

000000

तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगातून रोजगार निर्मिती करावी - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षण देवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. उद्योगाची नवनवीन क्षेत्रे निर्माण होत असून युवकांनी नव्या वाटा शोधाव्यात नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. कौशल्य प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी काम करत असताना आपल्यामधील कौशल्य वापरण्याची जिद्द व मनाची तयारी पाहिजे. तरूणांनी नव्या वाटा शोधत फक्त नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
    जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, करिअर मार्गदर्शक डॉ. संदीप पाटील, महानगरपालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस. के. माळी, पुणे विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील, गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
    सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, उद्योग उभारणीसाठी मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेमधूनही कर्ज वितरीत करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक उद्योग सुरू करावेत. कष्ट व मेहनत केल्यास निश्चितच यश मिळेल. उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, विविध योजनांच्या माध्यमातून पैसा उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त हिम्मत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देवून उद्योग उभा करण्याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्वानुभव कथन केले.
    यावेळी महापौर संगीता खोत, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. संदीप पाटील यांचे कौशल्य विकासातून करिअर संधी या विषयावर व्याख्यान झाले.
    यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील व्याज परतावा मिळालेल्या लाभार्थींचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. या महामंडळाच्या योजनांची महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.  
यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणाऱ्या कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक प्राप्त ग्रीक्स, स्पंदन कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मिरज, व्दितीय क्रमांक रिसोर्स ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटी मिरज, तृतीय क्रमांक प्राप्त प्राप्त लियाड इन्स्टिट्युट ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन सांगली या प्रशिक्षण संस्थांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच श्रीयश एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युट मिरज व ग्रीक्स, करिअर पॉईंट कॉम्प्युटर अकॅडमी सांगली या प्रशिक्षण संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी विविध प्रशिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून रोजगार प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदन नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
प्रास्ताविकात सहाय्यक संचालक एस. के. माळी यांनी जागतिक कौशल्य दिनाचा हेतू सांगून युवकांनी विविध प्रशिक्षण संस्थाव्दारे चांगले कौशल्य आत्मसात करून याचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी यांनी मानले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
    या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य, विविध प्रशिक्षण संस्थांचे संचालक, प्रतिनिधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

सामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे


सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख इतक्या रक्कमेचा आराखडा सन 2019-20 साठी जिल्ह्याला मंजूर असून 26 कोटी 98 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. तर नाविण्यपूर्ण योजनेसाठी 2 कोटी 44 लाख 53 हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून यंत्रणांनी संवेदनशिलपणे राहून विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. निकष पूर्ण करणाऱ्या कामांचे प्रस्ताव त्वरीत पूर्ण करावेत. निधी अखर्चित राहिल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
          जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना आढावा बैठक सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
          सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, अधिकाऱ्यांनी निधींची मागणी करत असताना समाजाच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव द्यावेत. गतवर्षीच्या झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ द्यावीत, असे सांगून विहीत पध्दतीने निधी विहीत कालावधीत खर्च करून चांगल्या कामांच्या माध्यमातून योजना जनतेपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी त्यांनी कामांना तांत्रिक मान्यता देणे, निविदा मागविणे व अनुषंगिक कामांची सर्व जबाबदारी कार्यान्वित यंत्रणांची असून नाविण्यपूर्ण योजनेतूनही चांगले उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत 5 कोटी रूपयांच्या मर्यादेत जागेच्या उताऱ्यासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी घरकुल योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
          यावेळी डॉ. खाडे यांनी पशुसंवर्धन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना, कृषि विभागाकडील विविध योजना, विद्युत विकास आदि विषयांचा आढावा घेतला. तसेच शासकीय निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी शुध्द पाणी प्रकल्प स्थापित करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी सादर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
          जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यंत्रणांनी नजिकच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे निर्देश दिले.
00000

शनिवार, १३ जुलै, २०१९

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण


सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, आदिंचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी बाळकिशोर पोळ यांच्यासह वन विभागाचे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
       
00000

जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत अखर्चित निधी मुदतीत खर्च करा - पालकमंत्री सुभाष देशमुख


जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
- सन 2019-20 साठी 313 कोटीचा आराखडा मंजूर


सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : सन 2018-19 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना अशा तिन्ही योजनांतर्गत एकूण सर्व 306 कोटी 84 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. या निधीपैकी मार्चअखेर बीडीएसनुसार 293 कोटी 10 लाख रुपये खर्च झाले. मात्र मार्चअखेर प्रत्यक्षात खर्चित पडलेल्या निधीची आकडेवारी कमी आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अखर्चित निधी मुदतीत खर्च करावा, असे निर्देश सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, कृषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य-सदस्या आणि सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यांतर्गत सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर 224 कोटी, 18 लाख रुपये निधी प्राप्त झाला. त्यापैकी मार्चअखेर बीडीएस नुसार 223 कोटी 45 लाख रुपये निधी खर्च झाला. मात्र प्रत्यक्षात खर्च झालेला निधी 106 कोटी 26 लाख रुपये आहे. तसेच, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख रुपये निधी मंजूर झाला. त्यापैकी मार्चअखेर बीडीएसनुसार 68 कोटी, 50 लाख रुपये निधी खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात केवळ 20 कोटी 33 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना कार्यक्रमांतर्गत मंजूर प्राप्त सर्व निधी बीडीएसनुसार आणि प्रत्यक्षात खर्च झाला आहे. त्यामुळे ज्या सर्व विभागांचा प्रत्यक्षातील निधी अखर्चित राहिला आहे, त्यांनी तो खर्च करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी 2019 - 20 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, 2019 - 20 अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाने 224 कोटी 17 लाख रुपये इतक्या वित्तीय रकमेच्या मर्यादेत आराखडा तयार करून सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. तथापि, कार्यान्वयीन यंत्रणेच्या मागण्या लक्षात घेऊन 60 कोटी रुपयांचा अतिरीक्त आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यासाठी सन 2019 - 20 साठी मूळ आराखड्यात 6 कोटी 83 लाख रुपये इतकी अतिरीक्त वाढ देऊन 231 कोटीच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. तसेच, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख रुपये आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना कार्यक्रमांतर्गत 1 कोटी 20 लाख रुपये रकमेच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. असा तिन्ही योजनांसाठी एकूण 313 कोटी 71 लाख रुपयांच्या आराखड्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करून, चांगली, दर्जेदार आवश्यक कामे करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सामान्य नागरिक आणि शेतकरी यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी तत्पर असावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्यांशी समन्वय ठेवून आरोग्य, रस्ते, पाणी, शिक्षण, वीजबिल यासारख्या मूलभूत गरजांबाबतचे प्रश्न सोडवावेत. त्यासाठी बैठका घ्याव्यात. पाठपुरावा करावा. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत खातेदारांना सभासद करून घ्यावे. तसेच, पीकविम्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. तसेच सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत काय कार्यवाही केली, त्याबाबत लेखी उत्तर देऊन अवगत करावे.
संपूर्ण जिल्ह्यातून महावितरण विभागाबाबत सदस्यांनी जनतेच्या समस्या मांडल्या. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही करावी. महावितरण विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईत स्वतंत्र बैठक घेण्याबाबत सूचित केले.
यावेळी सर्व विभागांकडील योजनांचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला. खासदार, आमदार तसेच समिती सदस्यांनी मौलिक सूचना केल्या. बैठक यशस्वी होण्यासाठी नियोजन विभागाचे सहाय्यक नियोजन अधिकारी अशोक पाटील, लेखाधिकारी एस. आर. पाटील यांच्यासह नियोजन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
यावेळी चारा छावण्या व त्यांची देयके, नळपाणीपुरवठा, सांगली तासगाव बाह्यवळण रस्ता, डाळिंब, द्राक्षबागेसाठी बारमाही पीकविमा, उपसा सिंचन योजनांचे आवर्तन व वीजबिल, डोंगराई, चौरंगीनाथ पर्यटनस्थळ, शासकीय रूग्णालय, सांगली येथे सोयीसुविधा, शेतीपंप, ग्रामीण रूग्णालय, राष्ट्रीय पेयजल योजना आदिंबाबत समिती सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, बहिर्जी नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग. दि. माडगूळकर, बालगंधर्व, गणपतराव आंदळकर यांच्या स्मारकाबाबत समिती सदस्यांनी सूचना केल्या.
प्रारंभी दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख आणि विलासराव शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांनी बैठकीची माहिती दिली. या बैठकीस माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, समिती सदस्य आणि सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000