शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्गाचे काम दर्जेदार करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रस्ता) हा शहरातील प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे. सांगली व विश्रामबागची शोभा वाढेल, अशा पद्धतीने या रस्त्याचे काम देखणे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रोड) च्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्योतिरामदादा पाटील कुस्ती आखाड्याजवळ आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदि उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, १०० फुटी रस्ता वर्दळीचा रस्ता असून, या रस्ता कामातून तुमचा ठसा उमटला जाणार आहे. रस्ता तयार करताना नगरसेवक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते व नागरिक यांनी सहकार्य करावे. अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढावे. सध्या ६० फुटी रस्त्याचे काम होत असून, त्यामध्ये अतिक्रमण व विजेच्या खांबांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. संपूर्ण १०० फूट रस्त्याचा प्रस्ताव लगेच करा, निधीची कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याची लांबी ३,८५० मीटर आहे. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम जवळपास १५ कोटी, १७ लाख रूपये आहे. याअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचे २ मीटर रूंदीने रूंदीकरण, खडीकरण, मुरूमीकरण, सिलकोट, थर्मोप्लास्टीक पेंट, रस्ता दुभाजक व दुभाजकामध्ये वृक्षारोपण अशी कामे करण्यात येणार आहेत. 00000

प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिली ग्वाही - समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल - बळीराजाला बळ देण्यासाठी सिंचन प्रकल्पांना भरीव निधी - शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉ. खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह बळीराजाला बळ देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पास 8 हजार 272 कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये 1 हजार 930 कोटी रूपये मंजूर आहेत. त्यापैकी विविध कामांची 981 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 57 किलोमीटरपैकी 8 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा सात हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीत या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. माहे नोव्हेंबर - डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईपोटी सुधारित शासन निर्णयानुसार वाढीव दराने 3 हेक्टरच्या मर्यादेत जिल्ह्याची एकूण 58 कोटी रुपये अनुदान मागणी शासनाकडे केली आहे. एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेतून आजअखेर 62 हजार शेतकऱ्यांना जवळपास सतरा कोटी रूपये अदा केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून चालू आर्थिक वर्षात विहित मुदतीत कर्ज फेडणाऱ्या 86 हजार शेतकऱ्यांना जवळपास तेरा कोटी रूपये मंजूर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 81 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 482 कोटी रूपये वितरीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक शासकीय योजना जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जवळपास साडेनऊ लाख लोकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण होऊन जिल्ह्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे एम. आर. आय. नवीन यंत्र खरेदीसाठी 25 कोटी तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे सी. टी. स्कॅन यंत्र खरेदीकरिता साडेदहा कोटी रूपये नुकतेच जाहीर करण्यात आले. दोन्ही मशिनची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, डीपीडीसीमधून विविध विभागांतील अत्याधुनिक यंत्रे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदी केले आहे, असे त्यांनी सांगितले. कामगारांचे जीवनमान व आरोग्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्यस्तरीय विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसह नोंदित बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पात आतापर्यंत एकूण 3 लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी एकूण 471 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, डीपीडीसीच्या निधीमधून जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिनस्त 10 कार्यालयास जवळपास पावणेदोन कोटी रूपयांचे 15 अत्याधुनिक रोव्हर मशीन देण्यात आले आहेत. प्लॉटर खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भूमि मोजणी प्रकरणांमधील विलंब कमी होऊन, जनतेला अचूक व जलद गतीने सेवा मिळेल. सांगली पेठ रस्त्याचे काम सुरू झाले असून, हा 41 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता चार पदरी होणार आहे, असे त्यांनी सांगितले. कुपवाड भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन आणि सांगली ते बोरगाव महामार्ग चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्याचबरोबर मिरज जंक्शन व भिलवडी या दोन रेल्वे स्थानकांजवळील रेल्वे ओव्हर ब्रिजचे लोकार्पणही करण्यात आले. अशा प्रकल्पांसह सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या भरीव मदतीबद्दल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर व त्याच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतला. यामध्ये वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठीची सन्मानधन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक व गट कर्ज परतावा, जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा यांचा समावेश आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यामध्ये कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. प्रारंभी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. लष्करात कार्यरत असताना अपंगत्त्व आल्याने शुभम अनिल झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), रामदास संभाजी गरंडे (सिध्देवाडी, ता. मिरज) यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान देण्यात आले. तसेच, शत्रूशी लढा देताना जखमी झालेले भरत अगतराव सरक (करगणी, ता. आटपाडी) यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. आवास योजना (ग्रामीण) मधील प्रथम तीन सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचा तसेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विभागास डीपीडीसी निधीमधून प्राप्त रोव्हर मशीनचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये जिल्हास्तरीय निवड झालेल्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, आरसीपी पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, निमणी स्कूल (एमसीसी), मार्टिन इंग्लिश स्कूल व आर. पी. पाटील स्कूल कुपवाड या शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, डायल 112 वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांसह पत्रकार ‍दीपक चव्हाण यांचा ‍चित्ररथ आदिंनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात ए. ए. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली, सौ. कस्तुरबेन भगवानदास दामाणी हायस्कूल सांगली, देशभक्त नाथाजी लाड विद्यालय सांगली, रा. ने. पाटील गर्ल्स हायस्कूल सांगली, मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज, ज्युबिली कन्या शाळा मिरजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे व बाळासाहेब माळी यांनी केले. 00000

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

पेठ नाका येथे 25 जानेवारीला स्वयंरोजगार मेळावा

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींपर्यंत शासनाच्या विविध स्वयंरोजगार विषयक कर्ज योजना, शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जिल्ह्यामध्ये उद्योजकता विकास वाढीसाठी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ नाका येथे दि. 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिला बचतगट यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ नाका, ता. वाळवा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालये, विविध महामंडळे, बँका, स्टार्टअप सहभागी होणार आहेत. यामध्ये छत्रपती शाहू महाराज संधोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), कोल्हापूर, जिल्हा उद्योग केंद्र सांगली, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, सांगली, जिल्हा कृषी कार्यालय, सांगली, कृषी विभाग, जिल्हा परिषद, सांगली, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, सांगली, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सांगली, महिला आर्थिक विकास महामंडळ, सांगली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा), सांगली, जिल्हा रेशीम उद्योग विभाग, सांगली, मत्स्य व्यवसाय कार्यालय, सांगली, समाजकल्याण कार्यालय, सांगली, पशुसंवर्धन विभाग, मिरज, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI), सांगली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, सांगली, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लि. (मिटकॉन), सांगली, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, सांगली, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, सांगली, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग विकास महामंडळ, सांगली, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, सांगली, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, सांगली, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, सांगली, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, सांगली, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, सांगली, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ द्वारा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग विकास महामंडळ, सांगली, NETRA RIT Foundation RIT-TBI (NRT) Incubation Centre, Islampur यांचा समावेश असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या कर्जदारांना एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेचा 26 फेब्रुवारी पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लि., सांगली (अवसायनात) या बँकेच्या सर्व कर्जदार, जामिनदार यांना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या दि. 28 जून 2023 रोजीच्या मंजुरीने एकरक्कमी कर्ज परतफेड योजना लागू झालेली आहे. या व्याज सवलत योजनेचा सर्व कर्जदार खातेदारांनी दि. 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत लाभ घेऊन कर्जखाती बेबाक करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था आयुक्त व निबंधक अनिल कवडे, सहकारी संस्था कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरूण काकडे व बॅंकेच्या वतीने अवसायक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. या योजनेनुसार कर्ज खाते अनुउत्पादीत झाल्यानंतर कर्ज खाते डाऊटफूल नं.1 मध्ये गेलेच्या दिनांकारोजी असणारी मुद्दल व त्यावर त्या दिनांकापासून डाऊटफूल नं.3 पर्यंतच्या 36 महिन्यांच्या कालावधी पर्यंत 6 टक्के व्याजदराने व्याजाची आकारणी करून होणारे व्याज व या व्याजामध्ये डाऊटफूल नं.1 पर्यंतच्या कालावधीचे कर्जखातेवरील व्याज अधिक करून मुद्दल व व्याज एकत्रीत करून होणाऱ्या येणेबाकी रक्कमेमधून डि-1 दिनांकानंतर आजपर्यंत भरलेली रक्कम या योजनेत वजा केली जाते व त्यामध्ये वसुलीसाठी झालेला कायदेशीर खर्च, अवसायन खर्च हे अधिक केले जातात व अशी रक्कम कर्जदारास भरावी लागते. ज्यामुळे कर्जदारास व्याज रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकते. यामध्ये कर्जदाराची व्याज रक्कम कमी झाल्याने बराचसा फायदा होत असल्याने कर्जदारांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेऊन कर्जखाती बेबाक करावीत. तसेच अशाच प्रकारची मयत कर्जदारांसाठी योजना असून त्यामध्ये डि-1 नंतर होणारे व्याज घेतले जाणार नाही. ही योजना दि.26 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू असल्याने याचा लाभ सर्व कर्जदार खातेदारांनी घ्यावा. कर्जदार कर्जमुक्त झाल्याने त्यांच्या मालमत्तेवरील बँकेचे जप्ती बोजे कमी होऊन कर्जदारास नवीन कर्जाचा लाभ इतर बँकांकडून घेता येईल. तसेच कर्जदाराचे सिबील स्कोअर देखील यामुळे चांगला होणार आहे. ही योजना दि. 26 फेब्रुवारी 2024 नंतर बंद झाल्यास मात्र कर्जदारांच्या कर्जखात्यावर कर्ज उचललेल्या दिनांकापासूनचे आज तारखेपर्यंतचे तेव्हांच्या प्रचलीत व्याजदराने व्याजाची आकारणी करून संपूर्ण मुद्दल व व्याजाची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यामुळे जे कर्जदार दि. 26 फेब्रुवारी 2024 पूर्वी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज भरणार नाहीत त्या कर्जदारांना दि. 26 फेब्रुवारी 2024 नंतर व्याज रक्कमेत कसलीही सूट मिळणार नाही व अशा कर्जदारांच्या, जामीनदारांच्या जंगम, स्थावर मालमत्ता यांची जप्त करून वसूलीची कायदेशीर कारवाई बँकेकडून केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जाची वसूली होऊन ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम परत करणे बँकेस शक्य होईल. 00000

नदी संवर्धनासाठी नदी संवाद पदयात्रेत सहभागी व्हा - कार्यकारी अभियंता ज्योती देवकर

कृष्णा नदी संवाद पदयात्रा 21 ते 28 जानेवारी पर्यंत सांगली दि. 17 (जि.मा.का.) : चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्या मार्फत दि. 21 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत कृष्णा नदी संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्यासोबत संवाद साधण्यासाठी विविध गावात बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. नदी स्वच्छ, अमृत वाहिनी बनविण्यासाठी तसेच नदी संवर्धनासाठी पदयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकिय अधिकारी, कर्मचारी, कला क्षेत्रातील व्यक्ती, संत व धार्मिक व्यक्ती, शैक्षणिक संस्था या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृष्णा व तीळगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी तथा सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी आज येथे केले. कृष्णा नदी संवाद पदयात्रेच्या अनुषंगाने विश्रामगृह वारणाली येथे आयोजित बैठकीत कार्यकारी अभियंता ज्योती देवकर देवकर बोलत होत्या. यावेळी नदी समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा व तीळगंगा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता योगिता थोरात, सहाय्यक अभियंता मो. रा. गळंगे, उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस. एस. पाटील, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे, प्रदीप सुतार यांच्यासह महसूल, पाटबंधारे, जलसंधारण, शिक्षण तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या, सांगली जिल्हा हद्दीत सुरवातीपासून ते शेवटपर्यंत कृष्णा नदीच्या काठावरून पदयात्रा काढण्यात येणार असून पदयात्रा कालावधीत दररोज सकाळच्या सत्रात 7 कि. मी. व दुपारच्या सत्रात 7 कि.मी. पदयात्रा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. दररोज दुपारी 12 ते 1.30 या वेळेत निवडक गावात संलग्न गावांसह नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नदीची सर्वंकष माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय विभागांनीही नदी संवाद पदयात्रेत सहभागी व्हावे. निसर्गाप्रती आपले कर्तव्य समजून सर्वांनी काम करावे व हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्रीमती देवकर यांनी यावेळी केले. कृष्णा नदी संवाद पदयात्रेंतर्गत ज्या गावात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे ते ठिकाण व कंसात संलग्न गावे पुढीलप्रमाणे. दि. 21 जानेवारी – दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत तांबवे येथे बैठक (बहे, खरातवाडी व हुबालवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत कोळे येथे बैठक. दि. 22 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत शिरटे येथे बैठक (नरसिंगपूर व बिचूद), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत बोरगाव येथे बैठक (बानेवाडी, गोंडवाडी व साटपेवाडी). दि. 23 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत दुधारी येथे बैठक (ताकारी, रेठरे हरणाक्ष, तुपारी, घोगाव), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत जुनेखेड येथे बैठक (नवेखेड व मसुचीवाडी). दि. 24 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत नागठाणे येथे बैठक (सुर्यगाव, संतगाव, खोलेवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत बुर्ली येथे बैठक (अमणापूर, शिरगाव, नागराळे, पुणदीवाडी, दुधोंडी, घोगाव). दि. 25 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत धनगाव येथे बैठक (भुवनेश्वरवाडी, औदुंबर, अंकलखोप), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत भिलवडी येथे बैठक (चोपडेवाडी, माळवाडी, सुखवाडी). 26 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत ब्रम्हनाळ येथे बैठक (खटाव, वसगडे, नांद्रे), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत पद्माळे येथे बैठक (कर्नाळ, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज). 27 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत हरिपूर येथे बैठक (सांगली व सांगलीवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत धामणी येथे बैठक (अंकली, निलजी, बामणी). 28 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत अर्जुनवाड येथे बैठक (मिरज, बोलवाड व टाकळी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत म्हैशाळ येथे बैठक (ढवळी, विजयनगर व वड्डी). तसेच दररोज सकाळच्या सत्रात 7 कि. मी. व दुपारच्या सत्रात 7 कि.मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. रविंद्र व्होरा व डॉ. मनोज पाटील यांनी नदी संवाद पदयात्रेबाबत सविस्तर महिती देवून नदीच्या समस्या जाणून घेवून, त्याचे संकलन करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे यांनी नदी स्वच्छ व अमृत वाहिनी बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. प्रास्ताविक पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस. एस. पाटील यांनी केले. आभार सहाय्यक अभियंता श्रेणी १ योगिता थोरात यांनी मानले. 00000

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके 31 जानेवारी पर्यंत पाठविता येणार

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२३ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२३ Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक/ प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकिटावर 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 राहील. विहित कालमर्यादेनंतर (1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

विकसीत भारत संकल्प यात्रेमुळे केंद्र पुरस्कृत योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

विकसित भारत संकल्प यात्रेची ग्रामीण स्तरावरील सांगता सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचे प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून 11 व्हॅनव्दारे करण्यात आले. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. कवलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कवलापूरच्या सरपंचा उज्ज्वला गुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, भानुदास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली. तेव्हापासून आजअखेर ११ व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक या यात्रेत सहभागी झाले. तर जवळपास ३ हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली, वंचित लाभार्थींची नोंदणी केली गेली व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या यात्रेंतर्गत जिल्ह्यात आयुष्मान कार्डच्या वाटपामध्ये भरीव कामगिरी झाली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आयुष्मान कार्ड मिळाल्यामुळे 5 लाख रूपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कवलापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कवलापूरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खासदार संजय पाटील म्हणाले, सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचवली गेली. लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला गेला. यामध्ये जवळपास ४ लाख आयुष्मान कार्ड वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विविध प्रमाणपत्र वाटप यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अटल बांधकाम कामगार घरकुल योजना, मोदी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, दिव्यांग कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आदि योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरानी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये आयुष्मान भारत, रोजगार हमी योजना, महा आवास योजना, महसूल विभाग चावडी, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जलजीवन मिशन, पोस्ट विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँक या शासकीय विभागासह महिला बचत गटांच्या स्टॉलना उपस्थित लाभार्थीनी भेट देऊन माहिती घेतली. शोभा यात्रा मान्यवरांची शोभा यात्रा स्मार्ट पीएचसी ते ग्रामपंचायत कार्यालय पटांगण ते कार्यक्रमस्थळ अशी काढण्यात आली. स्वागत सरपंच उज्ज्वला गुंडे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले. भानुदास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन प्रारंभी आयुष्मान आरोग्य मंदिर (स्मार्ट पीएचसी) कवलापूरचे उद्गाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट पीएचसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 00000

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची सूचना

सांगली, दि. 04 (जि. मा. का.) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले असून सदरचे अतिक्रमण अथवा विनापरवाना बांधकाम ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याची नोटीस प्राधिकरणाचे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविली आहे. सदरची नोटीस राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम, 2002 च्या कलम 26 च्या उप कलम (2) अंतर्गत दि. ३ जानेवारी रोजी प्रदर्शित आली आहे. नोटिशीत म्हटले आहे कि, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. सदरच्या अतिक्रमणामुळे रा. म. क्र. 166 बोरगाव - वाटंबरे सेक्शन कि.मी. 224/000 ते कि.मी.276/000 (सांगली जिल्ह्यातील सा.क.224/000 ते सा.क. 253/000 पर्यंत) पॅकेज-2 या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम करण्यास अडथळा होत आहे. रा. म. क. 166 च्या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस रस्त्याच्या हद्दीपर्यंत (Row) अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विना परवाना बांधकाम सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत स्वखर्चाने त्वरित काढून घेण्यात यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट 2002 अन्वये निष्कासित करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबधित धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वयन इकाई सोलापूर चे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

शासनाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी 22 जानेवारीपर्यंत अर्जमागणी

सांगली, दि. 04 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी दि. ८ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्काराकरिता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा अर्ज मागविण्यात आले असून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. ८ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत. 00000

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा, वितरण सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष - प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

- जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा - पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत - नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले. तिन्ही कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनातर्फे महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल इंधन डेपो व्यवस्थापक, तिन्ही कंपन्यांचे समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी व अन्य विक्री व्यवस्थापक यांची तातडीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात घेण्यात आलेल्या या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, तिन्ही कंपन्यांचे अधिकारी, समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा, तसेच संपामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहतूक व वितरणावर झालेल्या परिणामाचा, वाहतूकदारांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. वाहतूकदार संघटना व डेपो व्यवस्थापक यांनी त्यांची बाजू मांडली. तसेच, प्रत्येक डेपोला गरजेनुसार २ पोलिसांचा बंदोबस्त देण्याचे तयारी जिल्हा प्रशासनातर्फे दर्शवण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत पेट्रोल व डिझेलचा जीवनावश्यक वस्तू म्हणून अंतर्भाव होतो. या अधिनियमांतर्गत पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर वाहनचालक व वाहतूकदार यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वितरणात अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के इंधन वितरण एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल या तीन कंपन्यांकडून केले जाते. या तिन्ही कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे. जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलजन्य पदार्थांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर विपरित परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, डेपो मॅनेजर, वाहतूकदार व डीलर्स यांच्यामध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची पथके तयार करून पेट्रोलपंपांच्या इंधनाचा साठा तपासला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, भविष्यात संपांची वेळ आली तर आगाऊ साठा करून ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांनी तिन्ही कंपन्यांनी सांगली जिल्ह्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अपवादात्मक स्थितीत पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे वाहनचालक वाहतुकीस विरोध करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 00000