मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

आयर्विन पूलाला समांतर निर्माण होणाऱ्या नविन पूलामुळे सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल - पालकमंत्री जयंत पाटील

- राम मंदिर ते गांधी चौक मिरज रस्त्याचे लवकरच सहापदरीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार - सांगली सिव्हील हॉस्पीटल मध्ये नविन 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज येथे 100 खाटांचे एक रूग्णालय, कुपवाड येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल होणार. - महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक उत्तम व चांगल्या दर्जाचे सोलर सिस्टीम असलेले नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली शहराचा वाढता विस्तार, शहरीकरण, वाढती वाहतूक तसेच आपत्ती काळात शहराशी तुटणारा संपर्क, तसेच आयर्विन पूलाला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली चार वर्षे या पुलावरून अवजड वाहनांना येण्याजाण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी शहराला जोडणाऱ्या नवीन पुलाची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळेच 25 कोटी रूपये खर्चून कृष्णा नदीवर आयर्विन पूलाला समांतर नविन पूलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे शहराचे बहुतांश प्रश्न सुटून आपत्ती काळातही शहराला तातडीने मदत होईल. त्याचबरोबर सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली येथील आयर्विन पूलाला लागून समांतर पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एस. नलवडे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, समाज कल्याण सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेवक भारती निगडे, उर्मिला बेलवलकर, धीरज सुर्यवंशी, शेखर माने आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या सेवेसाठी गेली 90 वर्षे कार्यरत असणारा आयर्विन पूल हा बांधकाम क्षेत्राचा उत्कृष्ट नमुना असून या पुलाच्या बांधकामाचे स्वरूप अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या पूलाचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन तयार करणारे डिझायनर, या पुलासाठी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्व व्यक्तींची नावे, पुलाच्या खर्चासह फलकावर देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या पुलाचे आयुष्य निर्धारीत करण्यात आले. त्याचप्रमाणे नविन होणारा पूल हा दर्जेदार व देखणा त्याचबरोबर शहराच्या वैभवात भर घालणारा व्हावा. पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आयर्विन पूलाप्रमाणेच या नविन पूलावर सर्व परिपूर्ण माहितीचा फलक लावण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, सांगली शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य शासनाने महापालिकेसाठी 100 कोटी इतका निधी मंजूर केला आहेत. त्यातील 20 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरीत निधीही तातडीने देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. सांगली येथील राम मंदिर चौक ते मिरज शहरातील गांधी चौक रस्ता सध्या चौपदरी असून त्याचे लवकरच सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली सिव्हीलमध्ये 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज सिव्हीलमध्ये 100 खाटाचे एक रूग्णालय मंजूर झाले असून ते ही तातडीने उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. यामुळे सांगली सिव्हील मध्ये 800 ते 900 बेड्स उपलब्ध होतील. त्याचबरोबर कुपवाड येथेही मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच कुपवाड शहराची ड्रेनेज योजनाही तातडीने मार्गी लावण्यात येईल. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते त्यामुळे सांगलीत उत्तम व चांगल्या दर्जाचे नाट्यगृह उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. नाट्यगृहाचा सर्वात मोठा खर्च हा वीज बिलाचा असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी या नाट्यगृहावर सोलर सिस्टीम बसविण्याबाबतही विचार करण्यात येईल. आपत्तीच्या काळात सांगली शहराचा पेठ, इस्लामपूर, आष्टा तसेच नजिकच्या नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटतो. हा संपर्क कायम राहण्यासाठी पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग करण्यात आला असून या रस्त्याचेही काम लवकरच सुरू होवून तो ही दर्जेदार निर्माण होईल, असे ते म्हणाले. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता संतोष रोकडे म्हणाले, आयर्विन पूलाला समांतर पूलासाठी 25 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून हा पूल 132 मीटर लांबीचा असून 12 मीटर रूंदीचा आहे. या पुलामध्ये 5 पीअर उभारण्यात येणार आहेत. सांगलीवाडीच्या बाजूस 112 मीटर व सांगलीच्या बाजूस 110 मीटर जोडरस्ते करण्यात येणार आहेत. सदरचा पूल दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज यांनी मानले. प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगलीवाडी येथे ‍ नविन पूलाच्या कामाचे ‍ भूमिपूजन करण्यात आले. तर सांगली येथील टिळक चौकात कोनशिला अनावरण करण्यात आले. 00000

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री जयंत पाटील

- पोलीस दलाची गतीमानता वाढविण्यासाठी 35 बोलेरो व 61 मोटर सायकल देण्याचे नियोजन - आटपाडी येथे नविन पोलीस स्टेशन इमारत उभारणार सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : पोलीस दलाचे कामकाजाचे स्वरूप विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. सांगली पोलीस दलालाही कामकाजासाठी क्षेत्र कमी पडत असल्याने नविन इमारत असणे ही आवश्यक बाब झाली होती. त्यासाठीच नविन पोलीस अधिक्षक कार्यालय निर्माण करण्यात येणार असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. नविन पोलीस अधिक्षक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय सांगली येथे संपन्न झाले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सर्वश्री अरूण लाड, सुधीर गाडगीळ, डॉ. सुरेश खाडे, सुमनताई पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दल सक्षम करण्यासाठी भर देण्यात येत असून पोलीस दलाची विश्रामबाग येथील 216 शासकीय पोलिस निवासस्थाने व आटपाडी येथील नविन पोलीस स्टेशन उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच पोलीस क्वाटर्स दुरूस्तीसाठी 1 कोटी 90 लाख इतका निधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाची गतीमानता वाढविण्यासाठी 35 बोलेरो व 61 मोटर सायकल देण्याचेही नियोजन करण्यात आले असून त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. नुतन पोलीस अधिक्षक कार्यालय उभारणीसाठी सुमारे 20 कोटीचा निधी देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास वाढीव निधीही देण्यात येणार आहे. नुतन इमारत उभारणी करताना सदरची इमारत ही मेन्टेनन्स फ्री उभारण्यावर भर द्यावा. ही इमारत सर्व सोयीसुविधेने उभारण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून चांगल्या प्रकारे कारभार होवून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दलानेही जनतेला तातडीने सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अडचणीत असलेल्या व्यक्तीकडून अथवा कुटुंबाकडून मदतीसाठी कॉल आल्यानंतर अगदी कमीत कमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचणे ही काळाची गरज झाली आहे. तरच गुन्हेगारी प्रवृत्तीला बहुतांशी आळा बसेल व पोलीस दलाचा वचक निर्माण होईल. पोलीस दलाच्या 112 क्रमांकावर दिली जाणारी सुविधा ही अधिक जलदगतीने झाल्यास पोलीस दलाबद्दल जनतेत विश्वास निर्माण होईल व पोलीसांमध्येही आत्मविश्वास वाढेल, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली पोलीस दलाने राबविलेले उपक्रम हे आता आदर्शवत होत चालले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चोरीस गेलेला मुद्देमाल अत्यंत कमी कालावधीत संबंधिताला शोध घेवून परत करणे, मृतांच्या वारसांना अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने राबविणे तसेच खाजगी कंपन्यांमध्ये पोलीसांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाची नोकरी मिळवून देणे, एमआयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी तक्रार पेठीची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रार पेठीत प्राप्त झालेल्या सुचनांवर तातडीने अंमलबजावणी करणे तसेच जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, महत्वाची ठिकाणे या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानके आयएसओ मानांकन करण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत असून हे सर्व श्रेय सांगली पोलीस दलाचे आहे. त्यामुळे सांगली पोलीस दल प्रशंसनेस पात्र आहे. पोलीस दल सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करते. तसेच कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पध्दतीने राबवून कोरोना फैलावण्यास अटकाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कर्तव्यासाठी बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे याच पोलीस दलाप्रती आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, त्यानांही आपण सहकार्य करणे तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढविणे. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, पोलीस दलामध्ये नवनविन विभाग सुरू होत असून कामकाजाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यावर व अधिकच्या नविन सुविधा, इमारती उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात 450 कोटीची तरतूद करण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करून ती 800 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात 1 हजार व्यक्तींच्या मागे 1 पोलीस कार्यरत असून पोलीसांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस दलाने मुलींना स्वरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यावर भर दिला असून त्याची प्राथमिक सुरूवात सातारा पोलीस दलात करण्यात आली आहे. हाच प्रकल्प पुढे राज्यात विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात पोलीस दलाने बजावलेले कर्तव्य हे प्रशंसनीय आहे. कोरोना काळात प्राणाची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून शिस्त लावण्याचे काम चोखपणे बजावले आहे. त्यामुळे पोलीस दल हे यापुढेही याच पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेचे काम चोखपणे पार पाडेल अशी खात्री असून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी नविन इमारत आत्मविश्वास वाढविणारी असेल, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी नविन इमारत उभारताना वाहनांच्या पार्किंगसाठी इमारतीच्या बाजूला सोय न करता इमारतीच्या खाली सोय करण्यात यावी. सदरची इमारत ग्रीन बिल्डींग करण्यावर भर द्यावा. इमारतीवर सोलर सिस्टीम असण्याबरोबरच पोलीस दलातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्राणांची आहुती देवून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले त्यांची ओळख जिल्ह्याला व्हावी यासाठी या इमारतीमध्ये म्युझियम करण्यात यावे, अशा सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी मानले. 00000

कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या इमारतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन

- शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील - पालकमंत्र्यांची ग्वाही - कुपवाड शहरासाठी आणखी एका सुसज्ज हॉस्पीटलचे नियोजन सांगली दि. 18 (जि.मा.का.) : सुसज्ज रूग्णालयांची गरज कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर अधोरेखीत झाली आहे. कुपवाड वारणाली येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने कुपवाडकरांची अनेक वर्षांची सुसज्ज हॉस्पीटलची प्रतिक्षा पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या हॉस्पीटलशिवाय कुपवाडला आणखी एक सुसज्ज हॉस्पीटल बामणोली रोड येथे उभारण्यात येणार असून त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. सांगली-‍मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड वारणाली सर्व्हे नंबर 191/अ 1+2 या जागेवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, महानगरपालिका आयुक्त नितीण कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, ‍विरोधी पक्षनेता संजय मेंढे, गटनेता मैनुद्दीन बागवान, माजी आमदार शरद पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, संजय बजाज, संजय विभूते यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.‍ महानगरपालिका आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी उत्तम प्रकारे काम करीत असून महानगरपालिकेच्या मध्यावधी आरोग्य केंद्रातून माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत, अशा शब्दात महानगरपालिका आरोग्य सुविधेला देत असलेल्या प्राधान्याबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले. कुपवाड येथे 5 कोटी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या हॉस्पीटलसाठी महानगरपालिकेचा ठराव विखंडीत करून हॉस्पीटलला मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून अमृत पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्ण होत आहे. मिरज ड्रेनेज योजना 93 टक्के तर सांगली ड्रेनेज योजना 75 टक्के पूर्ण झाली आहे. 236 कोटी रूपये खर्चाच्या कुपवाड ड्रेनेज योजनेलाही शासनस्तरावर लवकरात लवकर मान्यता घेवू. सांगलीतील काळ्या खणीचे काम सुरू असून 9 कोटी रूपयाचा वाढीव प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात येत आहे. ‍मिरज येथील खण सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. पूर, महापूराच्या काळात पाणीपुरवठा योजना बंद पडू नयेत यासाठीची योजना हाती घेण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली, मिरज प्रमाणेच कुपवाड शहरात बगीचा विकास कार्यक्रमांतर्गत तीन ठिकाणी बगीचे उभारण्यात येणार आहेत. तसेच स्टेशन चौक, मिरजेतील गांधी चौक ही दोन्ही ठिकाणे अतिशय चांगल्या पध्दतीनी सुशोभित करण्यात येतील. या सर्व कामांसाठी शासनस्तरावरून निधी आणण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कुपवाड शहरातील नागरिकांची मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची मागणी होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या मान्यतेमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महानगरपालिकेच्या निधी व्यतिरीक्त या हॉस्पीटलच्या सुसज्जतेसाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत पालकमंत्री व आपण स्वत: शासनाकडून मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खाजगी रूग्णालयांमधील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या रूग्णालयात सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा ‍मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी 5 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत वर्षभरात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. कुपवाडकरांसाठी हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून या हॉस्पीटलमुळे या क्षेत्राचा भौगोलिक विकास होणार असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलला मंजूरी ‍दिल्याबद्दल नगरविकास विभाग आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी कुपवाड ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासंबंधी पालकमंत्री जयंत पाटील यांना विनंती केली. प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने महानगरपालिकेचे पहिले अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर उभा राहात असल्याचे सांगून कोरोनाच्या लाटेत आरोग्य सेवा ‍किती सक्षम हव्यात याची प्राकर्षाने जाणीव झाली. कोरोना काळात महानगरपालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हेल्थ सेंटरची गरज अधोरेखीत झाली त्यादृष्टीने सदरचे कम्युनिटी हेल्थ सेंटर महत्त्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेवक विष्णू माने, जयश्री पाटील, संजय विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आभार मानले. 000000