शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिटी हायस्कूला दिली भेट

कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे सांगली दि. 30 (जि.मा.का.) : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली येथील सिटी हायस्कूला भेट देऊन संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक नितीन खाडीलकर, हरी भिडे, विजय देवधर, केदार खाडिलकर, विपीन कुलकर्णी आदि उपस्थित होते. सिटी हायस्कूलमध्ये संस्था चालक यांच्याशी संवाद साधताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगवर भर द्यावा लागेल. शिक्षण संस्थांनी काही कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत की, जेणकरून भावी पिढी बेरोजगार राहणार नाही. कौशल्यावर आधारित शिक्षण पध्दती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था फार मोठे योगदान देवू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांना एका वेगळ्या दिशेने वाटचाल करावी लागेल.आणि हीच वाटचाल शिक्षण संस्थानाही सक्षम बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 00000

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिध्द : सूचना 3 ऑक्टोबरपर्यंत नोंदवाव्यात - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 25 (जि.मा.का.): मतदान केंद्राची प्रारुप यादी व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत सूचना व हरकती असल्यास त्यांनी 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अर्हता दिनांक 01 जानेवारी, 2024 वर आधारीत) अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या एकूण 2415 यादी भागांमध्ये राबविण्यात येत असून सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने पूर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. 21 जुलै 2023 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुर्नरचना देखील करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघामध्ये मिळून एकत्रितरित्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे एकूण 116, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे एकूण 59, Merge करण्यात आलेले 35 मतदान केंद्र व भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील 1500 मतदारापेक्षा अधीक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्राच्या बाबतीत नव्याने प्रस्तावीत होणारे एकूण 06 मतदान केंद्राची संख्या आहे. असे एकूण 2421 मतदान केंद्राच्या सूसुत्रीकरणाचे व पुर्नरचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावीत बदल हे सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयास मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडे मंजूरीसाठी पाठविण्याकरीता प्राप्त झालेले आहेत. सदर बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली यांच्या कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर जाहीररित्या प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या बाबत कोणासही कोणत्याही सूचना द्यावयाची असल्यास 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत वा त्यापूर्वी द्याव्यात. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रितरित्या प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव मा. भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास सदर एकत्रितरित्या प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व पुर्नरचना देखील अस्तित्वात येईल. सदरची जाहीर नोटीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे नोटीस बोर्डावर जाहिर प्रसिध्दी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. ००००

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

नागरिकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम

- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे मिठाई उत्पादकांना कायद्याचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांनी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत चालू राहणार आहे. मिठाई उत्पादकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे. अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करताना मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (use by date) दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ व खवा हे परवानाधारक / नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावे जेणेकरुन त्यांची खरेदी बिले राहतीत तसेच प्रत्येक अन्न व्यवसायिकाने त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना/नोंदणी क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावेत. कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्तबाबतची वैद्यकिय तपासणी करावी. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा १००PPM च्या आतच वापर करावा. बंगाली मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. स्पेशन बर्फीचा वापर मिठाई बनविण्यासाठी करू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे. फरसाण तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे २-३ वेळाच वापरण्यात यावे त्यानंतर ते RUCO अंतर्गत बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे, अशा सूचना अन्न व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी. मिठाई दुध दुग्धजन्यपदार्थ व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करताना use by date पाहुनच खरेदी करावी. उघड्यावरील तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खावा (मावा) खरेदी करू नये, माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासाच्या आत करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी. बंगाली मिठाई 8-10 तासाच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये, खराब / चवीत फरक जाणवला तर ती मिठाई नष्ट करावी, असे आवाहनही श्री. मसारे यांनी केले आहे. प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. व्यावसायिक व ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रं. 1800222365 किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 0233-2602202 अथवा fdasangli@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. अन्न पदार्थांबाबत काही तक्रार असल्यास नागरिक प्रशासनाच्या FoScos प्रणालीवरही ऑनलाईन तक्रार करू शकतात, असे आवाहन श्री. मसारे यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 24 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबर 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 24 सप्टेंबर 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

'आयुष्मान भव' मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 21 (जि.मा.का.) :- 'आयुष्मान भव' मोहिमेची व्यापक जनजागृती करून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 'आयुष्मान भव' मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शरद शेगावकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आयुष्मान कार्ड काढण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. हे कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ स्तरावर कळवून त्याचे निराकरण करून घ्यावे. यासाठी एक संनियंत्रण समिती गठीत करावी. 'आयुष्मान भव' या मोहिमेंतर्गत घेण्यात येणाऱ्या आरोग्य मेळाव्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ, औषध पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर याचा समावेश असावा. 00000

हेल्पलाईन क्रमांकावरून अवयवदानाची माहिती घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 21 (जि.मा.का.) :- अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी, याबाबत जनतेला माहिती मिळावी व अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात हेल्पलाईन ‍सुविधा सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अवयवदानाबाबत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, नेत्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शरद शेगावकर, जिल्हा समन्वयक अविनाश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रक्तदान, नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान या संदर्भात माहिती हवी असल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी, युवक, युवतींनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन माहिती घ्यावी. अवयवदानासाठी (१) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली संपर्क क्रं. ०२३३ - २३७४६५१ ते ५४ मो. ८८३०९८६०६३, ८००७२५९११९ (२) शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज संपर्क क्रं. ०२३३-२२३२०९०/९१ ते ९९, मो. ८८३०९८६०६३, ८००७२५९११९, (३) भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली संपर्क क्रं. ०२३३-२६०१५९२ / ९३ / ९४, (४) सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज संपर्क क्र. ०२३३-२२१२७२८ / २९, मो. ८६९८२१२७२८ या रूग्णालयांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. नेत्रदानासाठी (१) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली मो.क्र. ८००७२५९११९, ८८३०९८६०६३, (२) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज ०२३३-२२३२०९१ ते ९९, (३) दृष्टीदान आय बँक, सांगली ०२३३-२३०१९३९-४०-४१ / ९६२३२३१९१९, (४) पारसमल कोचेटा आय बँक, मिरज ०२३३-२६४४४९९ / ८००७८४५४५४, (५) श्रीमती ताराबाई परांजपे आय बँक, सांगली ०२३३-२३२२५०६ / ९४२१२२२२५९, (६) भारती हॉस्पिटल आय बँक, सांगली ०२३३- २६०१५९२ / ९३ / ९६६५१५५७००, (७) नंदादीप आय बँक, सांगली. ०२३३-२६२१७२७ / ७५८८०८५९९९, (८) श्री टेके आय क्लिनिक, सांगली ०२३३-२३७६३३० / ९८९०४६४३४०/७७९८१५२००१, (९) डॉ. अनिल कुलकर्णी आय. हॉस्पिटल, मिरज ९१४२२११६६६, या रूग्णालयांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे यांच्या ८८३०९८६०६३, ८००७९५९११९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 000000

आटपाडी येथे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत दुग्ध व्यवसाय शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम. सी. ई. डी.) सांगली यांच्यावतीने पंचायत समिती, आटपाडी येथे दुग्ध व्यवसाय व शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने दिनांक 27 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कुटुंबातील व्यक्ती यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन कशा पद्धतीने करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये दुधाळ व्यवसायाचे आर्थिक तंत्र, जनावराच्या जाती, शेळीच्या विविध जाती व योग्य जातीची निवड तसेच कुक्कुटपालन मध्ये पक्षाच्या विविध जाती, योग्य जातीची निवड, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन, गोठा बांधणी, आझोला चारा, हायड्रोपोनिक चारा व हिरव्या चाऱ्याच्या विविध जाती, शेळी पालनमध्ये शेळीपालनाचे व्यवस्थापन, करडाची निगा, गोठा बांधणी, जनावरांचे आजार, उपचार, लसीकरण, चाऱ्याचे नियोजन तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन, पशुखाद्य निर्मिती, गांडूळ खत निर्मिती तसेच शासनाच्या विविध कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम आयोजक दत्तात्रेय पुकळे (मो. नं. 9689927976) एम. सी. ई .डी. द्वारा पंचायत समिती आटपाडी येथे संपर्क साधावा व तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार युवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे. 000000

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना

बांधकाम कामगारांची नित्य आरोग्य तपासणी होण्याच्या दृष्टीने विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा काल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमिवर या योजनेची माहिती देणारा लेख... बहुतेक बांधकाम कामगार हे निरोगी आणि सुरक्षित कार्यपद्धतीबद्दल जागृत पूर्णपणे जागरूक नसतात, त्यांना कार्य-संबंधित जोखीम व इतर विविध भौतिक, रासायनिक, जैविक जोखीम आणि मानसिक-सामाजिक घटक अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याकारणाने अनेक बांधकाम कामगार हे त्रस्त आहेत. त्यांना अनेक विकारांचा सामना करावा लागतो, जसे की मस्क्यूकोस्केलेटल विकार, कमी ऐकू येणे, हातात कंपन जाणवणे, त्वचा आणि श्वसन रोग इत्यादी. या सर्वांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी नित्य नियमाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे केल्यास त्यांना अशा प्रकारच्या विविध आजारापासून दूर राहता येईल किंवा अशा प्रकारचे काही जुनाट आजार असल्यास त्यावर त्वरित उपचार करता येतील व त्यांचे स्वास्थ चांगले राहील. त्यांची कार्यक्षमता वाढेल व त्यांना त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल. एकंदरीत त्यांना सुरक्षित, निरोगी आणि समृद्ध जीवन जगता येईल. बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना त्वरित उपचार मिळावेत, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या वेळोवेळी तपासण्या झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर प्राथमिक स्तरावर उपचार करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगार यांच्याकरिता ही योजना असून, याअंतर्गत तपासणी ते उपचार अशी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, रोगाचे त्वरित निदान, वैद्यकीय उपचारांसाठी सुलभ प्रवेश, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यास मदत, आरोग्य सेवा आपल्या दारी असे या योजनेचे प्रमुख फायदे आहेत. योजनेचे लाभार्थी या योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या सक्रिय (जिवित) नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पात्र राहील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार अथवा त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासकीय योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, त्या बांधकाम कामगाराचा अथवा कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांच्या उपचारावरील खर्च 5 लाख रूपयापेक्षा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुक्त संस्थेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहमतीने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत उपचाराकरीता लाभार्थी पात्र राहील. ही योजना मंडळाकडे नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांकरीता ऐच्छिक स्वरूपाची राहील. ही योजना प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी व वैद्यकीय उपचार या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येईल. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार यांच्याकरीता "तपासणी ते उपचार आरोग्य योजना" राबविण्याकरीता एच.एल. एल. लाईफकेअर. लि. (भारत सरकार उद्योग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातप्रकरणी वैद्यकीय सहाय्य बांधकामाच्या ठिकाणी नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारास अपघात झाल्यास ती व्यक्ती या योजनेंतर्गत उपचारास पात्र राहील. बांधकाम कामगारास आवश्यकतेनुसार व सोईनुसार ज्या रूग्णालयामध्ये उपचाराकरीता भरती केले असेल, असे रूग्णालय खाजगी असल्यास तात्पुरत्या स्वरूपात सूचीबद्ध करून पुढील उपचार नियुक्त संस्था करेल. अपघातानंतर उपचाराकरीता असलेल्या रुग्णालयांची माहिती लाभार्थी / कामाची आस्थापना / नातेवाईक / इतर व्यक्तींनी नियुक्त संस्थेस टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हा / तालुका कामगार सुविधा केंद्रास देणे आवश्यक राहील. सूचीबद्ध रुग्णालये नियुक्त संस्थेने प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे निश्चित ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य तपासणी केंद्रे निर्माण किंवा सूचीबध्द केलेल्या ठिकाणी लाभार्थी भेट देवून प्राथमिक आरोग्य तपासणी करू शकेल व तपासणी अहवाल (प्राथमिक व प्रगत पुष्ठीकरण) मिळवू शकेल. पृष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी तसेच, वैद्यकीय उपचाराकरीता नियुक्त संस्था रूग्णालये सूचीबध्द करतील. प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये किमान तीन रूग्णालये मंडळाच्या मान्यतेने सूचीबध्द करून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल. फिरते वैद्यकीय कक्ष फिरते वैद्यकीय कक्ष नियुक्त संस्थेमार्फत प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये 24 X 7 कार्यरत राहील. या कक्षावरील होणारा खर्च नियुक्त संस्थेमार्फत करण्यात येईल. नियुक्त संस्थेमार्फत फिरते वैद्यकीय कक्ष वाहन विनाशुल्क उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या फिरते वैद्यकीय कक्ष वाहनामध्ये डॉक्टर, परिचारक व मदतनीस उपलब्ध राहतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त असून यामध्ये लाभार्थ्यांना द्यावयाची औषधे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारी अत्यावश्यक औषधे, प्रथमोपचार इ. सुविधा देण्यात येतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन हे या योजनेकरीता तयार केलेल्या समर्पित बांधकाम कामगार आरोग्य क्रमांकाशी संलग्न राहील. या योजनेचा निःशुल्क टोल फ्री क्रमांक १८००-२-६६ ६६ ६६ ६६ हा असून यावर कामगारांना संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचे उद्घाटन फिरत्या वैद्यकीय कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ व फिरत्या वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, एचएलएल लाईफ केअर कंपनीचे डीजीएम रणजीत एम., सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर आदि मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते. विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या आरोग्य सेवेशी निगडित महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय योजनेचे आज सांगली जिल्ह्यातून उद्घाटन होत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त एक फिरता वैद्यकीय कक्ष देण्यात येत आहे. त्याचे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी आज प्रातिनिधीक स्वरूपात लोकार्पण करण्यात येत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. त्याचा खर्च बांधकाम कामगार मंत्रालय उचलणार आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी मात्र एक रूपयामध्ये केल्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात 13 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ शकली, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन उभारण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 100 खाटांचे ईएसआय रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना सेफ्टी किटस् देण्यात आली आहेत. बांधकाम कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करणे, पाणी, बैठकव्यवस्थेसह नाका शेड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, बांधकाम कामगारांनी नोंदणी करून त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायांच्या नोंदीत कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. टूल किट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे व तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे. विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, बांधकाम कामगार प्रतिकूल, आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर बांधकाम कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी ही योजना उपयुक्त आहे. फिरत्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. टोल फ्री क्रमांकावर बांधकाम कामगारांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, या योजनांचा लाभ घ्यावा व इतर बांधकाम कामगारांपर्यंत या योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांसाठी "विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा" योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या संगणकीय प्रणालीचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. योजनेचा निःशुल्क १८००-२-६६ ६६ ६६ ६६ टोल फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला. यावेळी पुणे विभागातील सांगलीसह, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यातील फिरत्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आणि वाहनचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रदान करून बांधकाम कामगारांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट) चे लोकार्पण करण्यात आले. पात्र नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांना, त्यांच्या वारसांना अर्थ सहायाचे धनादेशही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेची माहिती देणारा पोवाडा शाहीर बजरंग आंबी व पथकाने सादर केला. विवेक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राणी यादव यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून आलेले बांधकाम कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 00000

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवेचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी "विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा" योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ रविवार, 17 सप्टेंबर 2023 रोजी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे दुपारी 3 वाजता विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी बांधकाम कामगारांसाठी फिरते वैद्यकिय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट) वाहन स्वरुपामध्ये याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच पात्र नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांना धनादेश वितरीत करण्यात येणार आहे. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा ही योजना नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. या योजनेचा निशुल्क टोल फ्री क्रमांक १८००-२-६६ ६६ ६६ ६६ असून या योजनेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये MMU (Mobile Medical Unit) म्हणजेच Advanced Life सपोर्टने सुसज्ज असलेली मोबाईल व्हॅन (फिरते वैद्यकीय कक्ष), प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी - आरोग्य तपासणी शिबीर - प्रयोग शाळेतील तपासणी, तपासणी नंतर Consultation प्रत्येक तालुक्यात Health क्लिनिक - मोफत OPD Consultation प्रत्येक जिल्ह्यात कमीतकमी ३ हॉस्पिटल़ - मोफत IPD (आंतररुग्णश्र उपचाऱ, दरवर्षी मोफत औषधे, पुष्टीकरण आरोग्य तपासणी चाचणी (Advanced Confirmatory Test), अपघात प्रकरणी वैद्यकीय सहाय्य अशी या योजनेची वैशिष्टे आहेत.,असे श्री. मुजावर यांनी कळविले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सारथीचे बळ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूर मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथी मार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती. महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग केंद्रीय लोकसेवा आयोग - या उपक्रमांतर्गत सारथी मार्फत UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत UPSC च्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा : आतापर्यंत मागील तीन वर्षात 2020, 2021, 2022 मध्ये एकूण 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी रुपये 21 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा : आतापर्यंत UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत: मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख रूपये इतका निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. सारथी अंतर्गत UPSC परीक्षेमध्ये मागील तीन वर्षात IAS परीक्षेमध्ये 12, IPS परीक्षेमध्ये 18, IRS परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी उतीर्ण झाले असून इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा एकूण 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच UPSC CAPF सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील अजिंक्य बाबुराव माने या विद्यार्थ्याची UPSC मधील नागरी सेवेमध्ये निवड झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रूपये अर्थसहाय्य केले आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोग(मुख्य परीक्षा) टप्प्यावर 6 विद्यार्थ्यांना एकूण 3 लाख रूपये अर्थसहाय्य केले आहे. महाराष्ट्र राज्यसेवा आयोग - UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षा MPSC मध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोंचिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC साठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. MPSC पूर्व परीक्षा - आतापर्यंत मागील तीन वर्षात 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. MPSC मुख्य परीक्षा - मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 11 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. MPSC मुलाखत - मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 56 लाख 60 हजार रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. सन 2021-22 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, यांत्रिकी सेवा, न्यायालयीन सेवा –दिवाणी न्यायाधीश परीक्षा (CJJD –JMFC) इत्यादी परीक्षांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दहा हजार रुपये इतकी रक्कम एकवेळचे अर्थ सहाय्य म्हणून देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सांगली जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना 4 लाख 40 हजार रूपये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा टप्प्यावरील 368 विद्यार्थ्यांना 55 लाख 20 हजार रूपये अर्थसहाय्य करण्यात आले. MPSC राज्य सेवा 2020 मध्ये निवड झालेले सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी - तन्वीर संपतराव पाटील ता. शिराळा, निखिल सुरेश पाटील ता. वाळवा, अर्जुन संजय कदम ता. खानापूर, सतीश रामहरी चव्हाण ता. आटपाडी, संग्राम अरुण पाटील ता. तासगाव, शुभम सुधीर जाधव ता. खानापूर, ऋतुजा हिम्मतराव शिंदे ता. कडेगाव. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF) - या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे/विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतू कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे JRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व SRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे. तर 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2019 मध्ये मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थ्यांना तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 58 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली 00000

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

आटपाडी तालुक्यामधील दुध संकलन केंद्रांची तपासणी विना परवाना व्यवसाय करणाऱ्या पेढीस व्यवसाय बंद करण्याचे निर्देश

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यामधील दुध संकलन केंद्रांची तपासणी आज अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) गुप्तवार्ता श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी 4 व सातारा जिल्ह्यामधून एक अन्न सुरक्षा अधिकारी यांचा तसेच जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांचा समावेश होता. या पथकाकडून आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील श्री श्याम दुग्धालय, श्री श्याम दुग्धालय ( दुध शितकरण केंद्र), सिद्धनाथ दुध संकलन केंद्र व आशिष दुध संकलन केंद्र, या दुध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. या दुध संकलन केंद्रामधून गाय व म्हैस दुधाचे नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. तपासणी दरम्यान श्याम दुग्धालय (दुध शितकरण केंद्र) ही पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळल्याने या पेढीस विना परवाना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. दुध भेसळीबाबत कारवाई करीता शासनाने गठीत केलेल्या समितीकडून मागील एक महिन्यामध्ये 83 दुध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली असून 7 नमुने घेण्यात आले आहेत व 172 कि. ग्रॅ. खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुढील कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने सुरु राहणार आहे. नागरीकांनी दूध भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या fdasangli@gmail.com या ईमेल वरती तक्रार करावी किंवा माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे. 00000

रोजगार मेळावा 25 सप्टेंबरला

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : खाजगी क्षेत्रात, लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, सांगली आणि मिरज महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 15 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, बी.ई., पदवीधर, इत्यादी शैक्षणिक पात्रतेची एकूण 477 पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये मिरज महाविद्यालय, शासकीय दूध संकलन केंद्र शेजारी, मिरज या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत, आनंदात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

* उत्सव काळात सामाजिक सलोखा राखुया * पर्यावरण पूरक उत्सव साजरा करूया सांगली दि. 14 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. जिल्ह्यात गणेशोत्सवाला एक वेगळी परंपरा असून यंदाचा गणेशोत्सवही शांततेत, आनंदात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया. गणेश मंडळांनी उत्सव काळात नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले. गणेशोत्सव सण व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने खरे क्लब हाऊस येथे आयोजित शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह पोलीस व संबधित विभागाचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या व ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी केली आहे. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण, नदी प्रदूषण न करता पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळ व भक्तांनी पुढाकार घ्यावा. उत्सव काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ शासन व प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवावा. मंडळांनी उत्सव काळात सामजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे. मंडळांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये. उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्या-त्या विभागाकडून घ्याव्यात. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी एस. टी. बस सुविधा देण्याबाबत एस. टी. महामंडळास कळविले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी होत आहे व याच दिवशी ईद-ए-मिलाद असल्याने मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलली याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात सर्वच सण समारंभ सामाजिक सलोखा राखून साजरे केले जातात. असाच सामाजिक सलोखा पुढील काळात राखुया आणि सांगली जिल्ह्याच्या लौकिकात भर घालूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरुन राज्य स्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल. सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, व्दितीय क्रमांक 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये असे आहे. या स्पर्धेसाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक गणेश मंडळांनी अर्ज करावेत, या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले, सांगली जिल्ह्याला उत्सव साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. ही परंपरा जपून सण, समारंभ साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावे. मंडळांनी केलेल्या चांगल्या सूचनांची पोलीस विभागामार्फत दखल घेण्यात आली आहे. उत्सव काळासाठी स्पेशल पोलीस अधिकारी नेमण्याची कार्यवाही केली जाईल. उत्सव काळात लेझर शो मुळे डोळे व आरोग्याचा समस्या उद्भवत असल्याने मंडळांनी लेझर शो करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. मंडप टाकताना नियमांचे उल्लंघन करू नये. वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये याची दक्षता घ्यावी. उत्सव काळात मंडळांनी 24 तास स्वयंसेवक नेमावेत. उत्सव काळात वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावे. पोलीस विभागामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल,असे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी केले जाईल. शहरातील मोकाट व भटक्या जनांवरांचा बंदोबस्त केला जाईल. गणेश विसर्जनासाठी मिरज येथील गणेश तलाव बरोबरच सांगलीत ही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. मंडळांनी मंडप, स्वागत कमान याची परवानगी घ्यावी. ध्वनी व धूळ प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महापालिकेमार्फत पर्यावरण पूरक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळासाठी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्युत वितरण विभागामार्फत गणेशोत्सव काळात अखंडित वीज पुरवठा देण्याची खबरदारी महामंडळामार्फत घेतली जाईल. उत्सवापूर्वी त्या-त्या विभागातील दुरुस्तीची कामे केली जातील. गणेश मंडळांना उत्सव काळात घरगुती दराने वीज पुरवठा केला जाणार असल्याने मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागामार्फत करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांनी प्रस्ताविक केले. बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडल्या व सण, समारंभ शांततेत साजरे करू असे आश्वासन दिले. 00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेतून केशव मिसाळ यांची तेल उत्पादन व्यवसायात भरारी

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घेऊन अनेकांनी आपली प्रगती साधली आहे. आटपाडी तालुक्यातील केशव मिसाळ त्यापैकीच एक. केशव मिसाळ यांचे गाव दिघंची असून, त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची ५ एकर शेती आहे. घरी वडील व पत्नी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. मिसाळ यांची नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा व जिद्द होती. २००७ पासून ते विषमुक्त अन्न या चळवळीमध्ये काम करत असल्याने सेंद्रिय शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. भारतात खाद्यतेलाचे उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भेसळमुक्त खाद्यतेलासाठी माणदेश ग्रामोद्योग या नावाने त्यांनी लाकडी घाण्याचे तेल व्यवसाय २०१६ साली सुरू केला. त्यासाठी १५ लाख रूपयांचे स्वभांडवल त्यांनी विविध माध्यमातून उभा केले. व्यवसाय आकारास येत असतानाच केशव मिसाळ यांनी व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. श्री. मिसाळ यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची माहिती मिळाली. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या संवाद मेळाव्यास उपस्थित राहून त्यांनी महामंडळाच्या योजनांची सर्व माहिती घेतली. याबाबत केशव मिसाळ म्हणाले, मी व्यवसाय वाढीसाठी बाबासाहेब देशमुख बँक लिमिटेड, आटपाडीकडून गेल्या वर्षी दहा लाख रूपयांचे कर्ज घेतले. आज माझ्याकडे तेल निर्मितीसाठी २ व तेलबिया फोडण्यासाठी २ अशी एकूण ४ यंत्रे आहेत. मदतीसाठी एक कामगारही आहे. महिन्याला ५०० लिटर तेलाचे उत्पादन केले जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून मी व्यवसाय वाढवू शकलो. यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मला संपूर्ण सहकार्य मिळाले. आज मी घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा नियमितपणे सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाकडून 1 लाख 16 हजार 166 रूपये इतका व्याज परतावा करण्यात आला आहे. विषमुक्त अन्न, रोगमुक्त भारत या संकल्पनेचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यातून ते शेतीही सेंद्रिय पद्धतीने करतात. त्यांच्या घाण्यात सेंद्रिय तेल तयार व्हावे, यासाठी परिसरातील शेतकरी गटांना ते सेंद्रिय तेलबिया पुरवठा करतात. त्या सेंद्रिय तेलबियांची खरेदी अधिक दराने करतात. केशव मिसाळ यांच्या व्यवसाय भरभराटीसाठी व्याज परतावा योजना मदतीची ठरली आहे. संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली 00000

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

व्याजपरतावा योजनेतून फुलला इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांचा व्यवसाय

मनात इच्छा ठेवली तर काहीही होऊ शकते. सर्व अडथळ्यांची शर्यत पार करता येते. इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांनी हे सिद्ध केले आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. वर्षभरातच त्यांच्या सॉक्स आणि शूजनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाग्यश्री मनोज पाटील या अभियांत्रिकी पदवीधर आहेत. कुटुंबात त्यांच्यासह सासू, सासरे, पती, २ मुले इतके सदस्य आहेत. २०१० सालापर्यंत भाग्यश्री आणि मनोज पाटील हे दोघेही अभियंता क्षेत्रात पुणे येथे नोकरी करत होते. कौटुंबिक कारणास्तव त्यांना इस्लामपूर येथे मूळ गावी परतावे लागले. पण, दोघांचीही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्याची जबरदस्त इच्छा होती. त्यातून भाग्यश्री यांच्या साथीने प्रारंभी पती मनोज पाटील यांनी भागिदारीमध्ये स्वतःचा व्यवसाय केला. त्यामध्ये जम बसल्यानंतर त्याचीच स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा मनोदय भाग्यश्री यांनी व्यक्त केला. त्याला मनोज पाटील यांनी लगेचच प्रोत्साहन दिले. त्यातून भाग्यश्री यांनी धनंजय एंटरप्रायझेज या नावाची फर्म सुरू केली. निक्स (knics) ब्रँडने त्या शूज आणि सॉक्सची निर्मिती करतात. याबाबत भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आमच्या धनंजय एंटरप्राइजेस या फर्ममधून सॉक्स अँड शूज तयार केले जातात. त्यासाठी मला आयडीबीआय बँकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळाले. कर्ज मिळाल्यानंतर मी व्याजपरतावा योजनेसाठी महामंडळाकडे रीतसर अर्ज केला. प्रोजेक्ट रिपोर्ट व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे महामंडळाकडे जमा केल्यानंतर मला गेले वर्षभरापासून कर्जाचे व्याज नियमितपणे परत मिळत आहे. आजअखेर जवळपास 76 हजार रूपये व्याजपरतावा मिळाला आहे. व्याजपरतावा वेळेत मिळत असल्यामुळे पुढील हप्ता वेळेत भरणे अतिशय सोयीस्कर होत आहे. व्याजपरतावा नियमित होत असल्याने निश्चिंत राहून व्यवसायात प्रगती करू शकत आहे. सध्या माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंगसठी चार मशीन्स आहेत. प्रॉडक्शन मॅनेजरसह फर्ममध्ये ५ लोकांचा स्टाफ आहे. महिला, पुरूष, बालके यासह मागणीप्रमाणे कस्टमाईज्ड सॉक्सची निर्मिती आमच्या कंपनीत केली जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल मुंबई, इचलकरंजी, दिल्ली येथून खरेदी केला जातो. आमच्या कंपनीची उत्पादने विक्रीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातात. उद्योग उभारणीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बळ मिळाले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांच्या व्यवसायाला गती मिळत आहे. यासाठी त्या महामंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतात. - संप्रदा बीडकर जिल्हा माहिती अधिकारी, सांगली 00000

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आधार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजातील युवकांना सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना राबवित आहे. या महामंडळाच्या योजनांचा तरूणांना आधार मिळाला आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 880 प्रकरणे मंजूर झाली असून विविध बँकांनी 336 कोटी, 72 लाख रूपये कर्ज रक्कम ‍वितरीत केली आहे. तर 29 कोटी 34 लाख रूपये व्याज परतावा महामंडळाकडून दिलेला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR1) या योजनेची मर्यादा 10 लाख रूपयांवरून 15 लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आली असून महामंडळामार्फत 4 लाख 50 हजार रूपये व्याज मर्यादेत परतावा करण्यात येतो. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. 12 टक्के आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यावसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR2) या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रूपये मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाख रूपयांच मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाख रूपयांच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाख रूपये पर्यंतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाख रूपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमर करण्यात येते. या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.udyog.mahaswayam.gov.in) अपलोड करीत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही. महामंडळाच्या योजनांकरिता सामाईक अटी व शर्ती उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरिता तथा ज्या प्रवर्गाकरिता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशाकरिता आहेत. वयोमर्यादेची अट स्त्री-पुरूषांकरिता कमाल 60 वर्षे आहे. लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयांच्या आत असावे (8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदारांचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तिक I.T.R. (पती व पत्नीचे). लाभार्थीने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरिता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2017 नुसार करण्यात येईल. योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपध्दती पात्रता प्रमाणपत्र (LOI) करिता महत्वाची कागदपत्रे - आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला / लाईट बिल/रेशनकार्ड/गॅस बिल/बँक पास बुक), उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला/आयटी रिटर्न (जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल (नमुना वे प्रणालीवर उपलब्ध आहे). पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, LOI समवेत लाभार्थीने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ती सर्व कागदपत्रे) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजुरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते. यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज मंजुरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे, त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हप्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी). त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण EMI हप्ता विहित कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हप्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थीने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थीस अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरूपात वितरीत करण्यात येईल. या योजनांच्या लाभाकरिता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्याकरिता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती / संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये. संपर्कासाठी पत्ता - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2990383. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

विकास कामे मुदतीत पूर्ण करा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

जिल्हा परिषदेकडील विकास कामे व विविध योजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा सांगली दि. 11 ( जि.मा.का.) :- जिल्हा परिषद मार्फत ग्रामस्तरापर्यंत विविध विकास कामे राबविली जातात. विकासकामे करताना ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी योग्य नियोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता संबधित विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या. जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारी विविध विकास कामे व योजनांचा आढावा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज घेतला. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, ज्या विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत त्याची माहिती द्यावी, या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल. तसेच ज्या कामांना स्थगिती दिली आहे त्याची माहिती देण्यात यावी. अंगणवाडी बांधकामाचा आढावा घेऊन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जागे अभावी ज्या अंगणवाडीच्या बांधकामामध्ये अडचण येत आहे याबाबत सुधारित प्रस्ताव करून यासाठी मंजूर निधी खर्च करावा. जल जीवन मिशन अंतर्गत होणारी कामे प्राधान्याने व्हावीत. ग्रापंचायतस्तरावर मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत ग्रामपंचायत विभागाने नियोजन करावे. यासाठी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा. १५ व्या वित्त आयोगातील निधीही वेळेत खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या. बैठकीत बांधकाम, समाजकल्याण, कृषी, पाणी पुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, आरोग्य, पशूसंवर्धन, शिक्षण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भव योजनेतंर्गत लाभार्थीना अभा कार्ड तसेच त्यांना एक महिन्याच्या औषधाचे किट वितरण, महिला बाल विकास विभागाकडे नियुक्ती मिळालेल्या अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेतून पात्र लाभार्थीस अनुदान वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 00000
शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिकचा निधी देऊ - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे जिल्हा शिक्षक पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते वितरण सांगली, दि. 11 (जि.मा.का.):- आदर्श व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याने शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास खासदार संजय पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद विभाग प्रमुख, पुरस्कार प्राप्त सन्माननीय शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शिक्षक हा फक्त विद्यार्थीच घडवत नाही तर समाजाला सुद्धा घडवण्याचे व दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे त्याच्या कामाचे कौतुक होणे आवश्यक असते. अशा पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने पुढील कार्य करण्यास त्यांना बळ व प्रेरणा मिळेल. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी मॉडेल स्कूल योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 314 शाळा मॉडेल स्कूल करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने मॉडेल स्कूल करण्यात येणार आहेत. मॉडेल स्कूल मुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्या सोयीच्या ठिकाणी करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले. खासदार संजय पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी नेहमीच उत्तमरीत्या पार पाडतो. सामाजिक भान जपत तो मुलांना घडविण्याचे काम करतो. स्पर्धात्मक युग सुरू असून यामध्येही जिल्हा परिषद शाळा पुढे आहेत ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. शिक्षक हा नेहमीच उपक्रमशील असतो. गुणवत्तेचा ध्यास घेतलेला शिक्षक भावी पिढी निर्माण करण्यासाठी सदैव तत्पर असतो. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात मॉडेल स्कूल निर्माण करण्यात येत आहेत. गुणवत्तेत सांगली जिल्हा राज्य, देशात अग्रेसर रहावा यासाठी शिक्षकांनी आणखी अधिक योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी केले. प्राथमिक शिक्षण विभाग विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे. जिल्हा यंदा १७० शाळांमधे रोबोटिक व कोडिंग लॅब, १४१ शाळांमधे सायन्स किट देण्यात आले आहे. या बरोबरच शाळेत स्मार्ट टिव्ही देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक तानाजी कोडग व श्रीमती करुणा मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमात महाराष्ट्र गीत गायन केलेल्या सी.टी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात मिरज तालुक्यातील जि. प. शाळा सिध्देवाडी चे विष्णू ओमासे, कवठेमहांकाळ तालुक्यातील जि. प. शाळा ढालेवाडी चे तानाजी कोडग, जत तालुक्यातील जि. प. कन्नड शाळा लगांटेवस्ती हळ्ळी चे अण्णासाहेब सौदागर, तासगाव तालुक्यातील ‍जि. प. शाळा नं. 1 सावळज चे सुनिल तावरे, खानापूर तालुक्यातील जि. प. शाळा घोटी बु. चे अविनाश दाभोळे, आटपाडी तालुक्यातील जि. प. शाळा घरनिकी चे भिमराव सांवत, वाळवा तालुक्यातील जि. प. शाळा नरसिंहगाव च्या श्रीमती संगिता परीट, शिराळा तालुक्यातील जि. प. शाळा निगडी च्या श्रीमती करूणा मोहिते, कडेगाव तालुक्यातील जि. प. शाळा उपळेवांगी चे बाबासो शिंदे, व पलूस तालुक्यातील जि. प. शाळा नं. 1 पलूस चे राम चव्हाण यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ००००

हणमंत सूर्यवंशी यांना शेततळे अस्तरीकरणामुळे लाभ

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) - तासगाव तालुक्यातील हणमंत सूर्यवंशी यांना लहरी पावसामुळे शेती करण्यात मर्यादा येत होत्या. शेततळ्यातून त्यांनी त्यावर मात केली आहे. श्री. सूर्यवंशी यांच्या कुटुंबात त्यांच्यासह आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे 5 सदस्य आहेत. शेततळे अस्तरीकरणामुळे त्यांच्या उत्पन्नात लाखाची वाढ झाली आहे. हणमंत गुंडा सूर्यवंशी यांची मणेराजुरी जवळील योगेवाडी येथे दीड एकर शेती आहे. मात्र, शेतीला पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावयाचा. पावसाळ्यात खरीप हंगामात हायब्रीड ज्वारीचे पीक ते घ्यायचे. मात्र, उन्हाळ्यात हाती काहीच लागायचं नाही. त्यांनी तीन ते चार वेळा बोअरवेल मारण्याचा प्रयत्न केला. पण, पाणी लागले नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली. शेती असूनही ते पूर्ण वेळ शेती करू शकत नव्हते. त्यांनी इतर वेळी गवंडी काम करण्याचा पर्याय स्वीकारला. त्यातून येणाऱ्या तुटपुंज्या पैशात त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यातच सहा महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याने ते गवंडी कामही करू शकत नव्हते. याबाबत श्री. सूर्यवंशी म्हणाले, अनिश्चित पाऊसमान, दुष्काळी परिस्थिती अशा सर्वच शेतकऱ्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या मलाही होत्याच. अशा परिस्थितीत मी शेती करत होतो. त्यातच, अपघात झाल्यामुळे गवंडी कामही करता येणार नव्हते. त्यामुळे माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. पण, या बिकट परिस्थितीत कृषि विभागाचे अधिकारी व कृषि मित्र यांनी मला शेततळे अस्तरीकरणाची माहिती दिली. 30 मीटर बाय 30 मीटर शेततळे खुदाई व अस्तरीकरणासाठी मला ८८ हजार रूपये खर्च आला. कृषि विभागाकडे अर्ज केल्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण बाबीसाठी मला रक्कम ४१ हजार २१८ रूपये अनुदान मिळाले. शेततळे अस्तरीकरण केल्यानंतर इतर ठिकाणहून पाणी घेऊन ते पाणी शेततळ्यात साठवले आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेती कशी करायची असा प्रश्न मला पडला नाही. शेततळे केल्यानंतर उन्हाळा असूनही मी चारा वैरणीचे पीक घेतले. शेततळ्यातील पाण्यातून मी आता भाजीपाला, शेंगा, मिरची यांचे पिक घेत आहे. यामुळे उत्पन्नात एक लाख १० हजार रूपयांची वाढ झाल्याची श्री. सूर्यवंशी सांगतात. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 18 सप्टेंबरला

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे सप्टेंबर या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. आर. माने यांनी दिली. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीमती माने यांनी केले आहे. 00000

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

बेरोजगार व स्वयंरोजगार उमेदवारांसाठी 15 सप्टेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार

बेरोजगार व स्वयंरोजगार उमेदवारांसाठी 15 सप्टेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार सांगली दि. 8 (जि.मा.का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली मार्फत बेरोजगार व स्वनयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली. या वेबीनारमध्ये रेशीम उद्योग व तुती लागवड या विषयी रेशीम विकास अधिकारी बी. बी. कुलकर्णी माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/huw-jeif-xyn लिंकव्दारे वेबीनारमध्ये विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

रोजगार मेळावा 13 सप्टेंबरला

सांगली दि. 8 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक, कारखाने व हॉस्पीटल यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्ट्रीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली. रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 3 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर, जी. एन. एम., ए.एन.एम. इत्यादी शैक्षणिक पात्रतेची एकूण 123 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करुनच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 वेळेमध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

शासन आपल्या दारी अंतर्गत महसूल विभागामार्फत तीन लाखाहून अधिक दाखले वाटप

सांगली, दि. 7 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत ‍सांगली जिल्ह्यात 15 एप्रिल 2023 ते 26 जुलै 2023 या कालावधीत एकूण 2‍9 अधिसूचित सेवेमधील 3 लाख 17 हजार 153 दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली. राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. शासकीय योजनांचा, उपक्रमांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. या उपक्रमास 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सांगली ‍जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महसूल प्रशासनामार्फत तहसिल / मंडळ स्तरावर मेळावे शिबीरे घेवून सामान्य जनतेला विविध दाखले देण्यात येत आहेत. दि. 26 जुलै पर्यंत देण्यात आलेल्या विविध दाखल्यांची माहिती पुढीलप्रमाणे. वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र - 24 हजार 363, जातीचे प्रमाणपत्र - 9 हजार 754, उत्पन्नाचे प्रमाणपत्र - 90 हजार 853, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र - 9 हजार 933, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र - 680, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र - 122, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे - 98 हजार 715, नवीन शिधापत्रिका मागणी - 1 हजार 892, शिधापत्रिकेतील नावात दुरूस्ती - 146, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे / नाव वाढविणे - 3 हजार 721, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे - 4 हजार 321, शिधापत्रिकेवरील पत्ता बदलणे - 59, दुय्यम शिधापत्रिका खराब / फाटलेली - 2 हजार 919, दुय्यम शिधापत्रिका /गहाळ शिधापत्रिका - 413, नवमतदार नोंदणी - 1 हजार 589, जन्म मृत्यू दाखला - 432, संजय गांधी योजना सर्वसाधारण - 613, संजय गांधी योजना अनुसूचित जाती - 107, श्रावणबाळ सर्वसाधारण - 281, श्रावणबाळ अनुसूचित जाती - 43, राष्ट्रीय कुटूंब लाभ - 10, विविध प्रमाणपत्र - 19 हजार 809, ईपीआयसी वितरण - 46 हजार 378. 00000