बुधवार, १७ जानेवारी, २०२४

नदी संवर्धनासाठी नदी संवाद पदयात्रेत सहभागी व्हा - कार्यकारी अभियंता ज्योती देवकर

कृष्णा नदी संवाद पदयात्रा 21 ते 28 जानेवारी पर्यंत सांगली दि. 17 (जि.मा.का.) : चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्या मार्फत दि. 21 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत कृष्णा नदी संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्यासोबत संवाद साधण्यासाठी विविध गावात बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. नदी स्वच्छ, अमृत वाहिनी बनविण्यासाठी तसेच नदी संवर्धनासाठी पदयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकिय अधिकारी, कर्मचारी, कला क्षेत्रातील व्यक्ती, संत व धार्मिक व्यक्ती, शैक्षणिक संस्था या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृष्णा व तीळगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी तथा सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी आज येथे केले. कृष्णा नदी संवाद पदयात्रेच्या अनुषंगाने विश्रामगृह वारणाली येथे आयोजित बैठकीत कार्यकारी अभियंता ज्योती देवकर देवकर बोलत होत्या. यावेळी नदी समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा व तीळगंगा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता योगिता थोरात, सहाय्यक अभियंता मो. रा. गळंगे, उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस. एस. पाटील, सहाय्यक अभियंता श्वेता दबडे, प्रदीप सुतार यांच्यासह महसूल, पाटबंधारे, जलसंधारण, शिक्षण तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या, सांगली जिल्हा हद्दीत सुरवातीपासून ते शेवटपर्यंत कृष्णा नदीच्या काठावरून पदयात्रा काढण्यात येणार असून पदयात्रा कालावधीत दररोज सकाळच्या सत्रात 7 कि. मी. व दुपारच्या सत्रात 7 कि.मी. पदयात्रा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. दररोज दुपारी 12 ते 1.30 या वेळेत निवडक गावात संलग्न गावांसह नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नदीची सर्वंकष माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय विभागांनीही नदी संवाद पदयात्रेत सहभागी व्हावे. निसर्गाप्रती आपले कर्तव्य समजून सर्वांनी काम करावे व हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्रीमती देवकर यांनी यावेळी केले. कृष्णा नदी संवाद पदयात्रेंतर्गत ज्या गावात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे ते ठिकाण व कंसात संलग्न गावे पुढीलप्रमाणे. दि. 21 जानेवारी – दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत तांबवे येथे बैठक (बहे, खरातवाडी व हुबालवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत कोळे येथे बैठक. दि. 22 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत शिरटे येथे बैठक (नरसिंगपूर व बिचूद), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत बोरगाव येथे बैठक (बानेवाडी, गोंडवाडी व साटपेवाडी). दि. 23 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत दुधारी येथे बैठक (ताकारी, रेठरे हरणाक्ष, तुपारी, घोगाव), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत जुनेखेड येथे बैठक (नवेखेड व मसुचीवाडी). दि. 24 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत नागठाणे येथे बैठक (सुर्यगाव, संतगाव, खोलेवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत बुर्ली येथे बैठक (अमणापूर, शिरगाव, नागराळे, पुणदीवाडी, दुधोंडी, घोगाव). दि. 25 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत धनगाव येथे बैठक (भुवनेश्वरवाडी, औदुंबर, अंकलखोप), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत भिलवडी येथे बैठक (चोपडेवाडी, माळवाडी, सुखवाडी). 26 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत ब्रम्हनाळ येथे बैठक (खटाव, वसगडे, नांद्रे), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत पद्माळे येथे बैठक (कर्नाळ, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज). 27 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत हरिपूर येथे बैठक (सांगली व सांगलीवाडी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत धामणी येथे बैठक (अंकली, निलजी, बामणी). 28 जानेवारी - दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत अर्जुनवाड येथे बैठक (मिरज, बोलवाड व टाकळी), सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत म्हैशाळ येथे बैठक (ढवळी, विजयनगर व वड्डी). तसेच दररोज सकाळच्या सत्रात 7 कि. मी. व दुपारच्या सत्रात 7 कि.मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. रविंद्र व्होरा व डॉ. मनोज पाटील यांनी नदी संवाद पदयात्रेबाबत सविस्तर महिती देवून नदीच्या समस्या जाणून घेवून, त्याचे संकलन करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे यांनी नदी स्वच्छ व अमृत वाहिनी बनविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. प्रास्ताविक पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस. एस. पाटील यांनी केले. आभार सहाय्यक अभियंता श्रेणी १ योगिता थोरात यांनी मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा