सोमवार, १५ जुलै, २०१९

शहरांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे शासनाचे धोरण - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) :   दिवसेंदिवस शहरामधील लोकसंख्या सातत्याने वाढत असून वाढत्या लोकवस्त्यांना पुरेशा नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सांगलीसह राज्यातील अन्य महानगरपालिका, नगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या नगरपरिषदा यांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
    महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजनेंतर्गत सांगली महानगरपालिकेला 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधील विविध विकास कामांचा शुभारंभ व भुमिपूजन कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महापौर संगीता खेात, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, एमएसईबीच्या संचालिका निता केळकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदि मान्यवर उपस्थित होते.
    सांगलीवाडी येथील विकास कामांचा यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्याहस्ते वॉटर एटीएमचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या सुविधा प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात सुरू कराव्यात असे सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, सर्वोच्च न्यायालयातही कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्थगितीला नकार दिल्याने नोकर भरतीमध्ये अडथळा येणार नाही. सर्वांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी धनगर समाजाचे आरक्षणही दृष्टीक्षेपात असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी विश्रामबाग चौकातील दिशादर्शक फलकाचे उद्घाटन, खरे कल्बजवळील रस्ता, शिवदर्शन कॉलनी वार्ड नं. 19 येथील रस्ता, संजयनगर येथील रस्ता, कुपवाड येथील यशवंतनगर येथील रस्ता सुधारणा कामाचे, पंढरपूर रोड मिरज येथील वारकरी भवनाचे काम व शिवाजी स्टेडियम येथील नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.
    यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा